Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

सशस्त्र चोरांनी दोघांना रेल्वेतून खाली फेकले
माहिती लपविण्याचा पोलिसांचा प्रयत्न
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी
परळीनजीक विजयवाडा एक्सप्रेसमध्ये चोरांनी गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री चार चोरांनी दौंड-नांदेड पॅसेंजरमध्ये धुमाकूळ घातला. महिला-पुरुष प्रवाशांना चोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दागिने काढून घेतले. प्रतिकार करणाऱ्या दोघांना त्यांनी गाडीतून खाली फेकून दिले. औरंगाबादपासून ६५ किलोमीटर अंतरावर परसोडा ते लासूर स्थानकांदरम्यान काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकशाही दिन बंदच करा!
सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी वारंवार शासकीय यंत्रणेपुढे मांडत असतात. परंतु त्यावर गाऱ्हाणे ऐकणारे अधिकारी बऱ्याच वेळी बैठका, सभा व दौरे इ. कारणांमुळे जनतेला उपलब्ध होत नाहीत आणि पर्यायाने जनतेच्या गाऱ्हाण्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने २९ डिसेंबर १९९९ रोजीच्या निर्णयानुसार २०००पासून ‘लोकशाही दिन’ सुरू केला. जिल्ह्य़ाच्या मुख्यालयी हा दिवस दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि विभागीय पातळीवर हा दिवस दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी बोलाविण्यात येतो. लोकशाही दिनी सर्व जिल्हाप्रमुखांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा असते. शासनाच्या आदेशानुसार गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्याच ठिकाणी समाधानकारक उत्तर देणे अपेक्षित आहे.

संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
बीड, १० फेब्रुवारी/वार्ताहर

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या तयारीचा सर्व समित्यांकडून कार्याध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आज आढावा घेतला. पाचही रंगमंचांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. साऱ्या शहरवासीयांना आता उत्सुकता आहे पडदा उघडण्याची! येत्या शनिवारी (दि. १४) व रविवारी (दि. १५) होणाऱ्या मराठी नाटय़ संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्सुकता वाढली आहे. डॉ. क्षीरसागर यांनी संमेलनाच्या तयारीसाठी नेमलेल्या विविध समित्यांच्या कामकाजाचा आज आढावा घेतला. पोलीस प्रशासनाने कार्यक्रमस्थळी सुरक्षिततेची पाहणी केली.

रावसाहेब आणि चंद्रकांत दानवेंच्या वादात विहिरी रखडल्या
अधिकाऱ्यांसाठी ‘इकडे आड तिकडे विहिर’ परिस्थीती
रवींद्र देशपांडे
भोकरदन, १० फेब्रुवारी

खासदार रावसाहेब दानवे व आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वादात भोकरदन तालुक्यातील २००७-०८ या वर्षीच्या १७६ जवाहर विहिरींना अद्यापि मंजुरी मिळालेली नाही. या विहिरींचे काम रखडल्याने एक कोटी ७६ लाख रुपये पडून आहेत. अनुदान असलेली विहीर आपल्याला मिळेल, या अपेक्षेने भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी दोन्ही नेत्यांचे उंबरठे झिजवून हैराण झाले आहेत.
तालुक्यास मंजूर झालेल्या १७६ विहिरींसाठी भोकरदन पंचायत समितीकडे १७३२ लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

फरारी आरोपी झाला पालिकेचा सभापती
निलंगा, १० फेब्रुवारी/वार्ताहर

खुनाच्या प्रयत्नातील फरारी म्हणून पोलिसांनी घोषित केलेल्या ईश्वर पाटील याची नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आज पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी प्रतिष्ठापना केली.
ईश्वर पाटील याच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तो फरारी असल्याचे घोषित केले आहे. परंतु जामीन मिळवण्याअगोदरच पोलिसांशी हातमिळवणी करून त्याने आज सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वत: दाखल केला. पोलिसांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली.नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रलंबित राहिली होती. आज सत्ताधारी आघाडीचे विनोद आर्य, ईश्वर पाटील, बालाजी दोरवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी मंदार वैद्य यांनी केली. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी मंदार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकरप्रणीत आघाडीचे विनोद आर्य यांची बांधकाम सभापतिपदी, ईश्वर पाटील याची पाणीपुरवठा सभापतिपदी व बालाजी दोरवे यांची आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेसच्या सदस्यांचे अर्ज अनुमोदक नसल्याने फेटाळण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी एस. टी. चव्हाण यांनी काम पाहिले.

