Leading International Marathi News Daily                               बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वरभास्कराच्या अंगणी साजरी झाली दिवाळी
पुणे, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी
देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन संगीतातील विठोबारुपी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या आजवरच्या संगीत साधनेची राष्ट्रपतींच्या वतीने आज पूजा करण्यात आली. सर्वोच्च पुरस्काररूपाने पूजेचा हा सोहळा विठोबाच्या गाभाऱ्यात म्हणजेच पुण्यातील ‘कलाश्री’ या त्यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या व छोटेखानी समारंभाद्वारे पार पडला. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वतीने केंद्रीय गृहखात्याचे अतिरिक्त सचिव ए. एफ. अहमद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.देशातील हा सर्वोच्च सन्मान पंडितजींना जाहीर झाला तेव्हापासून देशातील संगीतप्रेमींमध्ये आनंद साजरा केला जात आहे. हा सन्मान दिल्लीत एका मोठय़ा समारंभात दिला जातो. पंडितजींच्या प्रकृतीमुळे पंडितजींच्या घरी हा समारंभ आयोजित करण्यात आला. गृह खात्याचे कक्ष अधिकारी अरुण सोबती, राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे विभागाचे आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, पंडितजींचे चिरंजीव श्रीनिवास जोशीसह सर्व कुटुंबीय, आनंद भाटे, उपेंद्र भट आदी निवडक मंडळींची उपस्थिती यावेळी होती.

केईएममध्ये डॉक्टरांना मारहाण
संप मागे
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

रूग्णावर तातडीने उपचार केले नाही आणि नंतर शवविच्छेदन करण्यासही उशीर लावला, असा आरोप करीत के. ई. एम. मध्ये डॉक्टरांना सोमवारी रात्री झालेल्या मारहाणीनंतर संतप्त झालेल्या डॉक्टरांनी सकाळपासून संप पुकारला. पोलिसांनी मारहाणप्रकरणी पाच जणांना अटक केल्यानंतर संध्याकाळी डॉक्टरांनी संप मागे घेतला. लालबाग येथे राहणारे वासुदेव कोचरे यांना सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास के. ई. एम. रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.

बराक ओबामा यांचा पाकिस्तानला कडक इशारा
वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी/पी.टी.आय.

अल- काइदा आणि तालिबानी अतिरेक्यांना पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात मुक्तपणे फिरू दिले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिला. पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवरील डोंगराळ भाग हा अल -काइदा आणि तालिबानी अतिरेक्यांचा बालेकिल्ला समजला जातो. या भागात त्यांना मुक्तपणे फिरू देणार नाही, असा संदेश घेऊन आपले विशेष दूत रिचर्ड होलब्रूक इस्लामाबादला गेले आहेत, असे ओबामा यांनी पत्रकारांना सांगितले.

भारताची श्रीलंकेवर मात
एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात तीन विकेट्सनी विजय

कोलंबो, १० फेब्रुवारी/वृत्तसंस्था

इरफान आणि युसूफ यांच्या पठाणी हिसक्यामुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध ट्वेन्टी-२० लढतही जिंकली. १६ व्या षटकांत ७ बाद ११५ अशा बिकट अवस्थेतून पठाण बंधूंनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून २५ चेंडूत ५९ धावांची भागीदारी करीत विजय श्रीलंकेच्या हातून हिसकावून घेतला. श्रीलंकेचे १७२ धावांचे आव्हान भारताने दुसऱ्याच षटकांत सेहवाग-गंभीर ही सलामीची जोडी गमाविल्यानंतर कठीण वाटू लागले होते. लेगस्पिनर बंदाराने रैना, धोनी आणि जाडेजा आणि जयसूर्याने रोहित शर्मा ही भारताची मधली फळी ५ षटकांत तंबूत पाठविली आणि सामन्याचे चित्रच पालटले. ४ बाद ९९ वरून भारताची अवस्था ७ बाद ११५ अशी झाली. त्यावेळी विजयासाठी भारताला ५७ धावांची आवश्यकता होती. भारताकडे चेंडू होते अवघे २९. लेगस्पिनर बंदाराने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले होते. त्याचवेळी युसूफ पठाणने बंदाराचा पहिलाच चेंडू सीमापार पाठवून भारताची झुंज संपली नसल्याचे जाहीर केले. युसूफने बंदाराचा नंतरचा चेंडू सरळ साईटस्क्रीनवर पाठविला. त्यानंतरचा लाँगऑन पलिकडच्या स्टॅण्डमध्ये पाठवून विजयाचे लक्ष्य आवाक्यात आणले.

कसाबच्या जीवाला दाऊदपासून धोका?
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेल्या अजमल अमीर कसाब या अतिरेक्याची हत्या करण्यासाठी कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने आपले खतरनाक नेमबाज मुंबईत पाठविल्याची माहिती गुप्तचर विभागाने मुंबई पोलिसांना गेल्या आठवडय़ात दिल्याचे कळते. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. कसाब जिवंत राहणे हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे त्याला ठार मारण्याचा प्रयत्न होईलच, असे गृहित धरून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त राकेश मारीया यांनी आज वार्ताहरांना सांगितले.

