Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

केईएममध्ये डॉक्टरांना मारहाण
संप मागे
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

रूग्णावर तातडीने उपचार केले नाही आणि नंतर शवविच्छेदन करण्यासही उशीर लावला, असा आरोप करीत के. ई. एम. मध्ये डॉक्टरांना सोमवारी रात्री झालेल्या मारहाणीनंतर संतप्त झालेल्या डॉक्टरांनी सकाळपासून संप पुकारला. पोलिसांनी मारहाणप्रकरणी पाच जणांना अटक केल्यानंतर संध्याकाळी डॉक्टरांनी संप मागे घेतला.
लालबाग येथे राहणारे वासुदेव कोचरे यांना सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास के. ई. एम. रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र ४.४५ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. कोचरे यांचे शवविच्छेदन लवकर करावे अशी त्यांच्या नातेवाईकांची मागणी होती. मात्र सर्व कागदपत्रे वेळेवर दाखल न केल्याने रात्री उशीरापर्यंत पोलीस पंचनामा झाला नाही. पोलीस पंचनामा होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करता येणार नाही, असे डॉक्टरांनी कोचरे यांच्या नातेवाईकांना सांगितले. डॉक्टर मुद्दामहून उशीर करीत आहेत, या गैरसमजुतीतून तेथे जमलेल्या कोचरे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घालत तोडफोडीला सुरूवात केली. तेथील खुच्र्या उचलून डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांच्या अंगावर फेकण्यात आल्या. हा प्रकार रात्रौ ११.३० च्या सुमारास घडला. या मारहाणीत डॉ. सुधीर जाधव, डॉ. सुनील कुंभार, डॉ. राहुल गुप्ता, डॉ. ओबेद सय्यद व डॉ. सुनील हे जखमी झाले. डॉक्टरांना मारहाणीपासून वाचवायला गेलेला सुनील भोसले हा सुरक्षारक्षकही मारहाणीत जखमी झाला.
डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटनेने संतप्त झालेल्या डॉक्टरांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाने रूग्णांचे हाल झाले. दुपारी अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये, माधव सांगळे, डॉक्टर तसेच पोलीस यांची बैठक झाली. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीसांनी दिले. भोईवाडा पोलीसांनी मारहाण प्रकरणी गणेश आडिवरेकर, सतीश सांडव, रोहन मेहर, अंबरनाथ पाटसकर, योगेश साळसकर यांना अटक केली. हल्ल्याच्या वेळी बंदोबस्तावर असलेले परंतू डॉक्टरांना वाचवण्यासाठी पुढे न आलेल्या सुरक्षारक्षकांवर कारवाई करावी अशीही डॉक्टरांची मागणी होती. पालिकेने याप्रकरणी चार सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. प्रशासनाची ही कारवाई म्हणजे वडय़ाचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार आहे, केईएममध्ये ४२ पॉईंटवर सुरक्षा रक्षकांची गरज आहे. रूग्णालयात ६० सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे, सशस्त्र सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने हा प्रकार झाला असा आरोप महापालिका कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केला.