‘डी. लिट.ला विरोध हा तर बदनामीचा डाव’
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘‘माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना समारंभपूर्वक डी. लिट. पदवी देण्यास होणारा विरोध म्हणजे विद्यापीठाच्या बदनामीचा डाव आहे,’’ असाा आरोप काँग्रेसचे नगरसेवक व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी आज केला. श्री. देशमुख यांना डी. लिट. पदवी देण्यास विरोध करीत रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन या संघटनेने काल विद्यापीठात निदर्शने केली होती. श्री. पाथ्रीकर म्हणाले, ‘‘पदवी देणे सर्वस्वी विद्यापीठाचा अधिकार आहे. त्यासाठी विविध समित्यांपासून थेट कुलपतींचा सल्ला घेण्यात येतो. विलासरावांचे मराठवाडय़ाच्या विकासात उल्लेखनीय कार्य आहे. त्यामुळेच त्यांना डी. लिट. देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या या निर्णयाचा आपण आदर करायला हवा. अशा पद्धतीने या सन्मानाला गालबोट लावू नका.’’‘‘वामनदादा कर्डक यांना ही पदवी द्यायला हवी होती, अशी आंदोलकांची मागणी होती. आणखी कोणाचेही नाव सुचवा; तो तुमचा अधिकार आहे. वामनदादांनाही ही पदवी द्यायला हवी. त्यांना या वेळी जाहीर झाली नाही म्हणून विरोध करणे अयोग्य आहे,’’ असेही श्री. पाथ्रीकर म्हणाले. आपले विद्यापीठ १६ वर्षे नामांतराच्या लढय़ामुळे होरपळले आहे. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पूर्वीच्या घटनांतून बोध घेत आपल्या विद्यापीठाची बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक डॉ. वारके यांची बदली
बीड, १० फेब्रुवारी/वार्ताहर

पोलीस अधीक्षक डॉ. सुहास वारके यांची मुंबई येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. त्यांच्या जागी नागपूर येथून लखमी गौतम येणार आहेत. श्री. वारके दीड वर्षांपूर्वी सोलापूर येथून बदलून आले. शांत व संयमी अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्यकाळात काठोडा येथील महिलांवरील अत्याचाराचे मोठे प्रकरण समोर आले होते. या गुन्ह्य़ाचा तपास करून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. नवे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी काही काळ बीड येथे सहायक अधीक्षक म्हणून काम केले आहे.

चिवरीच्या यात्रेमध्ये शेकडो पशुबळी!
नेताजी मुळे
नळदुर्ग, १० फेब्रुवारी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची पाठ फिरताच तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मीच्या यात्रेत ‘लक्ष्मीदेवीचा उदो-उदो’ म्हणत हजारो भाविकांनी शेकडो बकऱ्यांचा व कोंबडय़ांचा बळी देऊन नवस पूर्ण केला.चिवरी येथील महालक्ष्मीच्या यात्रेस आज सुरुवात झाली. या यात्रेत लक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्याकरिता व नवसपूर्तीसाठी महिला-पुरुष सहकुटुंब मोठय़ा संख्येने मंदिर परिसरात जमले होते. चिवरी यात्रा वीस वर्षांपूर्वी ‘पशुहत्या यात्रा’ म्हणून ओळखली गेली होती. नवस पूर्ण करण्यासाठी यात्रेकरू कोंबडय़ा व बकऱ्यांचा बळी देत. काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व पोलीस प्रशासनाने पशुहत्या बंद केली होती. त्यानंतर मध्यंतरीची काही वर्षे ही यात्राच नाममात्र भरत असे. भाविक यात्रेत न येता बारमाही येऊन पशुहत्या करून आपला नवस पूर्ण करीत असत. यंदाही यात्रा भरणार नाही, असे वाटत असतानाच भाविक मोठय़ा संख्येने आले. हातात कोंबडय़ा-बोकड घेऊन त्यांच्या देवीच्या समोर बळी दिला जात होता. यामुळे मंदिर परिसरात रक्ताचा सडा पडला होता. मंदिर समितीने नियोजन केले नसल्याने स्वच्छता व पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोसळले. पशुहत्या करू नये, असे आवाहन नळदुर्गचे सहायक पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना यात्रा समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन केले होते. त्याचा उपयोग झाला नाही.

