Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कायम करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण.

बदललेले येवला पाहून शरद पवारही चकित
वार्ताहर / येवला

ठिकठिकाणी उभारलेल्या गुढय़ा, पताका..चकाकणारे रस्ते..पंचतारांकीत हॉटेलची बरोबरी करणाऱ्या शासकीय इमारती..येवल्यासारख्या ग्रामीण भागात सुरू झालेले विकासाचे हे नवपर्व पाहून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आश्चर्यचकीत न झाले तरच नवल ! तालुक्याचा चेहरामोहरा बदलविणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन करणारे पवार त्यामुळेच वारंवार बरोबरच्या पदाधिकाऱ्यांना विकासाच्या बाबतीत छगन भुजबळ यांचा आदर्श इतर सर्वानी घ्यावा, असा उपदेश करीत होते. चौपदरी रस्त्याचा लोकार्पण सोहळा असो की मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन असो, प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची उसळणारी प्रचंड गर्दी पाहून पवार चकीत झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

अपंग महिलेचे असेही आंदोलन
पोलीस, महसूल यंत्रणेकडून गयावया

वार्ताहर / धुळे

गरीब कुटुंबियांना डावलून सधन कुटुंबांना दारिद्रय़रेषेखालील सुविधा पुरविण्यात येत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनांतर्गत एका अपंग महिलेने उंच झाडाच्या फांदीवर चढून अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला. जोवर शासन स्तरावर अंध-अपंग आणि दारिद्रय़रेषेखालील कुटुंबाच्या मागण्यांवर निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, अशी भूमिका तिने घेतल्याने पोलीस, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना गयावया करून या महिलेला खाली उतरावे लागले.जिल्ह्य़ातील गरजू-गरीब कुटुंबांनाच दारिद्र्य रेषेच्या शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागणीसाठी तसेच अंध-अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे.

जळगाव : पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार उघड
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ाच्या भुसावळ परिसरातील कुऱ्हे पानाचे येथे भारत निर्माण योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेत लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्या मागणीमुळे झालेल्या चौकशीत भ्रष्टाचाराचे स्वरूप स्पष्ट झाले. कुऱ्हे पानाचे गावातील भारत निर्माणच्या नळ पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर उपविभागाच्या पाणी पुरवठा उपअभियंत्यांनी चौकशी करून आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केला. गावासाठी ४३ लाख रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येऊन ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला १९ लाख ७७ हजार रूपये इतकी रक्कम कामाच्या पहिल्या हप्त्याची म्हणून अदा करण्यात आली होती. नरडाण्याच्या एका ठेकेदाराला सदर कामाचा ठेका देण्यात आला होता. चार महिन्यात पूर्ण होणे आवश्यक असलेले काम दीड वर्ष होऊनही पूर्ण झाले नाही. कामावर १५ लाख ५६ हजार रूपये खर्च दाखविण्यात आला असला तरी त्यात सुमारे चार लाखाची तफावत असल्याचे पाटील यांचे म्हणणे होते. या पाश्र्वभूमीवर झालेल्या चौकशीत कुऱ्हे पानाचे येथील ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या अध्यक्षांना या संदर्भात तफावतीची रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेत सदर भरणा न झाल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात जल स्वराज्य प्रमाणेच आणखी बऱ्याच गावात नळ पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धुळे शहरासह ग्रामीण भाग सौरदिव्यांनी उजळला
वार्ताहर / धुळे

अपांरपरिक ऊर्जा वापरणारी धुळे महापालिका राज्यातील पहिलीच महापालिका ठरली असून शहरासह ग्रामीण भागात ४९० सौरदिवे बसविण्यात आले आहेत. सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या सौर दिव्यांमुळे महापालिका व अन्य विभागांचा दरवर्षी वीज वापरापोटी होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे.
आधुनिकीकरण आणि लोकसंख्यावाढ यामुळे वीजेची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढतच आहे. एकूणच विजेवर अवलंबून असणाऱ्या घटकांमुळे विजेचा मोठा वापर होतो आणि हवी तेवढी वीज मात्र निर्माण होत नाही. या कारणामुळे राज्यभरात वीज दाबनियमनाशिवाय पर्याय उरत नाही. शक्य तेवढी वीज बचत करण्यासाठी धुळे जिल्ह्य़ाने केलेला सौरदिवे वापराचा प्रयोग यशस्वी झाला आहे. घर, शेती, लहान मोठे उद्योग या ठिकाणी विजेचा मोठा वापर होत असला तरी किमान रात्री प्रकाश राहावा म्हणून तरी अपांरपरिक वीज वापरावर जिल्ह्य़ात भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे शहर व ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले सौर दिवे होय. शहर व ग्रामीण भागात ४९० सौरदिवे वापरात आल्याने धुळे जिल्ह्य़ातदील दुर्गम व डोंगराळ भागातील वाडय़ा आणि वस्त्या उजळल्या आहेत. ३१० सौरदिवे अशा भागांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे बसविण्यात आल्याने प्रतिवर्षी ६६ हजार ५०० रुपयांची बचत होत आहे. वेगवेगळ्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही प्रत्येकी दोन याप्रमाणे ८० सौरदिवे बसविण्यात आल्याने दरवर्षी १७ हजार ८२० रुपयांची बचत होत आहे. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात १०० सौरदिवे बसविण्यात आले आहेत. केंद्र सरकारनेही यासाठी १० लाख रुपये अनुदान दिले तर महापालिकेने १४ लाख रुपये खर्च केले. शहरातील महत्वाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी हे सौर दिवे बसविण्यात आले आहेत. हे सर्व दिवे स्वयंचलीत असल्याने सायंकाळी सातच्या सुमारास ते सुरू होतात. त्यामुळे सुमारे एक लाख २० हजार रुपयांची महापालिकेची बचत केवळ सौर दिव्यामुळे झाली आहे. या स्वयंचलीत यंत्रणेमुळे स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची गरज नाही आणि भारनियमनाच्या काळातही हे दिवे प्रकाशमान असतात. महापालिकेने दीड लाख रुपये खर्च करून जकात नाक्यांवरही २४ तास चालणारे सोलर ब्लिकेर बसविले आहेत.