Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

संगीत मन को पंख लगाए

 

पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा किताब बहाल होत असतानाच उस्ताद झाकीर हुसेन यांना मानाचा ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली होती आणि त्याच वेळी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाच्या संगीतासाठी भारताचे आजच्या पिढीचे ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांना बाफ्ता पुरस्कार मिळाल्याचीही घोषणा झाली. हे सारे घडत असताना ज्ञानदेव माउलींच्या आळंदीमध्ये ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ची महागायिका कार्तिकी गायकवाड मिरवणुकीने माउलींच्या देवळात आशीर्वाद घेण्यासाठी जात होती. संगीताच्या क्षेत्रात एकाच वेळी घडलेल्या या चार घटना जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर संगीत किती पोहोचले आहे, याचे निदर्शक मानाव्या लागतील. भारतीय संगीत ही जगातील सगळय़ा संगीतामधील एक अद्भुत आणि रम्य अशी गोष्ट आहे, हे एव्हाना साऱ्या जगाने मान्य केले आहे. पृथ्वीवरील कोणत्याही भागात संगीत ही गोष्ट साऱ्या समाजाला एकत्र बांधून ठेवणारी ठरली आहे. गमतीचा भाग असा की, ज्या काळात पृथ्वीच्या एका भागात राहणाऱ्या मानवाला पृथ्वीच्या दुसऱ्या भागात राहात असलेल्या त्याच्या बांधवाच्या अस्तित्वाची माहितीही नव्हती, त्या काळात एकाच प्रकारे संगीत नावाची गोष्ट आकाराला येत होती. तेव्हा गळय़ातून बाहेर पडणाऱ्या आवाजाचे स्वरांमध्ये रूपांतर होत होते आणि आपल्या प्रज्ञेच्या ताकदीवर मेंदूमध्ये तयार होत असलेले संगीत व्यक्त करण्यासाठी वाद्यांचा शोध लावला जात होता. आपल्याकडची बासरी हा आपल्या संगीताचा आद्य उद्गार आहे, असे आपण मानले, तर जगाच्या इतर भागांत साधारणत: त्याच काळाच्या परिघात म्हणजे इसवी सन पूर्व तीन-चार हजार वर्षांपूर्वी वायुवाद्याचाच शोध लागत होता. माणूस वेगवेगळय़ा ठिकाणी राहूनही एकाच प्रकारे संगीताचे विश्व उलगडत होता, ही केवळ रंजक नव्हे, तर मानवी प्रज्ञेचा साक्षात्कार घडवणारी घटना आहे. संगीत म्हणून जे काही आहे, त्यात त्या त्या भागातील संस्कृतीची मिसळण खूप उशिराने झाली असावी. सांस्कृतिकदृष्टय़ा समाज जसजसा विकसित होऊ लागला, तसतसे त्याचे प्रतिबिंब प्रथम त्याच्या संगीतात उमटू लागले. जगण्याची, राहण्याची, वागण्याची आणि बोलण्याची सारी तऱ्हा त्याच्या संगीतातून व्यक्त होऊ लागली. त्याला त्या त्या भागातील हवामान जसे कारणीभूत ठरले तसेच तेथील संस्कृतीही! त्यामुळेच विविध देशांमध्ये संगीत मुळापासून एक राहिले तरी त्याचे व्यक्त होणे मात्र बदलत गेले. काळानुरूप संगीतात झालेले बदलही सांस्कृतिकदृष्टय़ा सर्वात आधी झाल्याचे आपल्या सहजपणे लक्षात येईल. त्यामुळे संगीतात सर्वात शेवटी बदल होतात, असे म्हणणाऱ्यांनी संगीताचा सामाजिक आशयही लक्षात घ्यायला हवा. गेल्या काही