स्टेडियमवर सोनियांची सभा; कारवाईचा आदेश
नांदेड, १० फेब्रुवारी/वार्ताहर

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभेसाठी श्रीगुरू गोविंदसिंग स्टेडियमचा वापर पक्षाला करू दिल्याबद्दल कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिला आहे.स्टेडियमचा वापर केवळ शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमासाठी करण्यात यावा, असे स्पष्ट संकेत असताना ७ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीमती गांधी यांची या स्टेडियमवर सभा झाली. या बाबत सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ अहमद यांनी नगरविकास विभागास कळविले होते. नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकारी माधुरी गावंडे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या आदेशात म्हटले असहे की, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.

पोलीस कल्याण निधीतील गैरव्यवहार प्रकरणी लिपिकास अटक
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

पोलीस आयुक्तालयातील पोलीस कल्याण निधीतून ६६ हजार ६०० रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिक बी. एस. शेजवळ आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महेश चौधरी यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातील शेजवळ यास अटक करण्यात आली असून त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौधरी हा अद्यापि पोलिसांना सापडला नाही.चौधरी आणि शेजवळ हे दोघे १६ मार्च २००७ पूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस कल्याण निधी विभागात रोखपाल म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी खोटय़ा पावत्या तसेच स्टँपवर बनावट स्वाक्षऱ्या करून ६६ हजार ६०० रुपये काढून घेतले. चौकशीत अपहार स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली. गुन्ह्य़ाची नोंद झाल्यानतंर रात्रीच शेजवळ यास अटक करण्यात आली होती. त्याला आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता १२ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विजयाश्री गोडबोले यांनी दिले. चौधरी पोलिसांना सापडला नाही.

‘बाशिंग गुडघ्याला नव्हे कपाळावरच’
डॉ. दत्ता पाथ्रीकर यांचा दावा
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी मी गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांपैकी नाही. बाशिंगाची जागा कपाळावर असते आणि मी ते तेथेच बांधणार’ असा दावा लोकसभेसाठी औरंगाबाद आणि जालना मतदारसंघातून इच्छूक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.गेल्या वेळीही माझा दावा होता. माझी इच्छा मी श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र ऐन वेळी रामकृष्ण बाबा पाटील यांना संधी देण्यात आली. माझ्यावर अन्याय हा झालेलाच आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी मी श्रेष्ठींकडे माझी मागणी नोंदविली आहे. मी गुडघ्याला बाशिंग मुळीच बांधलेले नाही. बाशिंगाची जागा कोठे असते याची मला कल्पना आहे आणि म्हणूनच मी कपाळावरच बाशिंग बांधणार असल्याचे ते म्हणाले. उत्तमसिंग पवार यांचे नाव सध्या औरंगाबाद लोकसभेतून चर्चेत आहे. यावर प्रश्न उपस्थित केला असता ते जालना मतदारसंघातून लढले आहेत. तरीही त्यांची जालना सोडून औरंगाबादेतून लढण्याची इच्छा असेल तर त्यांना उमेदवारी देण्यात यावी आणि माझा जालन्यासाठी विचार करावा, अशी सूचनाही आपण केल्याचे त्यांनी सांगितले.औरंगाबाद जिल्ह्य़ातून शिवसेनेला हद्दपार करण्याची संधी या वेळी काँग्रेसला आहे. सेनेच्या दादागिरीला मतदार कंटाळले असून त्यांना चांगला पर्याय हवा आहे आणि या वेळी वातावरणही चांगले आहे. यदाकदाचित लोकसभेसाठी विचार न झाल्यास पुढे विधानसभेसाठी पक्ष नक्कीच विचार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पक्षाने सांगितल्याने इच्छा नसतानाही आपण नगरसेवक झालो आहे. त्यामुळे पक्षाच्या सोयीनुसार लोकसभा नाही तर विधानसभाही चालेल असे त्यांनी सांगितले.

