Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एटीसीतील गोंधळाचा फटका सुशीलकुमार आणि विलासरावांच्या हेलिकॉप्टरलाही..
मुंबई, १० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान आणि राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर यांतील टक्कर सुदैवाने काल टळली. यावरून एकमेकांना दोष देण्याचे उद्योग भारतीय हवाई दल आणि हवाई नियंत्रण कक्षात सुरू असतानाच काल नेमक्या त्याच वेळी हवाई नियंत्रण कक्षाच्या गोंधळाचा फटका केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हेलिकॉप्टरला बसला.
हवाई नियंत्रण कक्षाने हिरवा कंदील दिल्याने या हेलिकॉप्टरने उड्डाण केले पण त्याच वेळी राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचा ताफा येत असल्याचे लक्षात येताच मिनिटभरातच या नेत्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविण्यात आले.
नेवासे येथे होणाऱ्या समारंभासाठी सोमवारी सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख हे खासगी हेलिकॉप्टरने जात होते. सकाळी नऊच्या सुमारास मुंबई हवाई नियंत्रण कक्षाने महालक्ष्मी रेसकोर्सवरून या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला. मात्र अवघ्या मिनिटभरातच हवाई नियंत्रण कक्षाने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचा ताफा येत असल्याने सुशीलकुमार आणि विलासरावांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तातडीने खाली उतरवावे, असा संदेश दिला. त्यानुसार काही मिनिटांतच हे हेलिकॉप्टर पुन्हा महालक्ष्मी रेसकोर्सवर खाली उतरविण्यात आले. त्यानंतर सुमारे तासभर उभयतांना हेलिकॉप्टरमध्ये बसून राहावे लागले.
दरम्यान, हवाई वाहतूक संचालनालयाने आठ सदस्यीय समितीमार्फत सोमवारी मुंबई विमानतळावर टळलेल्या अपघाताची चौकशी सुरू केली. या प्रकाराची दखल घेऊन विमानतळ प्राधिकरणाने रडार कंट्रोलर जी. मुरली आणि टॉवर कंट्रोलर मनदिप सिंग या दोघांना चौकशी अहवाल येईपर्यंत संबंधित कामावरून हटविण्याची कारवाई केली आहे.