शतकांत मानवी संस्कृतीच्या बदलामध्ये विज्ञानाने बजावलेली कामगिरी केवळ अतुलनीय अशी असली, तरीही विज्ञानाच्या प्रत्यक्ष शोधांच्या कितीतरी आधीपासून जगाच्या विविध भागांत माणसाने विज्ञानाच्याच आधारे संगीतातील सौंदर्याची जोपासना सुरू ठेवली होती. स्वरांची स्थाने निश्चित करणे असो की, वाद्यांची निर्मिती असो, त्या सगळय़ांत विज्ञानाचा पाया पक्का होता. ए. आर. रहमान असो की झाकीर हुसेन; या सगळय़ांनी ज्या सौंदर्यनिर्मितीचा ध्यास घेतला तो एका अपूर्व आणि अद्भुत शक्तीचाच शोध आहे, हे मान्य करायला हवे. वयाच्या सातव्या वर्षीच तबलावादन करता येणारा झाकीर नावाचा तबलानवाज हा एक चमत्कार मानला जातो. ए. आर. रहमान यांच्याबाबतही नेमके असेच म्हणता येईल. वयाच्या अगदी विशीत असताना या संगीतकाराने भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा जो मेळ घातला त्याने भारतीय तर कधीच विस्मित झाले होते, आता वेळ होती ती पाश्चात्त्यांची! पंडित भीमसेन जोशी यांनी भारतीय संगीताच्या माध्यमातून वैश्विक संगीताला घातलेली साद जशी सगळय़ांना भुरळ पाडून गेली, तशीच साद ‘सारेगमप’मधील छोटय़ा पाच कलावंतांनीही अवघ्या मराठी मनाला घातली. ज्या वयात स्वरांची आवर्तने फक्त घटवण्यातच वेळ जातो, ज्या वयात स्वरातून भाव व्यक्त करायचे म्हणजे काय, तेही समजू शकत नाही; ज्या काळात संगीताच्या बरोबरीने खेळण्याचे आणि आनंदाचे कितीतरी साधेसाधे क्षण हवेहवेसे वाटत असतात, त्या वयात ही मुले चमत्कार वाटावा, इतक्या सहजतेने आपल्या सगळय़ांना आश्चर्यचकित करत होते. संगीताची ही ताकद आपण सगळे जण अनुभवत होतो आणि त्यातून आपल्यालाही स्वरांच्या या अनोख्या दुनियेत विहार करता येत होता. संगीत ही एक करमणूकप्रधान आणि रंजकप्रधान गोष्ट आहे, असे भारतीय समाजाने कधीच मानले नाही. संगीताकडे आपण सगळय़ांनीच अतिशय गांभीर्याने पाहिले आणि त्यातून वेगवेगळे भाव व्यक्त करण्याच्या सगळय़ा शक्यता आपण सातत्याने तपासून पाहिल्या. त्यामुळे संगीताकडे आपण ‘मार्केट’ म्हणून कधी पाहिले नाही. जगात सगळय़ाच क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथींचा जीवनावर होणारा परिणाम संगीताचे मार्केट निर्माण होण्यात झाला. ही बाजारपेठ केवळ यशाच्या आणि पैशाच्या ताकदीवर तोलणारी नाही, तर ती गुणात्मकही आहे, याचे भान भारतीय कलावंतांना अगदी अलीकडच्या काळात आले. पंडित रविशंकर यांच्यासारखा दिग्गज कलावंत जेव्हा पाश्चात्त्यांच्या गळय़ातला ताईत बनला, तेव्हा भारतीय संगीताची बाजारपेठ खऱ्या अर्थाने वैश्विक झाली. झाकीर हुसेन जेव्हा पाश्चात्त्यांच्या ‘बीटस्’मध्ये आपल्या तालाची आवर्तने मिसळू लागले, तेव्हा जगाच्यासाठी तो एक आगळावेगळा कलात्मक आविष्कार होता. ए. आर. रेहमान यांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेले गाणे हे काही भारतीय सांगीतिक अस्मितेचे एकमेव प्रतीक नाही; परंतु त्यातून जी वैश्विक