सर्व धर्मीयांबरोबर शिवजयंती साजरी करा -टोपे
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

सर्व धर्मीयांना सोबत घेऊन शिवजयंती साजरी करावी. शिवजयंतीला म्हणजेच १९ फेब्रुवारीला शासकीय सुटी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिले. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन निराला बाजार येथे सोमवारी रात्री श्री. टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव जाधव यांनी शिवसप्ताह साजरा करण्यात येईल, असे घोषित केले. या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, आमदार विक्रम काळे, मधुकरराव मुळे, उत्तमसिंग पवार, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रेचे जोरदार स्वागत
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण रथयात्रेचे स्वागत औरंगाबाद शहरात मोठय़ा थाटात करण्यात आले.औरंगाबाद शहरातील चौकाचौकांमध्ये महिलांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. फटाके वाजविण्यात आले. मोटारसायकलची रॅलीही काढण्यात आली. हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रथयात्रेत नाभिक समाजाचे अध्यक्ष कल्याणराव दळे, राम पेरकर, माणिक कांबळे आदी सहभागी झाले आहेत. ओबीसी सवलतीवरील अतिक्रमण हाणून पाडा, २०११ ची जनगणना करताना ओबीसींसह सर्व जातींची जनगणना करण्यात यावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण देऊन मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करावी. नचिअप्पन कमिशनचा अहवाल मंजूर करा, न्या. बापट कमिशनच्या शिफारशी लागू करून सराफ कमिशन रद्द करावे अशा विविध मागण्या यात्रेकरूंनी केल्या आहेत. हर्सूल, शहागंज, सिटीचौक, सावता महाराज मंदिर आणि महात्मा फुले पुतळा या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर गुलमंडी, पैठणगेट, क्रांतीचौक, आकाशवाणी, गजानन मंदिर, मुकुंदवाडी, चिकलठाणामार्गे ही रॅली जालन्याकडे रवाना झाली. या यात्रेचा समारोप नगर येथे १ मार्चला होणार आहे.

बीडमध्ये रंगला स्थानिक कलावंतांचा कलाविष्कार
बीड, १० फेब्रुवारी/वार्ताहर

विनोदी नाटिका, एकपात्री अभिनय आणि विडंबन यातून प्रेक्षकांना खिळवून ठेवत मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची झळ रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना किती सोसावी लागली, याची तीव्रता कलाकारांनी नाटिकेतून सादर केली. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक कलावंतांच्या कलाविष्काराची सोमवारची संध्याकाळ विनोदी नाटिका, एकपात्री अभिनय, विडंबन या कलाप्रकाराने चांगलेच रंगले. छोटय़ा कलाकारांनी साकारलेले समाजजीवनातील वास्तव चित्र प्रेक्षकांना भावून गेले. मधुरा जोशी व वैष्णव जोशी या कलाकारांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठय़ांप्रमाणेच रस्त्यावर पोट भरणाऱ्या गरीब माणसाला मोठय़ा प्रमाणात झळ सोसावी लागली याचे जिवंत चित्र साकारले. एसआरटी महाविद्यालय ग्रुपने अद्भूत असे देवांचे विडंबन नाटय़ सादर केले. आजचे जग निर्मितीचे शास्त्रीय संशोधन आणि अध्यात्माचे ब्रह्मांनी केलेली जगाची निर्मिती यावर खोचक भाष्य या नाटिकेत केले. या अभिनय संध्येचे आकर्षण ठरली ती गेवराईच्या गीतांजली ग्रुपने सादर केलेली कलियुगाची कथा ही ज्येष्ठ कलाकारांची नाटिका. यामध्ये आजच्या युगातील मानवी विकृतीवर प्रकाश टाकण्यात आला. या नाटिकेत सुभाष निकम, राजेंद्र बायस, प्रा. राजेंद्र बरकसे सहभागी झाले होते. संतोष कसबे या हुन्नरी कलाकाराने ‘भगुन माझं बघा’ या लोकगीतावरनृत्य सादर केले.

