Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

माथाडी कामगार मंडळांची दहा दिवसांत पुनर्रचना करणार - नवाब मलिक
बेलापूर/वार्ताहर

राज्यातील साडेसात लाख माथाडी कामगारांसाठी असलेल्या ३२ माथाडी मंडळांची येत्या दहा दिवसांत पुनर्रचना करण्याचे आश्वासन कामगारमंत्री नवाब मलिक यांनी वाशी येथे दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे कामगार मंत्री नवाब मलिक यांचा सत्कार व माथाडी कामगारांचा मेळावा वाशीतील माथाडी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांची टीका
नवी मुंबई/प्रतिनिधी
: आठवडाभरापूर्वीच महापालिकेत दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल सर्वांची वाहवा मिळविणारे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा यांना आज काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घरचा आहेर देत त्यांच्या ‘डॅशिंग’ प्रतिमेतील हवाच काढून टाकली. कागदावर मोठमोठय़ा योजना राबविणारे आयुक्त नाहटा यांना शहरातील कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पांमध्येच अधिक रस असून, प्रभागातील लहान कामांकडे त्यांनी कानाडोळा केला आहे, असा आरोप आज विरोधकांनी केला. जवाहरलाल नेहरू विकास योजनेचा छदामही अजूनही महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला नसून, आयुक्त नाहटा यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते रमाकांत म्हात्रे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

मनरापकासे काढणार सभासदांचा अपघात विमा
पनवेल/प्रतिनिधी
: मनसेप्रणीत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेनेच्या प्रत्येक सभासदाचा ५० हजार रुपये वैयक्तिक अपघात विमा काढण्यात येणार आहे. मनरापकासेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या गंभीर समस्यांचा अभ्यास करून याबाबतचा एक अहवाल राज ठाकरे यांना सोपविला. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. राज्यात सर्वदूर पसरलेली एसटी नागरी तसेच ग्रामीण प्रवाशांसाठी उपकारक ठरली आहे. मात्र राज्यभरातील २४८ आगार, थांबे एसटी कर्मचाऱ्यांसाठी तसेच प्रवाशांसाठी नरकपुरी ठरले आहेत. यातील बहुसंख्य ठिकाणी स्वच्छतागृहे, आरामगृहे यांचा अभाव आहे. लाखो प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविणाऱ्या चालक व वाहकांच्या आरोग्याची पुरेशी काळजी एसटी प्रशासनातर्फे घेतली जात नसल्याचे मनरापकासेने म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर संघटनेच्या प्रत्येक सभासदाचा वैयक्तिक अपघात विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटीच्या ताफ्यातील जुन्या गाडय़ा टप्प्याटप्प्याने बदलणे, चालकांच्या कामांचे तास कमी करणे, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे, खासगी प्रवासी गाडय़ांवर निर्बंध आणणे, एसटी आगारांमध्ये स्वच्छतागृहांची मागणी करणे यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अभ्यंकर यांनी दिली. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही सहाव्या वेतन आयोगाचे लाभ द्यावेत, तसेच एसटीला टोलमधून वगळावे, या मागण्याही करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील एसटी कामगारांनी मनरापकासेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी व ज्ञानेश्वर येरुणकर यांनी केले आहे.

राज्यातील अभियांत्रिकी सेवा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या तब्बल २१ लाख कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झालेला असतानाच राज्यातील अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या सुधारणेबाबत राज्य सरकारने कोणतीही हालचाल न केल्याने हे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पाश्र्वभूमीवर या कर्मचाऱ्यांची एक बैठक येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईत होत आहे. राज्य शासनाने अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना केंद्रीय अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. केंद्रात सहाय्यक अभियंता श्रेणी २ आणि शाखा २ ही राजपत्रित पदे आहेत. तेथे वर्ग ३ मध्ये अराजपत्रित पद आहे. त्यांना केंद्र शासनाने दिलेले श्रेणीवेतनही राज्य शासनाने दिलेले नाही. उपविभागीय स्तरावरील सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना उच्च श्रेणीचे वेतन नाकारले आहे. अधिक्षक अभियंता यांना पीबी- ३ मधील निम्नस्तर वेतनश्रेणी दिली आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाचे सचिव सुभाष चांदसुरे यांनी या संबंधीच्या पत्रकात म्हटले आहे की, वेतनश्रेण्यांबाबत राज्य शासनाने कायम अन्यायकारक भूमिका घेतली आहे. सेवानिवृत्तांसाठी केंद्र शासनाने उपदानाची दहा लाखांची रक्कम ठेवली असताना राज्य शासनाने ती फक्त ५ लाख एवढीच ठेवली आहे.
वेतनसुधारणा समितीच्या अहवालाचा अभ्यास महाराष्ट्र अभियांत्रिकी महासंघाच्या बैठकीत तपासण्यात आला. या बैठकीत सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्य शासनाला निवेदन देण्याचा आणि गरज भासल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी ११ फेब्रुवारीला महासंघाची सर्वसाधारण सभा आयोजिण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या सभेसाठी महासंघाचे अध्यक्ष अभियंता एस. बी. तामसेकर, सचिव सुभाष चांदसुरे, मारुती नालंग, रमेश जकातदार, ए. बी. गायकवाड, टी. एन. मुंढे, लहाढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

साईराज प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन
बेलापूर/वार्ताहर
: साईराज प्रतिष्ठानतर्फे नेरुळ से. ४८ येथे दहशतवादासह अन्य आंतरराष्ट्रीय विषयांवर १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे विधिमंडळ गटनेते एकनाथ खडसे हे या व्याख्यानमालेचे उद्घाटक असून बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत अनुक्रमे ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादावर’ माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, ‘भारत-अमेरिका अणुकरारावर’ भाजप प्रवक्ते माधव भंडारी, ‘भारताला पाहिजे एक बराक ओबामा’ या विषयावर कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार, ‘मातृपितृ देव भव:’ या विषयावर गुलाबराव वळसे हे विचार व्यक्त करणार आहेत. श्री गणेश मैदान सेक्टर ४८ मध्ये सायंकाळी साडेसात ते रात्री १० वाजेपर्यंत ही माला होणार आहे.