Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

विद्यापीठाची सायबर भरारी..
हीरकमहोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करताना पुणे विद्यापीठाने सायबर भरारी घेतली आहे. ट्रिपल कनेक्टिव्हिटी, संगणकाधारित प्रशासन यंत्रणा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहेच. वर्धापनदिनाच्या निमित्ताने विद्यार्थिभिमुख संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले. त्या वेळी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, बी. जी. देशमुख, डॉ. प्र. चिं. शेजवलकर, सिंधुताई सपकाळ, बाळासाहेब वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. www.unipune.ac.in असा या संकेतस्थळाचा पत्ता आहे

राज्यातील विद्यापीठांमध्ये आता ‘पुणे पॅटर्न’!
देणगी व थकबाकी

पुणे, १० फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईसह मद्रास व कोलकाता विद्यापीठांना केंद्र सरकारने प्रत्येकी १५० कोटी रुपये दिले. कोणतीही मागणी केली नसताना मराठवाडा विद्यापीठाला राज्य शासनाने १० कोटी रुपये दिले. आता पुणे विद्यापीठाचा हीरकमहोत्सव आहे.

निसर्ग हॉटेलमध्ये आग
पुणे, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

एरंडवणा येथे नळस्टॉप चौकाजवळ असलेल्या हॉटेल निसर्गमध्ये आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या अथक परिश्रमामुळे ही आग अध्र्या तासातच आटोक्यात आणली गेली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, हॉटेलच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने तेथील वाहतूक काही काळ वळविण्यात आली होती.

‘शिक्षक, संगीताचा व्यासंगी, चांगला माणूस हरपला’
पुणे, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

चौथ्या पिढीचे मार्गदर्शक, पत्रकारांसाठी पक्के माहितीचे स्रोत, विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक, संगीताचे व्यासंगी, अनेकांचा सच्चा मित्र, सहकारी आणि मानवी समाजातील श्रेष्ठ माणूस.. अशा शब्दांत पुणेकरांनी आज प्रा. अजित सोमण यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वरानंद प्रतिष्ठान, आशा फाउंडेशन आणि पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ प्राध्यापक व बासरीवादक प्रा. अजित सोमण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी स्वरानंद प्रतिष्ठानचे प्रकाश भोंडे, शिरीष बोधनी, प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये, अनिल टाकळकर, ललित कला केंद्राच्या शुभांगी बहुलीकर, इएमआरआरसीचे संचालक समिरण वाळवेकर, भाग्यश्री सोमण, आशा फाउंडेशनचे प्रमुख चंद्रकांत कुडलकर उपस्थित होते.

प्रचंड पोलीस बंदोबस्तात शिखरी काठय़ा खंडोबा मंदिराला भेटल्या
जेजुरीच्या माघी पौर्णिमा यात्रेस दीड लाख भाविक

जेजुरी, १० फेब्रुवारी/वार्ताहर

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेस दीड लाख भाविक आले होते. दरवर्षी वादग्रस्त ठरणारी शिखरी काठय़ांची मिरवणूक दोन्ही मानकऱ्यांनी यावेळी स्वतंत्रपणे काढल्याने यात्रा शांततेत पार पडली.पूर्वीपासून माघ पौर्णिमा यात्रेमध्ये संगमनेर येथून येणारी होलम काटकर यांची काठी व सुपे (ता. बारामती) येथून येणारी खैरे यांची काठी या दोघांमध्ये खंडोबा गडावरील शिखराला काठी टेकविण्याची स्पर्धा होत असे, परंतु कायम वाद होत असल्याने तीन वर्षांपूर्वी होलम, खैरे व जेजुरीची मध्यस्त काठी (होळकर) या तीनही काठय़ा एकत्र बांधून देवाला भेटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वसंतदादा बँकेवर अवसायक नेमणार- सहकार मंत्री
पुणे, १० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याबाबत कोणताही राजकीय दबाव नसून भारतीय रिझव्र्ह बँकेच्या आदेशानुसार बँकेवर अवसायक नेमण्याची सूचना सहकार आयुक्तांना करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आर्थिक अडचणीमुळे वसंतदादा सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला आहे. या बँकेवर अवसायक नेमण्याचे आदेश रिझव्र्ह बँकेने दिले आहेत. मात्र एक महिना उलटूनही बँकेवर अवसायक नेमला गेला नाही. यासंदर्भात सहकार मंत्र्यांना विचारले असता, त्यांनी रिझव्र्ह बँकेच्या निर्देशांनुसार अवसायक नेमण्यात येईल, असे स्पष्ट केले. रिझव्र्ह बँकेने दिलेल्या निर्देशांमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे कोणाच्या दबावाने बँकेवर अवसायक नेमण्यासाठी थांबायला सांगितलेले नाही आणि सांगू शकतही नाही, असेही पाटील यांनी सांगितले. वसंतदादा सहकारी बँकेच्या सुमारे ३१५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र वसुली व गैरकारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे बँकेवर आर्थिक निर्बंधही लागू करण्यात आले तसेच बँकेचा व्यवसाय परवाना रद्द झाला आहे. बँकेचा तोटा १९५ कोटींवर गेल्याने अवसायक नेमण्याचा आदेश रिझव्र्ह बँकेने दिला आहे. अवसायक नेमल्यास बँकेच्या सुमारे १ लाख ९४ हजार ठेवीदारांच्या एक लाखाच्या आतील ठेवींना संरक्षण मिळू शकणार आहे.

