Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

विधायक विद्रोह!

 

मराठी साहित्याची परंपरा जशी प्राचीन आणि समृद्ध आहे, तशीच वेगवेगळ्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत या साहित्याने घेतलेली वळणं आणि निर्माण झालेल्या चळवळीही नोंद घेण्यासारख्या आहेत. फार जुन्या काळात न जाता, अगदी गेल्या ३०-३५ वर्षांमधील मराठी साहित्याची वाटचाल पाहिली तर ऐन आणीबाणीत कराडला कै. दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक अभूतपूर्व कलाटणी देणारा टप्पा होता. त्याचबरोबर आजही वादग्रस्त असलेले केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असताना निर्माण झालेल्या वादळाच्या पाश्र्वभूमीवर बंडखोर लेखिका मालतीबाई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरलेल्या समांतर साहित्य संमेलनाने साहित्यविषयक चळवळीला नवी दिशा देण्याची उमेद निर्माण केली होती. पण अखेर हे दोन्ही टप्पे इतिहासजमा झाले. नाही म्हणायला, १९८० च्या दशकात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ जोशात असताना त्याची छाया साहित्य संमेलनं आणि चळवळीवरही पडली. पण नामांतरानंतर तोही प्रभाव ओसरला. पुन्हा एकवार शिक्षणसम्राट आणि साखरसम्राटांच्या ‘उदार’ आश्रयाखाली साहित्य संमेलनाचे उत्सव रंगायला लागले. १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार आल्यानंतर मात्र वातावरण पुन्हा गढूळलं. मुंबईत १९९९ मध्ये ज्येष्ठ कवी कै. प्रा. वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी त्याची परिसीमा गाठली गेली आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची ठिणगी पडली. त्या वर्षी धारावीत मोठय़ा उत्साहाने हे संमेलन भरवण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नंदुरबार, मनमाड, वाशी (नवी मुंबई), धुळे आणि सोलापूर या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने संमेलनं यशस्वीपणे आयोजित केली गेली आणि यंदा, गेल्या ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी कणकवली येथे या उपक्रमाची दशकपूर्ती झाली.
विविध सांस्कृतिक चळवळींचा वारसा लाभलेल्या कणकवलीमध्ये भरलेल्या या दहाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय पवार हे प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही कला क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे संचार करणारे प्रतिभाशाली साहित्यिक-कलावंत असल्यामुळे या संमेलनाबद्दल विशेष आकर्षण होतं. त्याचप्रमाणे संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कॉ. कमलताई परुळेकर आणि दिल्लीच्या जामिया उस्मानिया विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख असगर वसाहत हे उद्घाटक म्हणून व्यासपीठावर उपस्थित राहिल्यामुळे लोक चळवळीला पोषक वातावरणात संमेलनाची सुरुवात झाली. अन्य कुठल्याही साहित्य संमेलनाप्रमाणे इथेही अध्यक्षीय भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागलेलं होतं आणि पवारांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी उदारमतवादी, पण ठाम भूमिका मांडत एकूणच आगामी विद्रोही साहित्य चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न केला.
याबाबत अनौपचारिकपणे बोलताना पवार म्हणाले की, सर्वसाधारणपणे कोणतंही साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याची प्रथा असते, पण एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून दरवर्षी भपकेबाज साहित्य संमेलन भरवणाऱ्या पारंपरिक संमेलनांसारखी चैन विद्रोही चळवळीला परवडणारी नाही. त्याची तशी गरजही नाही. त्यापेक्षा यापुढे दर तीन वर्षांनी एकदा हे संमेलन आयोजित करण्यात यावे आणि उरलेली दोन र्वष या चळवळीतील नव्या दमाच्या, उदयोन्मुख लेखकांच्या जडणघडणीसाठी खर्च करण्यात यावीत. त्यांच्यासाठी अभ्यासवर्ग, कार्यशाळा, लेखन शिबिरं आणि प्रत्यक्ष निर्मिती यावर जास्त भर देण्याची आवश्यकता आहे. त्यातून निर्माण झालेलं साहित्य किंवा रंगमंचीय कलाकृती तिसऱ्या वर्षी होणाऱ्या संमेलनामध्ये सादर करण्यात आली. यामागील भूमिका थोडी जास्त स्पष्ट करताना पवार म्हणाले की, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची पहिली दोन-तीन वषर्ं प्रतिक्रियात्मक स्वरूपाची असणं