विभागीय आयुक्तालयाचा वाद;सुनावणी आठवडाभर लांबली
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

नांदेड येथे नवीन विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकांची सुनावणी आठवडाभर लांबली आहे. या याचिकेची सुनावणी आता १७ फेब्रुवारीला होणार आहे.
याचिकाकर्ते अ‍ॅड. सय्यद रज्जाक पटेल, अ‍ॅड. उदय गवारे आणि आमदार सुरेश देशमुख यांनी याचिका केली. याचिकाकर्त्यांच्या वतीने राज्य शासनाकडे एक प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकील नंदकुमार खंदारे यांनी न्यायालयात केली. न्या. पी. व्ही. हरदास व न्या. के. के. तातेड यांनी ही विनंती मान्य केली. अ‍ॅड. खंदारे यांचे निवेदन मात्र त्यांनी ऐकून घेतले. आता या याचिकेची सुनावणी एक आठवडय़ानंतर म्हणजे १७ फेब्रुवारीला होणार आहे.

नांदेड जिल्हाधिकारीपदी श्रीकर परदेशी रुजू
नांदेड, १० फेब्रुवारी/वार्ताहर

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून आज भारतीय प्रशासन सेवेतील डॉ. श्रीकर परदेशी यांनी सूत्रे स्वीकारली.
नांदेडचे जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने गेल्या आठवडय़ात त्यांची बदली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहसंचालकपदी झाली होती, तर त्यांच्या जागेवर अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. परदेशी यांच्या बदलीला अकोल्यातील जनतेने विरोध केल्याने ते नांदेडमध्ये कधी रूजू होतील याबाबत तर्क-वितर्क लावले जात असताना सायंकाळी पाच वाजता त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. लोकाभिमुख, मितभाषी तसेच पारदर्शी कारभार करणारा अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. श्रीकर परदेशी आज रुजू झाल्याने राधेश्याम मोपलवार यांना नांदेडतून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री. मोपलवार यांनी आपल्या कारकीर्दीत गुरू-ता-गद्दी सोहळा, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान कार्यक्रमासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.

शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप
औरंगाबाद, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

यापुढे माध्यमिक शाळा संहितेनुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात शालेय शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मात्र जुन्याच पद्धतीने ही भरती करण्याचा शासन निर्णय जाहीर केला. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांची एकप्रकारे फसवणूक झाली असल्याचा आरोप औरंगाबाद जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. याच्याविरोधात लढा उभारण्यासाठी उद्या (बुधवार) दुपारी तीन वाजता आ. कृ. वाघमारे शाळेत कर्मचाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.

नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला नांदेड जिल्ह्य़ात १४ हजार विद्यार्थी
परीक्षा केंद्रांवरील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांना त्रास
नांदेड, १० फेब्रुवारी/वार्ताहर

नांदेड जिल्ह्य़ात नवोदय विद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. १७ हजार २५७ पैकी सुमारे १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनेक केंद्रांवर गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.पाचव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. नांदेड जिल्ह्य़ातील १६ तालुक्यांत ३८ केंद्रांवर ही परीक्षा झाली. एकूण १७ हजार २५७ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. हदगाव तालुक्यातल्या जांभळा केंद्रांतर्गत काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. नांदेड तालुक्यात दोन हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. शहरातल्या चार परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यापैकी खालसा हायस्कूलमध्ये झालेल्या परीक्षेत परीक्षार्थ्यांना अनेक गैरसोयी सहन कराव्या लागल्या. काही वर्गाँमध्ये बाके नव्हती त्यामुळे पालकांनी नापसंती व्यक्त केली. शिक्षणाधिकारी आनंद वाढे हे बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. उपशिक्षणाधिकारी अशोक देवकरे यांनी जिल्ह्य़ात नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा सुरळीत झाल्याचा दावा केला आहे.

