Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पालिका म्हणते..
मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मुंबईची लोकसंख्या १४ कोटी
प्रतिनिधी

मुंबईची लोकसंख्या किती? पालिकेचे उत्तर आहे १४ कोटी ! मुंबईच्या लोकलमधून रोज किती प्रवासी प्रवास करतात ? रेल्वेची आकडेवारी दिवसाला ६० लाख प्रवासी प्रवास करतात अशी असली तरी, मुंबई महापालिकेच्या दफ्तरी मात्र नोंद आहे ती केवळ २.२ लाख प्रवाशांचीच. आणि राज्याचे मुख्यमंत्री

 

कोण ? या प्रश्नाला पालिकेचे उत्तर आहे- विलासराव देशमुख.
ही सारी चुकीची माहिती मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर सध्या उपलब्ध आहे. मुंबईची माहिती नसणाऱ्या माणसाने जर ही वेबसाईट पाहिली तर, मुंबईत सव्वा कोटी नव्हे तर १४ कोटी लोक राहतात हे वाचून त्याला आश्चर्यच वाटेल. एकीकडे संगणकीकरणासाठी, सॅप प्रणालीसाठी करोडो रूपये खर्च करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर मात्र मिलिअन, बिलीअन मध्ये भाषांतर करताना घोळ झाल्याने ही चुकीची आकडेवारी जगासमोर मांडली जात आहे. ही वेबसाईट इंग्रजी व मराठी भाषेत आहे. इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना डोळेझाकपणे केले गेल्याने मराठी वेबसाईटवर चुकीची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातही भाषांतर झाल्यावर सारी माहिती अपलोड करताना ती एकदा नजरेखालून घालावी असे पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला वाटले नाही. त्यामुळे हा सारा गोंधळ झाला आहे. मुंबईची आत्ताची लोकसंख्या पालिकेने एक कोटी ४० लाख अपेक्षित धरली आहे. इंग्रजीमध्ये ही लोकसंख्या १४ मिलिअन दाखवण्यात आली आहे.
तर, मराठीमध्ये त्याचे भाषांतर करताना सरधोपटपणे १४ कोटी लोकसंख्या असल्याचे नमूद
करण्यात आले आहे. महापालिकेच्या 'मुंबई वस्तुस्थिती' सदरात ही आकडेवारी दाखवण्यात आली आहे. इतिहास विभागात मात्र भाषांतर करताना सोपा मार्ग निवडण्यात आला असून १४ दशलक्ष लोकसंख्या असे लिहिण्यात आले आहे.
मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देताना प्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिराची माहिती देण्यात आली आहे. सिध्दीविनायकाच्या मंदिरात मंगळवारी गर्दी असते, तसेच या गणपतीचे वैशिष्ट म्हणजे ‘उजव्या\' बाजूस गणपतीची सोंड असल्याचा उल्लेख वेबसाईटवर आहे.
हा गणपती उजव्या सोंडेचा असून माहितीमध्ये 'उ' हा शब्द गायब झाल्याने वाचताना अनेकांचा गोंधळ उडतो.
मुंबई महापालिकेच्या या अत्याधुनिक वेबसाईटचे उदघाटन १३ सप्टेंबर २००७ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आता मुख्यमंत्री बदलले आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तरीही, या बदलाची नोंद पालिके च्या वेबसाईटवर करण्यात आलेली नाही. पालिकेच्या दफ्तरी अदयाप विलासराव देशमुख हेच मुख्यमंत्री आहेत. चुकीच्या या माहितीमुळे मुंबईबद्दल वेगळीच माहिती लोकांना मिळते आहे..