Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देण्याचे काम जाधव यांनी केले-पवार
सोलापूर, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी पडेल ती किंमत मोजली आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देऊन सामाजिक बांधिलकी पत्करली, असे गौरवोद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
मंगळवारी, मेकॅनिक चौक येथे सोलापूर महानगरपालिका आणि स्वातंत्र्यसेनानी स्व. तुळशीदास जाधव जन्मशताब्दी समितीच्या वतीने स्व. जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते. महापौर सौ. अरुणा वाकसे यांनी सर्वाचे स्वागत केले. तुळशीदासदादांच्या कन्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी प्रास्ताविकेत स्व. जाधव यांनी मेकॅनिक चौकात गोऱ्या सरजटांना गोळ्या घाला पण टोपी काढणार नाही, असे बजावले. त्याच ठिकाणी त्यांचा पुतळा बसविण्यात येत असल्याचे सांगितले.
देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून अनेकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षांमुळे मिळाले आहे. समाज एकसंध करण्यासाठी महात्मा गांधी, पं. नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस अशा हिमालयासारख्या उत्तुंग कर्तृत्वाच्या नेत्यांनी प्रयत्न केले. त्यावेळी त्यांनी देश कोणत्या दिशेने जाणार आणि सामाजिक बांधिलकी काय राहील, हे दाखवून दिले. त्यात महाराष्ट्र अपवाद नव्हता. स्व. तुळशीदास जाधव यांनी महात्मा गांधी आणि नेहरू यांचे विचार कृतीतून आणण्याचा प्रयत्न केला. ते लढवय्या स्वातंत्र्यसैनिक होते. गांधीजींची प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील तरुणांची फळी उभी राहिली. त्या पिढीने संसाराचा, घरादाराचा विचार केला नाही. भारतावर ब्रिटिशांचा सूर्य कधी मावळणार नाही ही इंग्रजांची दर्पोक्ती होती ती दूर केली. त्यात स्व. जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली. बलिदानाचा प्रसंग आला तरी ते आपल्या विचारापासून दूर गेले नाहीत, असेही श्री. पवार म्हणाले.
शेकापमध्ये असलेले स्व. जाधव यांनी देशाला पुढे नेण्यासाठी पं. नेहरू यांचा समाजवादी समाज रचनेचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करून त्या प्रवाहातही ते सामील झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडण करीत असतानाच सत्तेचा त्यांनी विचार केला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाचा त्यांनी विचार केला. त्यांचा अन्याय-अत्याचाराविरुध्द संघर्ष करण्याची आणि विचारांची बांधिलकी देण्याची प्रेरणा त्यांच्या पुतळ्यामुळे नव्या पिढीला मिळेल, असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला.
स्व. जाधव यांनी शिरावरची टोपी काढली नाही. गांधी टोपी हे एकतेचे प्रतीक, स्वातंत्र्याचे प्रतीक आणि स्वदेशीचे प्रतीक मानले गेले. संघर्षांतही टोपी सांभाळण्याचे अवघड काम त्यांनी केले. गोऱ्या सरजटांना त्यांच्या टोपीबद्दल संतापाची तिडीक होती. त्यांच्यावर बंदूक रोखली असतानाही टोपी काढणार नाही असे तेजस्वी उद्गार त्यांनी काढले. त्याचप्रमाणे सोलापुरातील चार हुतात्मे, राजगुरू, भगतसिंग अशा नावाची प्रचंड मालिका देशापुढे आहे. त्याच पिढीचे प्रतिनिधी आणि वारसदार तसेच विचारांचे पुरस्कर्ते स्व. जाधव हे होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
जनतेच्या कल्याणासाठी झगडणारा नेता, स्वातंत्र्य चळवळीचे मार्गदर्शक, विचाराने पक्का असलेला समाजवादी नारा फुंकणारा, भारत हा एक समाज म्हणून ओळखला जावा अशी भूमिका घेणारे देशभक्त तुळशीदास जाधव यांनी देशापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. बारामती येथे लोकसभेची निवडणूक लढवून त्यांनी सामाजिक समतेचा महाराष्ट्र कसा असावा याची चुणूक दाखविली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी डोक्यावरील गांधी टोपी न काढता गांधींच्या विचारांचा सातत्याने प्रसार केला. आज स्वातंत्र्यानंतर आपण कोठे आहोत हे पाहात असताना समाधान वाटत नाही. जात आणि धर्मामुळे समाज किडला आहे. शिक्षकी पेशातून गांधींची विचारधारा घेऊन सोलापुरात कामगार म्हणून आलेल्या या नेत्याने स्वातंत्र्य चळवळीत उत्तुंग कामगिरी केल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंह यांनी, आपल्या सासरवाडीतील संबंधित व्यक्ती म्हणून तुळशीदासदादांचा आपला संबंध आला. त्यांचे देशावर मोठे ऋण होते. आपण देशात भावनात्मक ऐक्याच्या गोष्टी करीत असताना सामान्यांच्या समस्यांकडे वेगळ्या पध्दतीने पाहतो. तेव्हा देशासाठी लढा देणाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मार्गक्रमण करण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्या देश संघर्षांतून वाटचाल करीत असून या परिस्थितीत तुळशीदास दादांचे कार्य डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
तुळशीदासदादांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि मिळविल्यानंतरही समाजातील जुन्या चाली-रितींविरुध्द आवाज उठविला. सामान्यांच्या हिताचे त्यांनी काम केले. विकास कामांकडे त्यांचा ओढा होता. म्हणून त्यांनी साखर कारखाना आणि शैक्षणिक संस्था काढून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम केल्याचे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास तुळशीदासदादांचे स्नेही असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते अलिबागचे अ‍ॅड. दत्ता पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, खासदार रामदास आठवले, गणपतराव देशमुख, सुधाकर परिचारक, बबनराव शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजन पाटील, डॉ. रामचंद्र साळे हे आमदार माजी खासदार, धर्मण्णा सादूल, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे तसेच युन्नूसभाई शेख, प्रकाश यलगुलवार, नरसिंग मेंगजी, विश्वनाथ चाकोते हे माजी आमदार, जि.प. अध्यक्षा सुमन नेहतराव, महापालिकेचे उपमहापौर राजेंद्र कलंत्री, मनोहर डोंगरे, बाळासाहेब शेळके, धर्मा भोसले, कय्युम बुऱ्हाण, कलावती बाबासाहेब भोसले आदी उपस्थित होते. यातील प्रमुख पाहुण्यांना फेटय़ाऐवजी गांधी टोपी देण्यात आली. ती टोपी समारंभ होईपर्यंत श्री. पवार यांच्यासह सर्वाच्या डोक्यावर होती.

आठवल्यांसाठी आता शिर्डी!
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांच्या पाठीमागे कोणीतरी कायम असतो असा उल्लेख करताना श्री. पवार म्हणाले की, यापूर्वी मुंबईचा सिध्दिविनायक, गेल्यावेळी पंढरपूरचा विठ्ठल आता शिर्डी पाठीमागे दिसते. या पवारांच्या वाक्यावर श्री. आठवले यांची कळी चांगलीच खुलली.