गुण वाढविण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याची तक्रार
मानवत, १० फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील रत्नापूर येथील लोणार शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गुण वाढविण्यासाठी विद्यार्थी व पालकाकडून पैशांची मागणी होत असल्याची तक्रार येथील भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक संजयकुमार नाईक यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.रत्नापूर गावी एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. या ठिकाणी निवासी विद्यार्थी राहतात. संस्थेकडून मुलांचे शैक्षणिक शुल्क घेतले जात असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या महिन्यात सुरू होत आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अथवा चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी संस्थाचालक करीत आहेत. त्यामुळे परिसरातील पालक व विद्यार्थ्यांची एकप्रकारे पिळवणूक होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे भारतीय विद्यार्थी सेनेने केली आहे. या निवेदनात गत वर्षी या कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवाढ प्रकरणाचा देखील उल्लेख असल्याने मंडळाने या वर्षी या महाविद्यालयास परीक्षा केंद्रच देणे उचित नाही. गेल्या वर्षी १४ विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आल्याचे प्रकरण शिक्षणाधिकाऱ्यांनी दाबून टाकल्याने संपूर्ण राज्यात महाविद्यालयाची चर्चा होती. येथील परीक्षा केंद्र त्वरित रद्द करून मानवतला जोडावे व विद्यार्थी-पालकांची होणारी पिळवणूक बंद करावी. तसे न झाल्यास भारतीय विद्यार्थी सेनेचे मानवत तालुक्याचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

कारखाने लवकर बंद झाल्याने ऊसतोड कामगार परतीच्या मार्गावर
सोयगाव, १० फेब्रुवारी/वार्ताहर

ऊस कारखाने यंदा लवकर बंद पडल्याने ऊसतोडीसाठी गेलेली ऊसतोड कामगार आपल्या घरी परतत आहे. यावर्षी या कामगारांची झोळी रिकामीच राहिली. ऊसाअभावी यावर्षी अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर वेळेअभावी बंद झाल्याने मोठा फटका बसला तो मजुराला. या मजुंराच्या आयुष्यात वर्षभर जीवन जगण्यासाठी संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. निसर्गाने साथ दिली नाही. गावात काम नाही म्हणून दसऱ्याला ठेकेदाराकडून उचल घेऊन बैलगाडीवर बिऱ्हाड बांधून ऊसतोडीसाठी गेलेले ऊसतोड कामगार या वर्षी कमनशिबी ठरले. उसाचे क्षेत्र झपाटय़ाने कमी झाल्याने या गावाहून दुसऱ्या गावाकडे रोजची भटकंती. एवढंच नाही तर विदर्भातील एका ठेकेदाराने अनेक मजुरांना वाऱ्यावर सोडून दिले. तेव्हा या मजुरांच्या कुटुंबीयांना भीक मागून घरी परतावे लागले. यंदाच्या हंगामात चांगली आमदानी होईल या आशेने गेलेल्या ऊसतोड कामगारांचे स्वप्न भंग पावले.दरवर्षी मार्चमध्ये घरी येणारी मंडळी या वर्षी फेब्रुवारीपासून घरी परतू लागली आहे. यंदा जेमतेम कमाई पदरात पडली. दुष्काळाचे सावट समोर आहे. शेतात काम नाही. भिस्त आहे मायबाप सरकारवर तर रोजगार हमीचीही कामे बंद आहे. काय करावे हा यक्ष प्रश्न ऊसतोड कामगारांसमोर उभा आहे.