Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

दंडाच्या इशाऱ्यांना वाकुल्या दाखवत फ्रण्ट सीट रिक्षांची दौड सुरूच!
प्रतिनिधी / नाशिक

शहरवासियांसाठी रिक्षा प्रवास सुकर व्हावा, या हेतूने नाशिकमध्ये वरचेवर संबंधित यंत्रणांकडून राबविण्यात येणाऱ्या मोहीमांप्रमाणेच सध्या एक नवी म्हणजे रिक्षा चालकाशेजारी बसून प्रवास करणाऱ्या (फ्रण्ट सीट) प्रवाशांनाही दंड करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ना त्याबाबत रिक्षाचालकांना फिकीर आहे, ना प्रवाशांना अशी वास्तवातली स्थिती आहे. त्यामुळेच सोबतच्या चित्रातील दृष्य शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळते. त्याशिवाय, पोलीसांच्या नाकावर टिच्चून रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे रिक्षा उभ्या करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक हे प्रकारही बिनदिक्कतपणे सुरूच असल्याचेही दिसून येते. शहराच्या विस्ताराप्रमाणे येथील वाहतूकविषयक गरजा वाढल्या असल्या तरी त्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने बऱ्याच वेळा अन्य पर्याया अभावी लोकांना रिक्षा प्रवासाचा आसरा घ्यावा लागतो. त्यातही रिक्षा चालक अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षात कोंबतात. काही भागात तर आपल्या शेजारी दोन्ही बाजुला प्रवासी बसवितात.ही बाब धोकादायक आणि अपघाताला निमंत्रण देणारी असली तरी त्याला प्रतिबंध घालण्यात अथवा नियमबाह्य़ वर्तनाबद्दल संबंधितावर कारवाई करण्यात आजवर वाहतूक पोलीस वा प्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा यशस्वी ठरू शकलेली नाही.

गंगापूर धरणाची उंची वाढविण्यास विरोध
शेतकऱ्यांचे उपोषण, प्रतिनिधी / नाशिक

उंची वाढविण्याऐवजी धरणातील गाळ काढून अतिरिक्त क्षमता निर्माण करण्याची मागणी
गोदावरीच्या पूर नियंत्रणासाठी गंगापूर धरणाची उंची वाढविण्याच्या पुढे आलेल्या प्रस्तावाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून त्या ऐवजी धरणातील गाळ काढून अतिरिक्त क्षमता निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गैरकारभाराविषयी आमसभेत अधिकाऱ्यांना कानपिचक्या
चाळीसगाव / वार्ताहर

तालुका पंचायत समितीच्या आमसभेत विकास कामांमध्ये आढळून आलेल्या गैरकारभाराबाबत आ. प्रा. साहेबराव घोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तालुक्यातील सुमारे २२ गावे गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पाचोरा मतदारसंघात जोडलेली होती. त्यामुळे सभेला पाचोऱ्याचे आ. आर. ओ. पाटील यांनीही उपस्थिती लावली. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने सदरची गावे आता चाळीसगाव मतदारसंघास जोडली गेली तर माझ्या विजयात या गावांचा सहयोग असल्यामुळे त्या गावांना मी वाऱ्यावर न सोडता त्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

एक ‘फॉरवर्ड’ अधिकारी..
पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम. नाशिक महापालिकेची निर्मिती. स्टेडियम बांधण्याची हौस तर पूर्ण झाली, परंतु इतर अनेक योजनांप्रमाणे याबाबतीतही भविष्यकालीन नियोजनाचा अभाव असल्याने स्टेडियमचे करायचे काय, हा प्रश्न उभा राहिला. स्पर्धाअभावी स्टेडियमला रामसे बंधूंच्या एखाद्या भयपटातील भूतमहालची अवकळा आली. एका बाजूला स्टेडियम असून स्पर्धा नाहीत तर दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध क्रीडा संघटनांकडे स्पर्धाची गर्दी, परंतु स्टेडियम नाही, अशी स्थिती. ही कोंडी फोडण्यासाठी मग त्यांनी पुढाकार घेतला.

अपंग केंद्राच्या शालेय इमारतीचे उद्घाटन
सटाणा / वार्ताहर

कोणतीही गोष्ट अवघड नसते. अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेने उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करावे व समाजात स्वाभिमानाने स्वकर्तृत्वावर उभे राहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी केले. येथील काकासाहेब भामरे निवासी अपंग केंद्राच्या नुतन शालेय इमारत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सूर्यप्रतापसिंग होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आ. सुरेशदादा जैन प्रवेशद्वार, फिजीओथेरेपी सेंटर, कै. अभिमन रौंदळ, भोजनकक्ष, सहकार महर्षी वसंतराव पाटील कार्यालय, ताराचंद छोगमल लुंकड व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, स्व. बसंतीबाई संचेती अधिकारी निवासाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. संजय चव्हाण, सदानंद मोहोळ, डॉ. महेश पारीख यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. सतीश लुंकड यांनी केले. यावेळी दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. जीतेंद्र बोरा यांनी सूत्रसंचालन केले.

पिवळ्या कार्डासाठी अपंग जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार
भुसावळ / वार्ताहर

येथील अपंग बेरोजगार समितीच्या वतीने व जिल्ह्य़ातील अपंग संघटनेने पिवळे कार्ड विनाअट देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी १६ फेब्रुवारी रोजी अपंग बांधव बेरोजगार समिती संस्थापक व प्रदेश कार्याध्यक्ष अनिल इंगळे, प्रदेशाध्यक्ष घनश्याम इंगळे, मुन्ना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालतील असा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत अपंग बांधवांची मागणी पूर्ण होणार नाही व त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल व अपंग कार्यालयातच ठिय्या मांडून बसतील असा इशाराही दिला आहे.

