Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

पश्चिम उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी सध्या केवळ माहीम कॉजवेचा वापर केला जातो. त्यामुळे रहदारीच्या वेळी माहिम कॉजवेवर वाहनांची रांग पाहण्यास मिळते. यालाच पर्याय म्हणून वांद्रे-वरळी सागरी सेतू प्रकल्पाची योजना तयार करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या या प्रकल्पासाठी सुमारे तेराशे कोटीहून अधिक खर्च झाला असून येत्या १ मेपासून या सेतूच्या चार मार्गिका दुतर्फा वाहतुकीसाठी खुल्या होण्याची शक्यता आहे.

स्कूल बसेसचा मार्ग न बदलण्याची मागणी
लालबाग पूल तोडण्याचा पालकांनी घेतला धसका

प्रतिनिधी

येत्या काही दिवसांत लालबागचा पूल तोडण्यात येणार आहे व त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे; या वृत्तामुळे लालबाग-काळाचौकी परिसरातील पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. ऐन परिक्षांच्या तोंडावर हे काम होणार असल्याने डॉ. आंबेडकर मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविताना स्कूल बसचा मार्ग बदलू नये, अशी आग्रही मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

१० फेब्रुवारी
मी नुसता विचार करत बसतो बाकीचे सांगून मोकळे होतात. आज कँटिनमध्ये बसलो होतो. आमचा ग्रुप एका टेबलवर आणि तिचा ग्रुप बाजूच्या टेबलवर होता. त्यांच्यातील निलेशने विषय काढलाच. तिला म्हणाला, तू फ्री असशील तर कॉलेज सुटल्यावर जाऊया का एका मैफलीला.


समाजसेवा करायची आहे?
जस्ट ‘स्माईल’!

सेवाभावी संस्थांसाठीही व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट, प्रतिनिधी

व्यवसाय करायचा असो वा समाजसेवा, पैशांची गरज दोन्हीकडे भासते. अनेक तरुणांना, निवृत्त कर्मचाऱ्यांना या ना त्या प्रकारे समाजसेवा करण्याची इच्छा असते. यांच्यापैकी काहीजण व्यक्तिगत स्वरूपात किंवा गटागटाने एखाद्या झोपडपट्टीत जाऊन शिक्षण, आरोग्य इत्यादी विविध विषयांत समाजसेवा करत असतात.

मुंबईकरांसाठी दोन दिवसांची जंगलसफारी!
प्रतिनिधी

ब्रिटीश कौन्सिल आयोजित ‘वाईल्डस्क्रीन फेस्टिव्हल’ अंतर्गत मुंबईत येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी या कालावधीत वन्यजीवन आणि पर्यावरणविषयक चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या विषयातील जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव येथे होणार आहे.वाईल्डलाईफ आणि पर्यावरणविषयक हा महोत्सव जाणकार आणि या विषयातीलतज्ज्ञ मंडळींमध्ये प्रतिष्ठेचा समजला जातो. मुंबईसह देशभरात दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी आदी ठिकाणीही या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम होणार असून वन्यजीवन आणि पर्यावरणविषयक चित्रपटांची निर्मिती करणारे ब्रिटनमधील नऊ चित्रपट निर्माते या निमित्ताने भारतात येणार आहेत.

पालिका म्हणते..
मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मुंबईची लोकसंख्या १४ कोटी

प्रतिनिधी

मुंबईची लोकसंख्या किती? पालिकेचे उत्तर आहे १४ कोटी ! मुंबईच्या लोकलमधून रोज किती प्रवासी प्रवास करतात ? रेल्वेची आकडेवारी दिवसाला ६० लाख प्रवासी प्रवास करतात अशी असली तरी, मुंबई महापालिकेच्या दफ्तरी मात्र नोंद आहे ती केवळ २.२ लाख प्रवाशांचीच. आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण ? या प्रश्नाला पालिकेचे उत्तर आहे- विलासराव देशमुख.

पाल्र्याच्या एन. एम. महाविद्यालयात व्यवस्थापन शाखेच्या ‘दृष्टी’ या महाविद्यालयीन फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हज् विभागाने यंदा उत्पत्ती (जेनिसिस) या संकल्पनेवर चितारलेली ही भित्तीचित्रे फेस्टिव्हलचे आकर्षण ठरली. एन. एम. कॉलेजचा ‘दृष्टी २००९’ हा मॅनेजमेंट फेस्टिव्हल १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. या वर्षी दृष्टीने दहा वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने दृष्टीने`Genesis-A new beginning' अशी थीम ठेवली होती. दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता परत एक नवीन सुरुवात करावी असा या थीममागचा हेतू होता.

पार्ले उड्डाण पुलाला डॉ. मांडके यांचे नाव देण्याची मागणी
प्रतिनिधी

विख्यात हृदयरोग तज्ज्ञ व शल्यविशारद दिवंगत डॉ. नीतू मांडके यांचे नाव प. द्रुतगती महामार्गावर पार्ले येथे उभारलेल्या उड्डाण पुलाला द्यावे, अशी मागणी शिवसेना विभाग क्र. २ तर्फे नगरसेवक शशिकांत पाटकर यांनी केली आहे. पाटकर यांनी या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या उड्डाणपुलाला डॉ. मांडके यांचे नाव द्यावे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच पार्ले परिसरातील नामवंत व सामान्यांच्या भावनाही त्याच आहेत. पाटकर यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्यांसाठी मुंबईत एक अद्ययावत रुग्णालय असावे, असे डॉ. मांडके यांचे स्वप्न होते. आर्थिक अडचणींपायी या रुग्णालयाच्या उभारणीसाठी अंबानी यांची मदत घ्यावी लागली. खरे तर अंबानी यांनी या रुग्णालयाला डॉ. मांडके यांचे नाव देणे औचित्यपूर्ण ठरले असते. पण त्यांनी स्वत:च्याच मातोश्रींचे कोकिळाबेन यांचे नाव रुग्णालयाला दिले. या पाश्र्वभूमीवर महामार्गावरील उड्डाण पुलाला डॉ. मांडके यांचे नाव द्यावे, अशी मागणी समस्त पार्लेकरवासीयांच्या वतीने विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब, उपविभागप्रमुख सीताराम दळवी, गणपत महाडिक, शाखाप्रमुख नितीन डिचोलकर, महिला शाखा संघटक रुपाली शिंदे यांनी केली आहे.

यशोदा सांगळे यांचे निधन
प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सहदू तथा मामा सांगळे यांच्या पत्नी यशोदा यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांंच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, पाच विवाहित कन्या, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी श्रीकृष्ण आणि बांधकाम व्यावसायिक अशोक हे त्यांचे पुत्र होत. राज्याचे सामाजिक न्याय कल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सांगळे यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. सोमवारी दुपारी चेंबूर येथील स्मशानूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी विधान परिषद सदस्य संजय दत्त, माजी नगरसेवक रवींद्र पवार, सोमनाथ सांगळे तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या