Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

स्वरभास्कराच्या अंगणी साजरी झाली दिवाळी
पुणे, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन संगीतातील विठोबारुपी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या आजवरच्या संगीत साधनेची राष्ट्रपतींच्या वतीने आज पूजा करण्यात आली. सर्वोच्च पुरस्काररूपाने पूजेचा हा सोहळा विठोबाच्या गाभाऱ्यात म्हणजेच पुण्यातील ‘कलाश्री’ या त्यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या व छोटेखानी समारंभाद्वारे पार पडला. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वतीने केंद्रीय गृहखात्याचे अतिरिक्त सचिव ए. एफ. अहमद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.देशातील हा सर्वोच्च सन्मान पंडितजींना जाहीर झाला तेव्हापासून देशातील संगीतप्रेमींमध्ये आनंद साजरा केला जात आहे.
हा सन्मान दिल्लीत एका मोठय़ा समारंभात दिला जातो. पंडितजींच्या प्रकृतीमुळे पंडितजींच्या घरी हा समारंभ आयोजित करण्यात आला. गृह खात्याचे कक्ष अधिकारी अरुण सोबती, राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे विभागाचे आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, पंडितजींचे चिरंजीव श्रीनिवास जोशीसह सर्व कुटुंबीय, आनंद भाटे, उपेंद्र भट आदी निवडक मंडळींची उपस्थिती यावेळी होती.
अकरा वाजून ५५ मिनिटांनी गृह खात्याचे अतिरिक्त सचिव अहमद हे कलाश्रीवर दाखल झाले. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये हा पुरस्कार प्रदान समारंभ झाला. पंडितजींच्या चेहऱ्यावर आज वेगळाच नूर उपस्थितांना पाहायला मिळाला. चेहऱ्यावरचे दिव्य तेज आजही तसेच कायम होते. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार अत्यंत घरगुती समारंभात स्वीकारून तेजस्वी पुरुषाची झलकच पंडितजींच्या या कृतीतून उपस्थित संगीत रसिकांना आज अनुभवयाला मिळाली.
अहमद यांनी आपण राष्ट्रपतींच्या वतीने आपणास पुरस्कार देण्यास आलो आहोत असे पंडितजींना इंग्रजीतून सांगताच त्याच भाषेतून स्वरभास्कराने त्यांना उत्तर दिले. पंडितजींनी त्यांना इंग्रजीतून विचारले,‘‘ आपण कोणत्या गावचे?’, त्यावर अहमद यांनी ‘बिहारचा’ असे उत्तर देताच ‘राजांच्या गावचे तर तुम्ही. म्हणजे पंडित नेहरू यांचे त्यावेळचे असलेले सचिव हे राजा नावाचे होते,’ असा संदर्भही पंडितजींनी यावेळी देऊन आपली स्मरणशक्ती आजही तल्लख असल्याची प्रचिती दिली. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंडितजी यांनी राष्ट्रपतींचे आभार मानून, ‘‘आपली तब्येत बरी नसल्याने आपल्याला तिकडे येता आले नाही. हा पुरस्कार दिल्याने त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या संगीत साधनेवर आजवर अनेकांनी प्रेम व्यक्त केले त्यांचेही मी आभार मानतो.’’ पुरस्कार समारंभानंतर केंद्रीय अतिरिक्त गृहसचिव अहमद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ साधारणत: राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिल्लीत एका समारंभात दिला जातो. त्यासाठी पंडितजींना दिल्लीत आमंत्रित करण्यात आले होते. आपली प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगितल्याने राष्ट्रपतींनी येथे येऊन पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली होती.