Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

स्कूल बसेसचा मार्ग न बदलण्याची मागणी
लालबाग पूल तोडण्याचा पालकांनी घेतला धसका
प्रतिनिधी

येत्या काही दिवसांत लालबागचा पूल तोडण्यात येणार आहे व त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे; या वृत्तामुळे लालबाग-काळाचौकी परिसरातील पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. ऐन परिक्षांच्या तोंडावर हे काम होणार असल्याने डॉ. आंबेडकर मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविताना स्कूल बसचा मार्ग बदलू नये, अशी आग्रही मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दररोज शेकडो स्कूल बसची ये-जा सुरू असते. दादर, परळ, भायखळा, माटुंगा आदी ठिकाणच्या शाळांतील हजारो शाळकरी विद्यार्थी त्यामधून प्रवास करतात. परिणामी पूल तोडण्यासाठी स्कूल बसेसचा मार्ग बदलल्यास पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी ससेहोलपाट होण्याची शक्यता आहे. त्यातच मार्च-एप्रिलमधील परिक्षांचा हंगाम तोंडावर असताना ही गैरसोय होणार असल्याने पालकांनी त्याचा अधिकच धसका घेतला आहे. विशेषत: कामावर जाणाऱ्या पालकांच्या जीवाला मोठा घोर लागला आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना पूल तोडण्याचा फटका बसू नये; यासाठी हा पूल तोडण्याचा कालावधी पुढे ढकलावा. अथवा स्कूल बसेसची वाहतूक नेहमीप्रमाणे डॉ. आंबेडकरमार्गे नियमितपणे सुरू ठेवावी अशी मागणी लालबाग-काळाचौकी परिसरातील पालकांकडून करण्यात येत आहे. ‘लालबाग पुलाच्या विकासाला आमचे सवरेतोपरी सहकार्य आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा विचार करून हा पूल फेब्रुवारी महिन्यात न तोडता एप्रिलअखेर अथवा मे महिन्यात तोडण्यात यावा. जेणेकरून त्यामुळे नागरिकांनाही फारसा त्रास होणार नाही’, असे मत लालबाग येथे राहणाऱ्या संदीप परब यांनी व्यक्त केले.
सध्या या पालकांनी सध्या सह्य़ांची मोहिम उघडली असून, त्यांच्याकडून आपल्या मागण्यांचे निवेदन लवकरच वाहतूक पोलीस व संबंधितांना देण्यात येणार आहे. त्यानंतरही या मागणीबाबत विचार न झाल्यास पालकांना नाईलाजास्तव पूल तोडण्याच्या कामाला संघटित विरोधाचा अथवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात येत आहे.