Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मुंबईकरांसाठी दोन दिवसांची जंगलसफारी!
प्रतिनिधी

ब्रिटीश कौन्सिल आयोजित ‘वाईल्डस्क्रीन फेस्टिव्हल’ अंतर्गत मुंबईत येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी या कालावधीत वन्यजीवन आणि पर्यावरणविषयक चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या विषयातील

 

जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव येथे होणार आहे.
वाईल्डलाईफ आणि पर्यावरणविषयक हा महोत्सव जाणकार आणि या विषयातीलतज्ज्ञ मंडळींमध्ये प्रतिष्ठेचा समजला जातो. मुंबईसह देशभरात दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी आदी ठिकाणीही या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम होणार असून वन्यजीवन आणि पर्यावरणविषयक चित्रपटांची निर्मिती करणारे ब्रिटनमधील नऊ चित्रपट निर्माते या निमित्ताने भारतात येणार आहेत.
या महोत्सवात जागतिक स्तरावरील पांडा अॅवॉर्ड तसेच अन्य काही पुरस्कार मिळवलेले वन्यजीवन आणि पर्यावरणविषयक काही चित्रपट पाहायला मिळणार आहेत. पीटर स्कॉट यांनी १९८२ मध्ये या वाईल्डस्क्रीन महोत्सवाची सुरुवात केली. गेली २५ वर्षे हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. दरवर्षी या महोत्सवात जगभरातील या विषयातील तज्ज्ञ, चित्रपट निर्माते आणि प्रसार माध्यमातील प्रतिनिधी सहभागी होत असतात.
हा महोत्सव २००७ मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने दिल्ली, पुणे, कोलकाता आणि चेन्नई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरिट निम्मो यांनी सांगितले की, भारतातील प्रेक्षक आणि चित्रपटनिर्माते यांच्याबरोबरचा संवाद वाढविण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षी आम्ही पुन्हा भारतात येत आहोत. यावर्षीच्या महोत्सवात पर्यावरणविषयावर विशेष भर देण्यात आला आहे. या महोत्सवासाठी पॉल डोनोवन, हॅरिट निम्मो, अॅमान्डा थेऊसिन तसेच अन्य मान्यवर चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत. पॉल डोनोवन हे ‘पोस्ट प्रॉडक्शन साऊंड फॉप नॅचरल हिस्टरी’ या विषयावीरल एका कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तर निम्मो हे ‘ट्रेण्डस इन एनव्हॉन्मेंटल अॅण्ड वाईल्डलाईफ फिल्ममेकिंग’ तर अॅमान्डा हे ‘स्टोरीटेलिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. भारतातील चित्रपट निर्माते नरेश बेदी यांच्यासह अन्य काही मान्यवर या महोत्सवात सहभागी होणार आहेत. इच्छुकांना या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अगोदर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी इच्छुकांनी www.britishcouncil.org/india-projects-ukeff-wildscreen.htm या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.