Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

साहित्यनिर्मिती करण्याकडे तरुण पिढीचा कल नाही- डॉ. आनंद यादव
प्रतिनिधी

सध्याची तरुण पिढी लिहीते, वाचते आणि बुद्धीमानही आहे. मात्र साहित्यनिर्मिती करण्याकडे या तरुणांचा कल नाही, अशी खंत महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे

 

नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी अलीकडेच व्यक्त केली.
ग्रामीण भागात साहित्य निर्मिती होते. पण शहरातले लोक ते वाचत नाहीत. मीही उपेक्षिलो गेलो. पण मी धडपडत राहिलो. आज महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. ज्या वास्तवासाठी मी धडपडत होतो, ते वास्तव साहित्यातून प्रातिनिधिक स्वरुपात आता उपलब्ध आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. ‘मोटेवरची कविता’ बद्दल एका वाचकाने विचारले असता ते म्हणाले की, चार कवितासंग्रह मी प्रसिद्ध केले, पण त्यात उत्साहापलीकडे काही आहे, असे मला वाटत नाही.
साहित्य अकादमीतर्फे आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. आनंद यादव यांनी वाचकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘माऊली’बद्दल बोलताना ते खुलून बोलत होते. माऊली हा प्रेमाचा शब्द आहे. मी नुसतंच साहित्य वाचणारा प्राध्यापक नाही. साहित्याची निर्मिती करताना तत्त्वज्ञान, मानसशास्त्रही वाचावे लागते. ज्या प्राण्याबद्दल लिहायचे त्या प्राण्यावरही अभ्यास करावा लागतो. मांजरीचा अभ्यास करताना मला असे आढळले की नैसर्गिक परिस्थितीनुसार सगळे प्राणी बदलले पण ‘कॅट’ या प्राण्यांच्या प्रजाती अंतर्गत येणारे प्राणी म्हणजे वाघ, मांजर यांत मात्र हे बदल झाले नाहीत. त्याचबरोबर सगळ्यात जास्त नाती भारतीय संस्कृतीत आहेत. एवढी नाती दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीत नाहीत. आपल्याकडे प्रत्येक नात्याला नाव आहे. मावशी, मामा, काका वगैरे. पण इतर ठिकाणी मात्र असे नसते, कोणत्याही नात्याला कझीन, अंकल, आँटी असेच म्हटले जाते. भारताइतकी विविधता दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी नाही. हे विविधपण लक्षात आल्यावर मला वाटले की माणूस किती विविध नाती जपतो हे अभ्यासण्यासाठी मांजर पाळावी. त्यावेळी माझ्याकडे सात- आठ मांजरी होत्या.
हे पुस्तक लिहिताना अनुभवास आलेला एक छोटा प्रसंगही त्यांनी सांगितला. विंदा करंदीकर भेटायला आले असताना त्यांच्याबरोबर त्यांची नात होती. आनंद यादव यांच्याकडील मांजरी बघून ती अगदी हरखून गेली. त्या मांजरीच्या पिलांबरोबर ती सहजपणे खेळू लागली. यादवांच्या घराच्या आजूबाजूला असलेली झाडे व डोंगर बघून ती हरखून गेली. त्या शहरात वाढलेल्या मुलीला झाडे व डोंगर यांचे अप्रुप वाटत होते असे म्हणून आनंद यादव म्हणाले की, माणूस नुसता पांढरपेशा झाला तर शेजारीही त्याला माहीत नसतो. आपली वृत्ती संकुचित होत आहे. ‘माऊली’ या कादंबरीत मला हे दाखवायचे होते, असे ते म्हणाले.
शाळेत असतानाचे आपले अनुभव सांगताना डॉ. यादव म्हणाले की, माझी भाषा शुद्ध नव्हती. त्याचा मला खूप त्रास झाला. ‘आहे’ हा उच्चार मला जमतच नसे, त्याऐवजी ‘हाय’ असाच उच्चार पटकन बोलताना व्हायचा.
पण काही शिक्षकांनी मला मदत केली. मी पाठांतर कधी केले नाही. काही ना काही शक्कल लढवून मी जे कठीण वाटत असेल ते सोपे करायचा प्रयत्न करायचो..
साहित्याबद्दल गप्पा सुरु असताना एका वाचकाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल डॉ. यादव यांना विचारले. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजूनही खेडय़ापाडय़ातील शेतकरी अडाणी आहे. त्याला शेतीची लागवड वगैरे करता येत नाही. कर्ज काढावे लागते. मिळेल त्या पैशात भागवावे लागते. सावकार शेती काढून घेण्याची भीती असल्याने शेतकरी हतबल आहे. तुकारामावरील पुस्तकाबद्दल विचारले असचा ‘नो कमेंट्स’, पुस्तक स्वत: वाचा असे त्यांनी सांगितले..