Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
ईशावास्योपनिषद्

 

उपनिषद या शब्दात उप, नि व सद् अशी तीन पदे आहेत. उप म्हणजे जवळ. सद् म्हणजे बसणे, नि म्हणजे नम्र, मनापासून. आत्मविद्येच्या अभ्यासासाठी गुरुसान्निध्यात वावरणे म्हणजे ‘उपनिषद’. उपनिषदांना ‘वेदान्त’ म्हणतात. उपनिषदे बरीच आहेत. प्रस्थानत्रयीत भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे येतात. उपनिषदात आत्मानुभूती, काव्य, रूपके आहेत. साधनांचा आलेख आहे. तर्काचे घाट आहेत. तत्त्वचिंतनांची रमणीय, भव्य उद्याने आहेत. वैदिक संस्कृत ही उपनिषदांची भाषा आहे. धांदोग्य, बृहदारण्यक, ऐतरेय, तैत्तिरीय, प्रश्न, केन, कौषीतकी ही गद्य उपनिषदे आहेत. ईश, कठ, मुंडक, मांडुक्य, श्वेताश्वतर ही पद्य उपनिषदे आहेत. अध्यात्मातील गूढगहन सिद्धान्त सुंदर सांगावे ते उपनिषदांनीच! श्रीमद् आद्य शंकराचार्याच्या मते, अज्ञानाचा नाश करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद. मानवी जीवन आनंदमय कसे होईल ते उपनिषद सांगते. संपूर्ण विश्वातील अध्यात्मविद्येचा मूळ गाभा उपनिषदांमध्ये आढळतो. यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेतला चाळिसावा अध्याय म्हणजे ईशावास्योपनिषद होय. याचा भावार्थ- जगात जे काही आढळते ते सर्व ईश्वरव्याप्त आहे. जगातील सर्व वस्तूंचा त्यागाने भोग घ्यावा. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नये. या जगात सत्कर्मात शंभर वर्षे जगण्याची इच्छा करावी. आत्मज्ञान सामाजिकतेसाठी प्रत्यक्षात आणावे. अभ्यासाने मन सूक्ष्म करून भूतमात्रांना आपले मानावे. मानवी जीवनातील दु:खाचे मूळ आसक्तीत आहे. विद्या आणि अविद्या यांना जो जाणतो तो मृत्यूला पार करतो. विद्येने अमर होतो. अव्यक्त आणि व्यक्त ब्रह्माची उपासना करावी. सूर्याचे ध्यान करावे. अमृतत्त्व हे जन्माचे सार्थक आहे. अग्नी हा ईश्वराचे प्रतीक आहे. तो ऊध्र्वगामी आहे. तो अनेकातून एकाकडे जातो. म्हणून त्याला ऋषी वंदितात. याचा भाव लक्षात घ्या! तो म्हणजे- विश्व जाणा. दुष्ट वृत्तींना वेळ देऊनका. पापांना तिथल्या तिथे ठेचा. मग बघा! प्रार्थनेतला ईश्वर तुमच्या हृदयात आनंदाने बागडेल. हेच ईश्वरदर्शन. ज्ञानोबाराय म्हणतात, ‘‘हरि आला रे, हरि आला रे । संतसंगे ब्रह्मानंदु झाला रेऽऽ।’’ जगणे केवढे सुंदर गाणे आहे हे ज्या ऋषीने सांगितले त्याला नमस्कार!
यशवंत पाठक

कु तू ह ल
नेपच्यूनचा शोध
नेपच्यून ग्रहाच्या शोधामागचा इतिहास काय आहे?

