Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बराक ओबामा यांचा पाकिस्तानला कडक इशारा
वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी/पी.टी.आय.

 

अल- काइदा आणि तालिबानी अतिरेक्यांना पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात मुक्तपणे फिरू दिले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिला. पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवरील डोंगराळ भाग हा अल -काइदा आणि तालिबानी अतिरेक्यांचा बालेकिल्ला समजला जातो. या भागात त्यांना मुक्तपणे फिरू देणार नाही, असा संदेश घेऊन आपले विशेष दूत रिचर्ड होलब्रूक इस्लामाबादला गेले आहेत, असे ओबामा यांनी पत्रकारांना सांगितले.
या सीमावर्ती भागातील अतिरेक्यांच्या कारवायांमुळे अमेरिकेला जेवढा धोका आहे, तेवढाच धोका पाकिस्तानलाही आहे. त्यामुळे हा धोका मुळापासून संपविण्यासाठी अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, हे होलब्रूक पाकिस्तानला समजावून सांगणार आहेत, असे ओबामा म्हणाले. या सीमावर्ती आदिवासी प्रदेशातून अतिरेक्यांचा नायनाट करण्याच्या उद्देशानेच होलब्रूक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रदेशातील अतिरेक्यांच्या मुक्त संचाराला आळा घालण्यासाठी गंभीर आणि ठोस उपाय योजले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आम्हाला कार्यक्षमपणे आणि सातत्याने काम करावे लागेल, असे ते म्हणाले. आपले प्रशासन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसंबंधी धोरणाचा आढावा घेत असल्याचेही ते म्हणाले.अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य मागे घेण्याबाबत काही कालबद्ध कार्यक्रम ठरला आहे काय, असे विचारले असता ओबामा म्हणाले, असे काहीही वेळापत्रक मी ठरविलेले नाही. मी फक्त एकच गोष्ट पक्की केली आहे ती म्हणजे या प्रदेशातून अल काइदा अथवा ओसामा बिन लादेनला अमेरिकी भूमीवर हल्ला करण्याची योजना शिजवू देणार नाही.दरम्यान, येत्या काळात इराणसंबंधीचे आपले धोरण बदलेल, असे संकेतही ओबामा यांनी दिले. इराणबरोबर थेट बोलणी होण्याच्या उद्देशाने हे धोरण आखले जाईल, असे ओबामा म्हणाले. परस्परांसंबंधी योग्य तो आदर राखून संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता मला दिसते आहे, मात्र आता अनुकूल संकेत देण्याची जबाबदारी इराणची आहे, असे ते म्हणाले.