Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मराठीतून व्यवस्थापन प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद
प्रतिनिधी

एससीएफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठीतून व्यवस्थापन प्रशिक्षण परिसंवादास भरघोस प्रतिसाद लाभला. सुमारे ४०० लोकांनी यात सहभाग

 

घेतला. वक्ते म्हणून
प्रा. विनायक वैद्य, स्नेहल कांबळे आणि मधुसूदन बने उपस्थित होते.
एससीएफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटचे वरिष्ठ व्याख्याते प्रा. विनायक वैद्य यांनी व्यवस्थापनाची १४ तत्त्वे कोणती ते विस्ताराने विशद करून सांगितले. तसेच आंत्रप्रिन्युअर बनण्याची करिअरची संधी याबद्दलही त्यांनी सविस्तर व्याख्यान दिले.
एससीएफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटने डिप्लोमा इन प्रोफेशनल मॅनेजमेंट हा एक वर्ष कालावधीचा अर्धवेळ अभ्यासक्रम खास मराठीतून सुरू केला असून या अभ्यासक्रमाचे संचालक स्नेहल कृष्णा म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था अतिशय जलद गतीने मार्गक्रमण करीत असल्याने उत्तम व्यवस्थापक बनण्याची नितांत गरज आहे. चांगले व्यवस्थापक बनण्यासाठी आपली स्वत:ची आणि आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मनुष्यबळ व्यवस्थितपणे हाताळणे-सांभाळणे हे यश मिळविण्यासाठी आणि सातत्याने चांगले ‘रिझल्ट्स’ मिळविण्यासाठी अतिशय गरजेचे आहे कारण तोच सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे, असे कृष्णा यांनी सांगितले. किंबहुना हीच गोष्ट मराठी तरुणांना नीट समजावी, अवगत व्हावी म्हणूनच आम्ही मराठीतून व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. कारण आपल्या भाषेत शिक्षण घेतल्याने व्यवस्थापनाची तत्त्वे व ज्ञान अधिक चांगल्या तऱ्हेने अवगत करणे सोपे होते, असेही कृष्णा यांनी नमूद केले.
प्रा. मधुसूदन बने यांनी गुणवत्तापूर्ण काम, लक्ष्य कसे गाठावे, व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे, स्पर्धेचा मुकाबला करणे यासाठी व्यवस्थापनाचे ज्ञान आणि प्रशिक्षण मिळविणे अतिशय आवश्यक आहे. व्यवस्थापन विषयाच्या अभ्यासामुळे व्यक्तीला स्वत:च्या मर्यादा काय आहेत हेही समजते तसेच व्यवस्थापन प्रशिक्षणामुळे परस्परसंबंध अधिक चांगल्या तऱ्हेने प्रस्थापित होण्यास चालना मिळते, असे व्यवस्थापन शिकण्याचे फायदे बने यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.
एससीएफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटने सुरू केलेल्या ‘डिप्लोमा इन प्रोफेशनल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आला असून २२ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत. दादर येथे हे वर्ग घेण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ६४५०३०४५, ६६१२३३३३० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.