Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

समाजसेवा करायची आहे?
जस्ट ‘स्माईल’!
सेवाभावी संस्थांसाठीही व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट, प्रतिनिधी

व्यवसाय करायचा असो वा समाजसेवा, पैशांची गरज दोन्हीकडे भासते. अनेक तरुणांना, निवृत्त कर्मचाऱ्यांना या ना त्या प्रकारे समाजसेवा करण्याची इच्छा असते. यांच्यापैकी काहीजण व्यक्तिगत

 

स्वरूपात किंवा गटागटाने एखाद्या झोपडपट्टीत जाऊन शिक्षण, आरोग्य इत्यादी विविध विषयांत समाजसेवा करत असतात. त्यांच्या योजनेला आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांचे कार्य केवळ एखाद्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता त्याला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी ‘स्माईल फाऊंडेशन’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. समाजसेवा करण्यासाठी आवश्यक अशा आर्थिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास ही संस्था मदत करते. त्यामुळे आता सेवाभावी संस्थांसाठीही ‘व्हेन्चर कॅपिटलिस्ट’ ही संकल्पना अस्तित्त्वात येत आहे.
याबाबत विस्तृतपणे माहिती देताना स्माईल फाऊंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर नरेश चौधरी यांनी सांगितले की, अनेकांना सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलायचा असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे ते हे काम प्रामाणिकपणे करत असतात. बरेचदा आर्थिक अडचणींमुळे अशा कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. ‘स्माईल फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे अशा प्रस्तावांसाठी आर्थिक मदतही करण्यात येते. केवळ आर्थिक मदत देऊन ही संस्था थांबत नाही तर त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक सेवाभावी संस्थेने कशाप्रकारे स्वावलंबी व्हावे, यासाठी सल्लाही देते.
चौधरी म्हणाले की, आर्थिक मंदीमुळे अनेक सेवाभावी संस्थांना तग धरणे मुश्किल झाले आहे. अशा वेळी त्यांचे काम आर्थिक चणचणीपायी थांबू नये, यासाठी स्माईल फाऊंडेशनतर्फे प्रयत्न करण्यात येतात. मुंबईतील ‘स्माईल फाऊंडेशन’च्या कार्यालयात महिन्याभरात दहा प्रस्ताव येतात. त्या प्रस्तावांची छाननी करण्यात येते किंवा ज्या ठिकाणी हे सामाजिक कार्य करण्यात येत आहे त्या स्थळाला भेट देऊन ‘स्माईल’च्या व्यवस्थापनातर्फे प्रत्यक्ष कार्याचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतरच त्या प्रस्तावाला किंवा संस्थेला आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात येते. ‘स्माईल फाऊंडेशन’तर्फे सध्या मिशन एज्युकेशन (गरीब मुलांसाठी प्राथमिक शिक्षण), स्माईल ऑन व्हील्स (वैद्यकीय मदत), स्माईल ट्विन ई-लर्निग प्रोग्रॅम (गरजूंसाठी संगणक प्रशिक्षण), स्वाभिमान (महिला विकास उपक्रम) इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. देशभरातील १०४ संस्थांच्या मदतीने हे काम सुरू आहे. येत्या जुलैपर्यंत ही संख्या दुपटीने वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. अशा प्रकारची योजना कोणाकडेही तयार असेल किंवा कोणी प्रत्यक्ष समाजकार्यात सहभागी असेल तर स्माईल फाऊंडेशनतर्फे त्यांनी ही सेवा नि:शुल्कपणे देण्यात येते. अधिक माहितीसाठी www.smilefoundationindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.