Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बाप-लेकांच्या नात्याचे दर्शन
प्रतिनिधी

अमरावतीच्या संकल्प सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा संस्थेने गेल्या दहा वर्षांत ‘वणवा’, ‘शह’, ‘आव्हान’ आदी मराठी व ‘सिर्फ एक नाम ओसामा’, ‘सच बोलिए’ इत्यादी हिंदी मिळून २२ नाटकांची निर्मिती केली आहे, तसेच विविध राज्यस्तरीय नाटय़स्पर्धामध्ये सहभागी होऊन नाटय़निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय,

 

लेखन यासाठी १६१ पारितोषिके मिळविली आहेत.
‘बिंब प्रतिबिंब’ या कौटुंबिक नाटकाची संहिता चंद्रकांत शिंदे यांनी लिहिली असून, दिग्दर्शनही व नेपथ्यही त्यांनीच केले आहे. स्वराज व विराज ही दोघं जुळी भावंडे, स्वराज साधा, भोळा, निष्पाप, प्रेमळ व सर्वाना मदत करणारा, तर विराज उच्चशिक्षित, अमेरिकेत स्थायिक झालेला. स्वराजला वडिलांविषयी अतिशय प्रेम असते. मात्र वडिलांच्या मनात स्वराजबद्दल तिरस्कार असतो. याचे कारण असे, की विराज आधी जन्मला होता व नंतर स्वराजचा जन्म झाला होता. स्वराजच्या जन्मानंतर आपल्या पत्नीच्या, लक्ष्मीच्या झालेल्या मृत्यूबद्दल ते स्वराजला जबाबदार धरतात. असे असले तरी, अखेरीस स्वराज आपल्या वडिलांच्या प्रेमाने व त्यागाने जिंकून त्यांना स्वत:चे प्रतिबिंब म्हणून स्वीकारायला भाग पाडतो. बाप-लेकाच्या नात्यातील भावबंध अनेक प्रसंगातून उलगडत अतिशय भावनात्मकरीत्या हे नाटक पुढे सरकते. आईच्या मायेला पारखी झालेली भावंडे आजीच्या मायेने मोठी होतात. आपल्या दिलखुलास स्वभावाने स्वराज वाडय़ातील नोकर-चाकर, दिवाणजी व सवंगडय़ांना जिंकून घेतो. हे सर्व जणही स्वराजला सदैव मदत करतात. गावातील एक खंदे राजकारणी रामभाऊ पाटील स्वराजच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात, तर तीस वर्षे विरोधी पक्षात राहून काम करणारा रंगरावसुद्धा प्रसंगी स्वराजच्या बाजूला वळतो. ग्रामीण गोडवा असणाऱ्या या नाटकाचे कथानक अनेक वळणे घेत, कधी ग्रामीण भाषेत, तर कधी प्रमाण भाषेत, वेगाने पुढे सरकते. अनेकदा विनोदी, तर तितक्याच भावनात्मक प्रसंगांतून जात हे नाटक प्रत्येक प्रसंगाला जिवंत करते. विराज व स्वराज अशी दुहेरी भूमिका स्वत: लेखक चंद्रकांत शिंदे यांनी साकारली आहे. प्रा. एम. टी. देशमुख (नानासाहेब), सुधा पुरोहित (आजी), जयंत वाघमारे (रामराव पाटील), गजानन चोपडे (रंगराव पाटील) अशा २४ कलावंतांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत.
आजचे नाटक
बिंब प्रतिबिंब
शिवाजी मंदिर, सायं. ७.३० वाजता
उद्याचे नाटक
शिवाजी मंदिर, सायं. साडेसात वाजता
रंगधारा, मडगाव, गोवा प्रस्तुत आदित्य चक्षू
लेखक : विष्णू वाघ
खालील प्रश्नाच्या अचूक उत्तरांसह हे कात्रण नाटय़गृहाच्या बुकिंग काऊंटरवर देणाऱ्या पहिल्या पाच प्रेक्षकांना दोन व्यक्तींसाठी विनामूल्य प्रवेश.
प्रश्न : बीड येथे होणाऱ्या नाटय़ संमेलनात रामदास कदम कोणाकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील?
१) मोहन जोशी
२) रमेश देव
३) लालन सारंग