स्वाभाविक होतं. पण आता आपली समांतर, सकारात्मक निर्मिती गरजेची आहे. साहित्याचे विविध प्रकार, आकृतीबंध, समांतर रंगभूमीवरील नाटकांची चर्चा, हे आता घडायला हवं. साडेतीन टक्क्यांचं साहित्य, संस्कृती किंवा परंपरा नाकारताना उरलेल्या साडेशहाण्णव टक्क्यांचं साहित्य, संस्कृती आणि परंपरेबाबत भूमिका काय असावी, हे लिखित स्वरूपात मांडायला हवं. ‘सदाशिव पेढी’ समीक्षा सौंदर्यशास्त्र, आकृतीबंध नाकारत असू तर विद्रोही विचारांची समीक्षा, सौंदर्यशास्त्र, आकृतीबंध इत्यादींवर विचार आणि कृतीही व्हायला हवी. आता केवळ घोषणेच्या पातळीवर राहून चालणार नाही, तर त्याला सकारात्मक, विधायक कामाची जोड देणं आवश्यक आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमांचा आपल्या उद्दिष्टांसाठी कल्पक वापर करण्यावर भर देताना पवार म्हणाले की, एकता कपूरच्या मालिका नाकारताना ‘हिस्टरी’ किंवा ‘डिस्कव्हरी’ चॅनेलचा पुरस्कार आपण करायला हवा. सध्याच्या दूरचित्रवाणी मालिका आणि वृत्तपत्रांच्या पुरवण्यांना नवा पर्याय, नवा आशय देण्याची आज गरज आहे. विद्रोही चळवळीनं हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने बांधणी करायला हवी. व्यावसायिक चित्रपटांकडे मनोरंजनाची इंडस्ट्री म्हणून पाहिलं जातं. पण त्याही माध्यमाचा वापर करायला आम्ही शिकलं पाहिजे. ‘दलित रंगभूमी’ हे नाव आज नसेल कदाचित. पण बोधी नाटय़ चळवळीच्या रूपानं होत असलेल्या प्रयत्नांचं अनुकरण करण्याची गरज आहे.
अर्थात, अशा प्रकारे साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात विद्रोही चळवळीची भूमिका अधोरेखित करीत असतानाच सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचेही भान पवारांच्या बोलण्यातून व्यक्त झालं. किंबहुना काही प्रश्न राजकीय चळवळीतूनच सोडवावे लागतील, असं ठामपणे प्रतिपादन करतानाच ते म्हणाले, तळाच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन हा किमान समान कार्यक्रम घेऊन विविध विचारधारांच्या लोकांना एका ठिकाणी आणलं पाहिजे. पूर्वी कै. प्रा. गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर, श्री. ग. माजगावकर यांच्यासारखी वेगवेगळ्या विचारसरणींची माणसं होती. पण त्यातूनही कामं उभी राहिली. साहित्यामध्ये हा पर्याय जास्त खुला असतो. मानवमुक्तीचा विचार घेऊन सर्व प्रागतिक प्रवाह या व्यासपीठावर एकत्र कसे येतील, हे आज बघण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. माझ्या मते यात चळवळ किंवा विचार चुकीचा नसतो. आपण चुकत असतो. तरुणपणी विशिष्ट विचारांना बांधलेली, पण आज चाळिशी-पन्नाशीत असलेली पिढी काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. नव्या पिढीला या चळवळींचा पूर्वेतिहास सांगायचा की, पर्यावरण जागतिकीकरणासारख्या त्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांचा परिचय करून द्यायचा? आजच्या संदर्भात चंगळवादाची नव्यानं व्याख्या करावी लागेल. दलितांमधला मोठा वर्ग राजकीय चळवळींकडेच आकर्षित होतो. पण मग शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक क्षेत्रांचं काय? राज्यकर्त्यांच्या धोरणात्मक निर्णयावर दबाव टाकू शकणारे सांस्कृतिक, शैक्षणिक गट का नाहीत? या प्रश्नांचा विचार करून नव्या पिढीला जोडून घेत विचार आणि माध्यम यांची सांगड घालत विद्रोही चळवळींना पुढील वाटचाल करणं गरजेचं आहे.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात गटचर्चा, परिसंवाद, कविसंमेलनं इत्यादी कार्यक्रमही यथासांग पार पडले. पण या निमित्ताने संमेलनाध्यक्ष संजय पवार यांनी मांडलेली विधायक विद्रोहाची संकल्पना जास्त प्रभावी होती. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा तात्त्विक पाया आणि सैद्धांतिक भूमिका मांडणाऱ्या मसुद्यावर सध्या चर्चा चालू आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष संजय पवारांच्या भूमिकेचं प्रतिबिंब त्यामध्ये पडलेलं दिसेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
कोकणामध्ये यापूर्वी साहित्य किंवा नाटय़संमेलनं झाली आहेत. पण विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रथमच आयोजित करण्यात आलं. त्यातून पुढे आलेले विचार या चळवळीला नवी दिशा देऊ शकतील, असा विश्वास वाटतो.
सतीश कामत
pemsatish@yahoo.co.in