संगीताला कवेत घेण्याची क्षमता सिद्ध झाली, ती अधिक महत्त्वाची आहे. बीटस् आणि ताल यांची अप्रतिम सांगड घालणारे झाकीर हुसेन आणि रेहमान हे त्यामुळे जागतिक संगीताचे खरेखुरे प्रतिनिधी होऊ शकले आहेत. भारतीय संगीतातून भाव व्यक्त करण्याची जी सर्जनशील क्षमता आहे, ती जगातल्या इतर संगीतांनीही सहजपणे आत्मसात केल्याचे आता आपल्याला दिसू लागले आहे. एवढे सारे असले तरी संगीताच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा इतका कमी आहे की, आपण आपल्या संगीताचा, त्याच्या संपन्न परंपरेचा आणि गुणवैशिष्टय़ांचा कितीही गर्वाने उल्लेख केला तरी त्याचा जागतिक संगीतावर होणारा परिणाम फार अल्प आहे, याचे भान आपल्याला असायला हवे. संगीत विकत घेऊन ऐकणाऱ्या जगातील शंभर लोकांमध्ये भारतीयांची संख्या केवळ सहा एवढी आहे, असे तुम्हाला सांगितले तर काय वाटेल? आपण संगीत ऐकतो, आपण आपले सगळे व्यवहार संगीताच्या संगतीत करतो, संगीत हा आपला प्राण आहे; हे सगळे खरे असले तरी आपण संगीताच्या या बाजारपेठेत नेमके कुठे आहोत, सव्वाशे कोटींच्या देशातील किती जण या बाजारात आपले स्थान अजमावतात याचा शोध आपण घ्यायला हवा. भारतीय संगीताने जगाच्या नकाशावर आपले स्थान निश्चित केल्याचा या चार घटना साक्षीदार आहेत. जागतिक बदलांचा नेमका वेध घेऊन त्याचे सांगीतिक रूपांतर करण्याची क्षमता भारतीय कलावंतांमध्ये आहे, हे जसे या पुरस्कारांमुळे अधोरेखित झाले आहे, तसेच आपल्या संगीतालाही आता पंख फुटले आहेत आणि ते आता जगात स्वैरपणे मुक्त विहार करू शकतात हेही सिद्ध झाले आहे. जगातल्या इतर सगळय़ा संगीतप्रणालींपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध करण्याची ही वेळ आपण दवडता कामा नये. आपल्या सगळय़ांना ज्या संगीताचा एवढा अभिमान आहे, त्या संगीताची संपन्न परंपरा टिकवणे हे जसे आपले आद्य कर्तव्य आहे, तसेच ते संगीत जगाच्या इतर सांगीतिक प्रवाहांशी संवाद कसे साधू शकले, हे पाहणे हेही आपल्या सगळय़ांचे कर्तव्य आहे. आपण सगळे जण संगीताची भक्ती करत असलो तरीही ते संगीतपंख लावून उंच भरारी घेण्यासाठी त्या पंखात वाऱ्याचे बळ निर्माण करण्यासाठी कलावंत आणि रसिक या सगळय़ांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. आपल्या संगीताच्या हजारो वर्षांच्या परंपरेत अनेक प्रवाह मिसळले. त्यातील काही कलात्मकतेच्या कारणासाठी दूर फेकले गेले, तर बरेचसे प्रवाह आपल्या संगीतात दुधात साखर विरघळावी, असे सहजगत्या मिसळले. जगातल्या सगळय़ा संगीतात हे बदल सातत्याने होत असतात. हे प्रवाहीपण हेच तर संगीताचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. ते टिकवणे, वाढवणे आणि त्याला वैश्विकता प्राप्त करून देणे यासाठी आपण केवळ टाळय़ा वाजवून किंवा समारंभ साजरे करून भागणार नाही. आपले प्रत्येकाचे स्वल्प योगदान आता उंच भरारी घेण्यासाठी फार फार आवश्यक आहे.
mukundsangoram@gmail.com