Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भारताची श्रीलंकेवर मात
एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात तीन विकेट्सनी विजय
कोलंबो, १० फेब्रुवारी/वृत्तसंस्था

 

इरफान आणि युसूफ यांच्या पठाणी हिसक्यामुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध ट्वेन्टी-२० लढतही जिंकली. १६ व्या षटकांत ७ बाद ११५ अशा बिकट अवस्थेतून पठाण बंधूंनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून २५ चेंडूत ५९ धावांची भागीदारी करीत विजय श्रीलंकेच्या हातून हिसकावून घेतला. श्रीलंकेचे १७२ धावांचे आव्हान भारताने दुसऱ्याच षटकांत सेहवाग-गंभीर ही सलामीची जोडी गमाविल्यानंतर कठीण वाटू लागले होते. लेगस्पिनर बंदाराने रैना, धोनी आणि जाडेजा आणि जयसूर्याने रोहित शर्मा ही भारताची मधली फळी ५ षटकांत तंबूत पाठविली आणि सामन्याचे चित्रच पालटले.
४ बाद ९९ वरून भारताची अवस्था ७ बाद ११५ अशी झाली. त्यावेळी विजयासाठी भारताला ५७ धावांची आवश्यकता होती. भारताकडे चेंडू होते अवघे २९. लेगस्पिनर बंदाराने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले होते. त्याचवेळी युसूफ पठाणने बंदाराचा पहिलाच चेंडू सीमापार पाठवून भारताची झुंज संपली नसल्याचे जाहीर केले. युसूफने बंदाराचा नंतरचा चेंडू सरळ साईटस्क्रीनवर पाठविला. त्यानंतरचा लाँगऑन पलिकडच्या स्टॅण्डमध्ये पाठवून विजयाचे लक्ष्य आवाक्यात आणले.
युसूफ-इरफान या पठाण बंधूंनी २५ चेंडूत ५९ धावांची नाबाद भागिदारी केली. आज ऑस्ट्रेलियात अ‍ॅडलेडला डेव्हिड आणि मायकल या हसी बंधूंनी ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून दिला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारताच्या पठाण बंधूंनी आपल्या देशाला विजयाचा किनारा गाठून दिला. युसूफच्या आक्रमणामुळे गर्भगळीत झालेल्या श्रीलंकन गोलंदाजांनी मग नांगी टाकली. दिलहारा फर्नाडोने तर ५ वाईड चेंडू टाकले. लसिथ मलिंगाचीही गोलंदाजीची लय गेली.
मात्र युसूफवर लक्ष केंद्रित करण्याची दुसऱ्या टोकाकडून १६ चेंडूत नाबाद ३३ धावा फटकाविणाऱ्या इरफानने विजयश्री श्रीलंकेच्या हातून अलगद पळविली. युसूफने १० चेंडूत २२ धावा फटकाविल्या. युसूफने १ तर, इरफानने २ चौकार मारले. दोघांनाही २-२ उत्तुंग षटकार मारून विजय भारताच्या आवाक्यात आणून दिला. दोन बळी व आक्रमक २२ धावा काढणाऱ्या युसूफ पठाणला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले. गंभीर (१३), सेहवाग (१) ही भारताची सलामीची जोडी लवकर तंबूत परतल्यानंतर युवराजसिंग (३२) व सुरेश रैना (३५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागिदारी केली. या भागिदारी दरम्यान भारतीयांनी षटकामागे १० पेक्षा अधिक सरासरी धावांचा वेग कायम राखला होता. मात्र युवराजसिंग बाद झाला. पाठोपाठ रैना तंबूत परतला. खेळपट्टीवर जम बसलेले हे दोन आक्रमक फलंदाज तंबूत परतल्यानंतर भारताने धोनी (१३), शर्मा (४), जाडेजा (४) ही मधली फळी लवकर गमाविली.
मात्र त्यानंतर घडले ते श्रीलंकन क्रिकेटरसिकांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे होते. २५ चेंडूत ५९ धावांची अभेद्य भागिदारी करून या जोडीने भारताच्या विश्वविजेतेपदाचा मुकुट खाली उतरू दिला नाही.