Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबच्या जीवाला दाऊदपासून धोका?
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेल्या अजमल अमीर कसाब या अतिरेक्याची हत्या करण्यासाठी कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने आपले खतरनाक नेमबाज मुंबईत पाठविल्याची माहिती गुप्तचर विभागाने मुंबई पोलिसांना गेल्या आठवडय़ात दिल्याचे कळते. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. कसाब जिवंत राहणे हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे त्याला ठार मारण्याचा प्रयत्न होईलच, असे गृहित धरून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त राकेश मारीया यांनी आज वार्ताहरांना सांगितले. कसाबला ठार मारण्यासाठी दाऊदने काही नेमबाजांची नियुक्ती केली असल्याची माहिती एका दूरध्वनी संभाषण टॅप करताना २९ जानेवारी रोजी बाहेर आल्याबाबत गुप्तचर विभागातील सूत्रांचा हवाला देत काही खासगी वृत्तवाहिनींनी वृत्त दिले होते. मात्र कसाबला ठार मारण्याचा प्रयत्न होईल, असे गुप्तचर विभागाने वेळोवेळी दिलेल्या माहितीच्या आधारे सुरुवातीपासूनच त्याला अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. तसेच तो आत्महत्या करील हे गृहित धरूनही त्याच्यावर २४ तास पाळत असल्याचेही मारीया यांनी सांगितले. कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेमुळेच न्यायाधीशांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कसाबला अटक केल्यानंतर ९० दिवसांची मुदत २४ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्याआधी केव्हाही कसाबवर आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही मारीया यांनी सांगितले. दाऊदने नेमबाज पाठविल्याच्या दाव्याबाबत विचारले असता अशी विशिष्ट माहिती आमच्यापर्यंत आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.