एटीसीतील गोंधळाचा फटका सुशीलकुमार आणि विलासरावांच्या हेलिकॉप्टरलाही..
मुंबई, १० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान आणि राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर यांतील टक्कर सुदैवाने काल टळली. यावरून एकमेकांना दोष देण्याचे उद्योग भारतीय हवाई दल आणि हवाई नियंत्रण कक्षात सुरू असतानाच काल नेमक्या त्याच वेळी हवाई नियंत्रण कक्षाच्या गोंधळाचा फटका केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हेलिकॉप्टरला बसला.

अल् काईदाची भारताला धमकी
लंडन, १० फेब्रुवारी/पीटीआय

पाकिस्तानवर हल्ला चढविल्यास भारताला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, अशी धमकी ‘अल काईदा’चा वरिष्ठ कमांडर मुस्तफा अबू अल् याझीद याने दिली. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदिनांनी रशियन सैन्याला धूळ चारली तिच गत आम्ही भारताच्या लष्कराची करू असा इशारा याझीदने बीबीसीकडे पाठविलेल्या एका व्हिडिओ फितीमध्ये दिला आहे. मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर भारतात आणखी हल्ले चढविण्यात येतील. भारताच्या आर्थिक केंद्रांवर मुजाहिदीन हल्ले चढवितील व ती धुळीला मिळवितील असेही त्याने पुढे म्हटले आहे. दरम्यान अल काईदाने भारताला दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर, भारतीय लष्कर कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यास सज्ज आहे असे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टनी यांनी आज सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील बजौर या भागात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकी लष्कराने केलेल्या हल्ल्यात याझीद मारला गेला असे पाकिस्तानतर्फे सांगण्यात येत होते. मात्र या व्हिडिओ फितीच्या निमित्ताने याझीद पुन्हा जगासमोर अवतरला आहे.

मुंबई हल्ल्यात स्थानिकांचा हात
पाकिस्तानचा आरोप
इस्लामाबाद, १० फेब्रुवारी/वृत्तसंस्था

मुंबईवरील हल्ल्यांच्या तपासाला आता पाकिस्तानने नवे वळण दिले असून २६ नोव्हेंबर रोजी हल्ल्यांसाठी भारतातील काही शक्तींनीच दहशतवाद्यांना मदत केली असल्याचा नवा निष्कर्ष काढला आहे. पाकिस्तानी तपास अधिकाऱ्यांना आता या हल्ल्यात ज्या भारतीय शक्तींनी मदत केली त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले जावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षा एजन्सींची आता खात्री पटली आहे की भारतातील काही शक्तींनी या दहशतवाद्यांना मदत केल्याशिवाय एवढा मोठा हल्ला चढविणे त्यांना शक्य नव्हते असा एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन डॉन या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसारित केले. कसाब तसेच इतर मृत अतिरेक्यांच्या घेण्यात आलेल्या डीएनए चाचण्यांचे अहवाल पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हवे असून या सर्वांच्या कुटुंबियांशी हे अहवाल जुळत आहेत अथवा नाही याची खातरजमा पाकिस्तानी अधिकाऱ्यांना करावयाची आहे.

डॉ. दिनेश केसकर बोईंग इंडियाच्या अध्यक्षपदी नितीन तोटेवार
नागपूर, १० फेब्रुवारी

विमान निर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी बोईंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांची कंपनीने बोईंग इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष आणि बोईंग इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने नागपूर-विदर्भाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. येत्या १ मार्चपासून ते या पदाची सूत्रे स्वीकारतील. या नियुक्तीबद्दल ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. केसकर यांनी आनंद व्यक्त केला. माझी जबाबदारी वाढली असून यामुळे नागपूरमधील देखभाल व दुरुस्ती केंद्राचे (एमआरओ) काम पूर्ण करण्यास मदत होईल, असेही त्यांनी विश्वासाने सांगितले. ‘एरो-शो’च्या निमित्ताने सध्या ते बंगळुरू येथे आहेत. लवकरच ते शिकागोला आणि नंतर सिएटल येथील मुख्यालयात जातील. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर सूत्रे स्वीकारून १० मार्चच्या सुमारास डॉ. केसकर भारतात परतणार आहेत. आता जास्तीत जास्त वेळ भारतात रहावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दिनेश केसकर यांचा जन्म राजकोटमध्ये झाला असला तरी मूळ अमरावतीकर अशीच त्यांची ओळख आहे. डॉ. केसकर यांच्या नियुक्तीची घोषणा आज अमेरिकेत झाली.

श्री मलंगगड यात्रा; बजरंग दलाच्या ३६ कार्यकर्त्यांना अटक
कल्याण, १० फेब्रुवारी/वार्ताहर

श्री मलंगगडावर काल रात्री घोषणाबाजी, बॅनर फाडणे यावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून बजरंग दलाच्या ३६ जणांना अटक केली. यामुळे हिललाइन पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण तयार झाले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त स्मिता पाठक यांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई केली. श्री मलंगगडावर दर्शनासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते दर्शनास जात होते. मलंगबाबा की जय, जय श्रीराम अशा घोषणा देत पालखी तळाकडे जात असताना धक्काबुक्की झाली. यामध्ये दोन जमावांत हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला व रवींद्र चौधरी, अर्जुन भाबड, पराग तेलीसह ३६ जणांना पोलिसांनी अटक केली. याबाबत हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना उल्हासनगर न्यायालयात उभे केले असता दोन हजाराच्या जामीनावर सुटका करण्यात आली.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८