Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

नांदेड आयुक्तालयाचा निर्णय लांबणीवर!
आजी-माजी मुख्यमंत्र्यांत काँग्रेस हायकमांडने घडवला तह
संतोष प्रधान
मुंबई, १० फेब्रुवारी

औरंगाबादचे विभाजन करून नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय होऊन महिना उलटला तरी अद्यापही याबाबतची अधिसूचना जारी झालेली नाही. नांदेड व लातूरवरून अशोक चव्हाण व विलासराव देशमुख या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू झालेल्या वादाचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसच्या नवी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय तुर्तास लांबणीवर टाकण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.

वेळापत्रकानुसार गाडय़ा चालवा मुख्यमंत्र्यांनी रेल्वेला सुनावले
मुंबई, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार काटेकोरपणे चालवा, रेल्वे गाडय़ा विलंबाने धावणार असतील तर त्याच्या आगाऊ सूचना द्या, अशी प्रत्येक रेल्वे प्रवाशांच्या मनातील खदखद आज खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. रेल्वेने नियमित सेवा पुरवली तर प्रवाशांचा उद्रेक किंवा आंदोलने होणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले. छत्रपती शिवाजी टर्मिनस मुख्यालयात मध्ये तसेच पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज चर्चा केली.

सध्या पुन्हा गाणे म्हणण्याची इच्छा नाही - सुमन कल्याणपूर
मुंबई,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी

आपण पुन्हा गाणं गाऊ की नाही याबद्दल सांगता येत नाही. पण सध्या तरी गाण्याची माझी इच्छा नाही. पुन्हा गाणे गाण्यास माझे मन तयार नाही, अशा सांगत गायलेले गाणे ध्वनिमुद्रित करताना त्याच्यावर केल्या जाणाऱ्या संस्कारांमुळे मुळ गाण्याचा आत्मा हरवला जातो, गाण्यातही बरेच बदल होतात. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी मी गाणे थांबविले, आणि आता पुन्हा गाण्याची इच्छा नाही..

महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी शरद पवार सरसावले
संदीप आचार्य
मुंबई, १० फेब्रुवारी

राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा असलेल्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करताना दिलेल्या सापत्न भावाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली असून याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना खास दूरध्वनी करून दिली. दरम्यान, वेतन आयोगाने केलेला अन्याय दूर न झाल्यास उद्यापासून महसूल कर्मचारी काम बंद आदोलन करणार आहेत तर १६ फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा घेणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी साडेसहा हजार कोटी
एमएमआरडीएचा अर्थसंकल्प सादर
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एमएमआरडीए ६,६५३ कोटी खर्च करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत दिली. एमएमआरडीएचे २००९-१० वर्षांचे २,१६३ कोटी त्रुटीचे अंदाजपत्रक मंजुर करताना मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी ८३० कोटी, विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प ३०० कोटी, मुंबई पारबंदर छन्नमार्ग ५०० कोटी, मोनो रेल प्रकल्प ९३५ कोटी, स्काय वॉक व रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा यंत्रणा ६०० कोटी, मेट्रो रेल प्रकल्प ५५० कोटी, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ७२९ कोटी, निर्मल अभियान १८४ कोटी, आंतरराज्य बस स्थानक व आयकॉनिक इमारत ४ कोटी, इनोव्हेशन पार्क एक कोटी, प्रादेशिक क्षेपण भूमी ३० कोटी, एमएमआरडीए क्षेत्रात पाणी पुरवठय़ासाठी स्त्रोत विकास १० कोटी, उर्जा क्षेत्रात सहभाग १० कोटी, वांद्रे-कुर्ला संकुल १५० कोटी, मिठी नदी विकास प्रकल्प १०० कोटी, वडाळा ट्रक टर्मिनस ५० कोटी, भाडे तत्वावर घरे बांधणे १०० कोटी, पुनर्वसन ३५ कोटी, झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम १२० कोटी, प्रकल्पांकरिता भू संपादन व विकास केंद्र १०० कोटी अशा अनेक योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. एमएमआरडीएला ४४९० कोटींचे उत्पन्न विविध मार्गाने अपेक्षित आहे.

सहा नवे न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयात रुजू
मुंबई, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

प्रमोद दत्ताराम कोदे, उमेश दत्तात्रय साळवी, श्रीहरी पुरुषोत्तम डावरे, अनिल रामचंद्र जोशी,आनंद वसंतराव पोतदार आणि श्रीमती मृदुला रमेश भाटकर हे सहा नवे न्यायाधीश आज मुंबई उच्च न्यायालयात रुजू झाले. मध्यवर्ती न्यायदालनात सकाळी झालेल्या छोटेखानी समारंभात मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार यांनी आपल्या या नव्या सहकाऱ्यांना शपथ दिली. या सहाजणांची दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. याआधी हे सर्वजण वरिष्ठ जिल्हा न्यायाधीश वर्गातील न्यायिक अधिकारी होते. या नेमणुकांनंतर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ६३ झाली आहे. १२ पदे रिकामी आहेत. न्या. भाटकर या उच्च न्यायालयातील सातव्या महिला न्यायाधीश आहेत. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा संख्येने महिला न्यायाधीश असलेले मुंबई उच्च न्यायालय देशातील एकमेव न्यायालय आहे. उच्च न्यायालयाच्या इतिहासातही ही संख्या सर्वाधिक आहे.

‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणी साईनाथ दुर्गेला अटक
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात ‘स्टिंग ऑपरेशन’ करणारा ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चा विद्यापीठ विभागाचा अध्यक्ष साईनाथ दुर्गे याला आज पोलिसांनी अटक केली. वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात त्यांना हजर केले असता १० हजार रुपयांच्या जामिनावर त्याची मुक्तता करण्यात आली.
साईनाथ दुर्गेच्या विरोधात विद्यापीठाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज दुर्गे स्वत:हूनच पोलिसांसमोर हजर झाले. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य वैभव नरवडे यांनी दुर्गे यांना सहकार्य केल्याचीही तक्रार विद्यापीठाने केली आहे.

२७ जागांसाठी आग्रही राहा; सोनियांचा माणिकरावांना आदेश
मुंबई, १० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

काँग्रेस व राष्ट्रवादीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा घोळ सुरू असताना गेल्या वेळप्रमाणेच २७ जागांसाठी आग्रही राहावे, असे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बजाविले आहे.राज्यातील राजकीय परिस्थितीच्या संदर्भात ठाकरे यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. तेव्हा काँग्रेसने २७ तर राष्ट्रवादीने २४ जागांवर दावा केल्याचे ठाकरे यांनी पक्षाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. काँग्रेसचा २७ जागांचा दावा योग्य असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा जागावाटपात पक्षाचे नुकसान होणार नाही व पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील याची खबरदारी घेण्याची सूचना सोनिया गांधी यांनी ठाकरे यांना केल्याचे कळते. जागावाटपासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत चर्चेची पहिली फेरी पार पडली आहे. राष्ट्रवादीचा २४ जागांचा दावा काँग्रेसला मान्य नाही तर काँग्रेसने केलेल्या २७ जागांची मागणी राष्ट्रवादीने धुडकावून लावली आहे.

एमबीएच्या सीईटीसाठी सव्वा लाख विद्यार्थी
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

एमबीए व एमएमएस या अभ्यासक्रमांसाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’साठी (सीईटी) तब्बल एक लाख १४ हजार २५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमांसाठी केवळ १५ हजार २२५ जागा उपलब्ध आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत इच्छूक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवेशासाठी मोठी स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी ९२ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्या तुलनेत यंदा प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदाच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील ८६ हजार २७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर जम्मू-काश्मिरमधील ६०९, परराज्यातील २७ हजार ५३ व परदेशातील ८९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी राज्यात २६३ केंद्रांची तजवीज करण्यात आली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील २८ हजार ८४२, ठाण्यातील एक हजार ४२१ व नवी मुंबईतील चार हजार ६८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

‘एआयईईई’साठी राज्यात सात परीक्षा केंद्रे
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षे’साठी (एआयईईई) सीबीएसईने राज्यात तब्बल सात केंद्रांची तजवीज केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार केंद्रांची वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि ठाणे या ठिकाणी ही परीक्षा होईल. एआयईईईसाठी २६ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना अंदमान व निकोबार, बिहार तसेच जम्मू-काश्मिर या राज्यांतील परीक्षा केंद्रे मिळाली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्याची दखल घेऊन राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सीबीएसईला पत्र लिहून केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. राज्याने एकूण नऊ परीक्षा केंद्रांची मागणी केली होती. त्यापैकी नांदेड व कोल्हापूर वगळता उर्वरीत सात केंद्रांची मागणी सीबीएसईने मान्य केली असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्येच सात केंद्रांची तजवीज करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशमध्ये सहा केंद्र आहेत. उर्वरीत राज्यांमध्ये त्यापेक्षा कमी केंद्र असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

‘मनश्री’ला ‘साहित्य साधना’ पुरस्कार जाहीर
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्यान. चि. केळकर ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा ‘साहित्य साधना’ पुरस्कार यंदाच्या वर्षी ‘मनश्री’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मुलुंड (प.) येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ‘मनश्री’चे लेखक सुमेध वडावाला यांना ‘साहित्य साधना’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जन्मत:च अंध असलेल्या मनश्री सोमण हिने ‘बालश्री’ पुरस्कार मिळविला होता. तिच्या नेत्रदीपक यशोगाथेचे वर्णन ‘मनश्री’ या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुरस्कारसोहळ्याप्रसंगी मनश्री सोमण आणि तिचे पालक यांची प्रकट मुलाखतही आयोजित करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबई १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकाजवळ रात्री अपघात झाल्याने उपनगरी सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या काळात ही घटना घडल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. चर्चगेट - बोरिवली गाडीची धडक लागल्याने एक इसम जखमी झाला. ही गाडी बराच काळ एकाच ठिकाणी थांबून राहिल्याने इतर गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. साधारण अर्धातास उशीराने गाडय़ा धावत होत्या. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.दरम्यान, गाडीची धडक लागलेल्या या इसमाचे निधन झाले.

रत्नागिरी प्रकल्पातील टर्बाइन बंद
मुंबई, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

रत्नागिरी प्रकल्पातील एक-बी टर्बाइन बंद पडल्याने ३५० मेगावॉट वीज कमी मिळणार आहे. आधीच भारनियमन असह्य झालेल्या महाराष्ट्रासाठी हा दुष्काळात १३ वा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी म्हणजे पूर्वीच्या दाभोळ प्रकल्पातील एक टर्बाइन बंद पडले आहे. यामधून साधारण ३५० मेगावॉट वीज निर्मिती होत होती. या टर्बाइनच्या ब्लेडला तडे गेल्याने वीज उत्पादन बंद पडले आहे. या ब्लेडची दुरुस्ती सिंगापूरला होत असते. या पूर्वीही दोन वेळा अशीच समस्या उभी राहीली होती. आता हे ब्लेड दुरुस्त होण्यास किमान तीन महिने लागतील. त्यामुळे राज्यातील भारनियमनात वाढ होण्याची शक्यता आहे.