सर्व ग्रहांच्या कक्षा केपलरच्या आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला अनुसरून असतात. युरेनस ग्रहाचा शोध लागल्यानंतर त्या ग्रहाची स्थाने या नियमानुसार बदलत असल्याचे आढळले. मात्र कालांतराने असे लक्षात आले की, युरेनस हा ठरवलेल्या कक्षेतून फिरत नाही. १८२० साल उजाडेपर्यंत हा फरक लक्षणीय झाला होता. याचा अर्थ एकतर न्यूटनच्या नियमानुसार मांडलेल्या गणितात तरी चूक होती किंवा एखाद्या अज्ञात ग्रहाच्या आकर्षणामुळे ग्रहाची गती बदलत होती. सूर्य आणि इतर ग्रहांचा प्रभाव एखाद्या ग्रहावर कसा असतो, याचा विचार करून फ्रेंच गणितज्ञ लाप्लासने ग्रहांच्या कक्षा ठरवण्याचे गणित मांडले होते. या गणिताच्या साहाय्याने व युरेनसच्या कक्षेतील तफावत पाहून अज्ञात ग्रहाचे स्थान सांगणे मात्र अत्यंत किचकट होते. हे आव्हान दोघा तरुणांनी स्वतंत्रपणे स्वीकारले. जॉन कूच अ‍ॅडम्स या केंब्रिजच्या विद्यार्थ्यांने सर्वप्रथम नेपच्यूनचे स्थान निश्चित केले. आठच महिन्यांत लेव्हेरियर या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने हेच गणित मांडले. या दोघांनी सुप्रसिद्ध इंग्लिश खगोलतज्ज्ञ एअरी यांच्याकडे आपापले गणित पाठवले. एअरी यांनी त्यांना काही प्रश्न पाठवले. दोघांनी त्यांची उत्तरे पाठवली खरी, पण लेव्हेरियरने एअरींचा नाद सोडून जर्मन खगोल निरीक्षक गाल याला पत्र पाठवले. २३ सप्टेंबर १८४६ ला मिळालेल्या पत्रावरून त्याच रात्री बर्लिन वेधशाळेच्या गालने नेपच्यूनचा शोध लावला. सूर्यापासून, सूर्य-पृथ्वी या दरम्यानच्या अंतराच्या सुमारे तीसपट अंतरावर असणारा हा ग्रह आकाराने युरेनसपेक्षा थोडासा लहान आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास १६५ वर्षे लागतात. म्हणजेच सध्याच्या २००९ सालीसुद्धा, नेपच्यूनची त्याच्या शोधानंतर, सूर्याभोवती अजून एकही फेरी पूर्ण झालेली नाही.
महेश शेट्टी
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
पंडित दीनदयाळ उपाध्याय

उत्तर प्रदेशातील मोगलसराय स्टेशनावर कपडय़ात गुंडाळलेले शव आढळले. शवाची ओळख पटल्यावर सारा भारत हळहळला. ते शव होते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे. पं. दीनदयाळ भगवतिप्रसाद उपाध्याय. जन्म २५ सप्टेंबर १९१६, मृत्यू ११ फेब्रुवारी १९६८, अवघे ५१ वर्षांचे आयुष्य. आई, वडील, भाऊअशी निकटवर्तीय माणसांचे एकापाठोपाठ एक झालेले मृत्यू त्यांना अनाथ करून गेले. तेव्हापासून देश हेच त्यांचे कुटुंब झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. सरकारी नोकरी सहज मिळाली असता तिला लाथ मारून संघकार्याला झोकून दिले. त्या काळात देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाबरोबर हिंदूंच्या संघटनांची चळवळ डॉ. हेडगेवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत देशभर सुरू होती. संघकार्यासाठी अविवाहित राहण्याचा निश्चय त्यांनी केला. संघाचे प्रचारक या नात्याने ते देशभर फिरले. गांधीहत्येनंतर संघावर बंदी असताना भूमिगत राहून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसला पर्याय म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जीनी स्थापन केलेल्या ‘भारतीय जनसंघ’ या राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला. मुखर्जीच्या अकाली निधनानंतर जनसंघाची धुरा त्यांच्या खांद्यावर पडली. ‘एकात्म मानवतावाद’सारखी संकल्पना मांडून डॉ. लोहियांसारख्या समाजवादी नेत्यांनाही आपलेसे केले. काश्मीर प्रश्न, कच्छ करार या विरोधात आंदोलन केले. ‘जगद्गुरू शंकराचार्य’, ‘आर्य चाणक्य’, ‘भारतीय अर्थकारणाची दिशा’ ही त्यांची पुस्तके. वर्तमानपत्रातूनही त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांचा मृत्यू त्यांच्या विरोधकांनासुद्धा चटका लावून गेला. त्यांच्या मृत्यूचे गूढ मात्र शेवटपर्यंत उलगडले नाही.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
‘अंधारात कसा चढणार डोंगर?’

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. ‘राम राम पाव्हनं का असं निजलात?’ म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ‘‘राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.’’ म्हातारा हसला. म्हणाला, ‘‘अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?’’ ‘‘एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.’’ तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.’’ म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.
आजचा संकल्प : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com