महिला बचतगटांच्या माध्यमातून समाजाचा विकास - मंगल शहा
हडपसर, १० फेब्रुवारी/वार्ताहर

सर्वसामान्य महिलांच्या बचतगटांच्या माध्यमातून समाजाचा विकास होण्यास मोठी मदत होत आहे. त्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य महिलांच्या बचतगटाच्या माध्यमातून सर्वागीण विकास व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे बारामतीच्या नगराध्यक्षा मंगल शहा यांनी सांगितले. भेकराईनगर येथील सुयबा मंगल कार्यालयात महिला बचतगटांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक रत्नप्रभा जगताप, कल्पना शेवाळे, कल्पवृक्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा जयश्री रणनवरे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, सुरेखा व अलका सूर्यवंशी, नानासाहेब सूर्यवंशी, राजाभाऊ सूर्यवंशी, श्याम ससाणे, शारदा होले आणि मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी दर्जेदार व कमी खर्चात मालाचे उत्पादन करून बचतगटांनी बाजारात आपले स्थान मिळविले आहे. शासनाने महिलांना सर्व क्षेत्रांत प्राधान्य दिले आहे. शासनाने बचतगटांना चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला आहे. हवेली तालुक्याचे सरचिटणीस पंढरीनाथ निवंगुणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक राहुल चोरघडे यांनी केले, तर अलका सूर्यवंशी यांनी आभार मानले.

क्रेडिट कार्ड चोरून सव्वा लाखाची खरेदी
पिंपरी, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

खराळवाडी (पिंपरी) येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे क्रेडिट कार्ड चोरून सव्वा लाख रुपयांची खरेदी केल्याची तक्रार आज पिंपरी पोलिसांकडे दाखल करण्यात आली. या प्रकरणी शिवशंकर श्रीपाद तिवारी (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. खराळवाडी येथील पंजाब केमिकल्स या कंपनीत संचालक या पदावर सेवेत असलेले तिवारी यांनी आपली स्कॉर्पिओ गाडी कंपनीसमोर थांबवली होती. सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास गाडीच्या पाठीमागील खिडकीची उघडी काच पाहून चोरटय़ाने आतील सीटवरचे पाकीट चोरले. त्यातील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून त्याने बाजारपेठेतून तब्बल सव्वा लाख रुपयांची खरेदी केली. या गुन्हय़ाचा तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शेळके करत आहेत.

पेन्शनर्स असोसिएशनतर्फे १६ रोजी धरणे आंदोलन
पुणे, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या सहाव्या वेतन आयोगात अनेक त्रुटी असून याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर लोकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी एकनाथ देशपांडे, चिंतामण प्रभुणे उपस्थित होते. सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तिवेतनाचा लाभ १ जानेवारी २००६ पासून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यापुढील थकबाकी पुढील पाच वर्षांत पाच टप्प्यात मिळणार आहे. या अन्यायामुळे निवृत्तिवेतनधारकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे लोकूर यांनी सांगितले.

प्रा. प्र. के. घाणेकर यांना दुर्गप्रेमी जीवनगौरव पुरस्कार
पुणे, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

दुर्ग राजमाची येथे येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या दुर्ग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रा. प्र. के. घाणेकर यांना पहिला दुर्गप्रेमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. घाणेकर हे गेली चाळीस वर्षे सह्य़ाद्री आणि हिमालयात डोळसपणे भटकंती करत आहेत. या विषयावर त्यांनी पन्नासहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दलच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि गोनीदांनी काढलेले राजगडाचे छायाचित्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संमेलनाचे समन्वयक मुकुंद गोंधळेकर, डॉ. विजय देव यांनी कळविले आहे.

‘पीएमपी’ व्यवस्थापकीय संचालकांची पालिकेस भेट
िपपरी, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक नितीनकुमार खाडे यांनी िपपरी-चिंचवड महापालिकेत सदिच्छा भेट दिली. आयुक्त आशिष शर्मा यांनी त्यांचे पालिकेत स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत पीएमपीएमपीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक अजिज कारचे, मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक धारुरकर उपस्थित होते. महापौर अपर्णा डोके, आयुक्त आशिष शर्मा, स्थायी समितीच्या अध्यक्षा उषा वाघेरे आदींनी खाडे यांच्यासमवेत पीएमपीच्या विविध प्रलंबित विषयांवर त्याचप्रमाणे बीआरटीविषयी सविस्तर चर्चा केली.