मधुमेह निदान शिबीर
येथील लायन्स क्लब आणि ब्राह्मणसंघाचे संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी मधुमेह आणि प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबीराचे दिवशी सकाळी सात वाजता मधुमेह निदानासाठी रक्त तपासणी करण्यात येईल तद्नंतर सकाळी ९ वाजता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. शिबीर स्थानिक ब्राह्मण संघ येथे होणार असून लिलावती हॉस्पिटलचे डॉ. विजय वणीकर हे मधुमेहतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहे. ‘सुखी जीवन’ या विषयावर ते शिबीरात मार्गदर्शन देणार आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. विजय नेगलूर यांचे ‘निरामय जीवन शैली’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी या शिबीराचा लाभ जास्तीतजास्त संख्येने तालुक्यासह जिल्ह्य़ातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब अध्यक्ष अनिल भोळे, सचिव प्रा. मनोहर सराफ, ब्राह्मण संघ अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप पंडित, सचिव प्रकाशकेऱ्हाळे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा
नाशिक / प्रतिनिधी

पशूसंवर्धन विभागातील प्रलंबित मागण्यांबाबत पशू चिकित्सा व्यवसायी संघटना जिल्हा शाखा आणि विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. १२ वर्ष पूर्ण झालेल्या पशूधन-पर्यवेक्षक व सहाय्यक अधिकाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, तसेच मागील दोन वर्षांतील आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा, पदविका कोर्स सेवा अंतर्गत पूर्ण केलेला गोपनिय अहवाल व यादी पशू संवर्धन आयुक्तांना सादर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे पदोन्नतीचा लाभ होईल. पशू व म्हशी विकास या शिर्षकाखाली कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्य़ातील सर्व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संघटनेच्या सभेस उपस्थित न राहण्यासाठी दमदाटी करतात अशी तक्रार करून त्यांची मनमानी थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांवर तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी डॉ. सी. एन. हजारी , डॉ. पी. जी. हांडगे, डॉ. बी. एल. पगार, डॉ. सुनील परदेशी आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

भुसावळ व धरणगाव बाजार समितीत आमदारसमर्थक गटांचा विजय
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ातील भुसावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संतोष चौधरी गटाचा तर धरणगाव बाजार समितीत युती व आ. जैन समर्थक गटाचा विजय झाला. या निकालांनी उभय तालुक्यांतील आमदारांनी आपापले वर्चस्व सिद्ध केले आहे. भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादीचे आ. चौधरी यांनी भाजप-सेना युती समर्थक गटाचा सपशेल पराभव केला. या ठिकाणी चौधरी यांच्या विरोधी गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे बाजार समितीवर चौधरी गटाची आता एकहाती पकड राहणार आहे. धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत सुरेश जैन, एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील, या आमदार त्रयींच्या समर्थकांनी बाजी मारली. बाजार समितीतील १९ पैकी १८ जागा जिंकत या गटानेही मोठा विजय मिळविला. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकारणाच्या दृष्टीने या निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले होते.

‘आर्थिक क्षमता वाढविण्याची गरज’
नाशिक / प्रतिनिधी

पूर्वीच्या काळात राष्ट्राचे सामथ्र्य सैन्यांवर अवलंबून होते, परंतु आज परिस्थिती तशी राहीली नाही. आज आर्थिक क्षमतेवर राष्ट्राची ताकत मोजली जात असून त्यासाठी आपली आर्थिक क्षमता वाढविण्याची गरज आहे. भारत व अमेरिका यांच्या दरम्यान झालेला अणुकरार हा देशहिताचाच आहे, असे प्रतिपादन माजी लष्करी अधिकारी डी. बी. शेकटकर यांनी केले. पुणे विद्यापीठ आणि जी. डी. सावंत महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘अणु करार आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे परिणाम’ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. वा. न. भेंडे, गोदावरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बी. बी. चौरे उपस्थित होते. चर्चासत्रात १३६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी डॉ. डी. के. गोटखिंडीकर आणि डॉ. जी. व्ही. कायदेपाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सी. बी. चौधरी, डॉ. आर. आर बेराड, डॉ. एस बी. परांजपे, डॉ. एस. टी. सावंत या प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. एस डी. आहेर, प्रा. मनोहर निकम, जीवन वाघ, उपप्राचार्य मनिषा देशपांडे, अशोक सावंत आदी उपस्थित होते.

एसटी भाडय़ात कपात करण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

इंधन दर कपातीनंतर आता राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाडय़ात ४० टक्क्य़ांनी कपात करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नाशिक विभागीय वाहतूक समितीचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी केली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदा महामंडळाला दीडशे कोटी रूपयांचा नफा झाला आहे. दोन वर्षांच्या तुलनेत डिझेलच्या किंमती बऱ्याचशा खाली उतरल्याने प्रवासी भाडे कमी करणे आवश्यक आहे. दर कपात लागू केल्यावर महामंडळाला खासगी व अवैध प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देता येऊ शकेल. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अन्य राज्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडय़ात ४० टक्के कपात करणे गरजेचे आहे. तसेच ज्या ठिकाणी महामंडळाची शहर बस सेवा आहे तिथे किमान दोन रूपये किलोमिटर या एका टप्प्याचे भाडे पाच रूपयावरून दोन रूपये करावे, असेही बुरड यांनी म्हटले आहे.