Leading International Marathi News Daily
बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
  राज्यसेवा (पूर्व) परीक्षा
  बँकिंग करिअरमधील नवनवीन संधी
  जंगल संपत्ती संवर्धनासाठी..
  नरोत्तम सक्सेरिया स्कॉलरशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव
  संशोधन आराखडा
  इंडियन ओवरसीज बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदाची तयारी
  मॅनेजमेंट अभ्यासक्रम
  करिअर आणि बदललेला दृष्टिकोन
  अभिनयातील करिअर

 

डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा पदांना तर फारच वलय असल्याचे सगळ्यांना ज्ञात असते, परंतु ही पदे मिळवायची कशी? त्यासाठी शिक्षण किती लागते? त्यासाठी पदवी परीक्षेत काही टक्केवारीची अट असते का? आपण या पदास पात्र आहोत का? एकूणच काय, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मार्ग कोणता? हेच माहीत नसते. याचे कारणही तसेच आहे. शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन स्तरावर याबाबत कोणतीच माहिती मिळवीत नाहीत आणि पदवी परीक्षा पास झाल्या झाल्या सुरुवात करतात नोकरी मिळविण्याचा, पगार मिळविण्यासाठी. आणि मग या वाटचालीत उद्दिष्ट, महत्त्वाकांक्षा राहते बाजूला आणि मार्ग दिसेल त्याप्रमाणे मार्गक्रमणास सुरुवात होते.
करिअर महत्त्वाकांक्षा, प्रोफेशन हे शब्द सर्वानाच अगदी अतिपरिचित आहेत. एमबीए, एमए, एमफिल, एलएलबी असा अभ्यासक्रम करावा की स्पर्धा परीक्षांद्वारे नोकरी मिळवावी अशा संभ्रमामुळे अनेक विद्यार्थी गोंधळतात. एकूणच करिअरची निवड
 

हा एक यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. तरीसुद्धा एखाद्या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करायचे असल्यास आपणास आवडणाऱ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअर करायला हवे. आपल्या करिअरचे आपण जे स्वत: नियोजन करतो अथवा दिशा निश्चित करतो तीच फार महत्त्वाची असते. सध्याच्या काळात ‘करिअर नियोजन’ला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर सर्वाचेच एकमत व्हायला काहीच कारण नाही, परंतु बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार करिअरच्या वाटादेखील बदलत गेल्या. अशा बदलांमध्ये आपले स्थान निर्माण करायला हवे.
लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात कुठली ना कुठली महत्त्वाकांक्षा असते. बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार, वयानुसार तसेच संगतीनुसार महत्त्वाकांक्षा ही बदलत असते. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडणे म्हणजे भाग्यवानच म्हणायला हवेत. असे भाग्यवान फार थोडे असतात, पण असे भाग्यवंत म्हणून घेण्यासाठी यांनी फार मेहनत घेतलेली असते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ध्येयवेडे म्हणून मार्गक्रमण केलेले असते.
आज ही बऱ्याच पदवीधरांना बँकेत नोकरी मिळवावी कशी? त्यासाठी एखादा कोर्स असतो का? एमबीए केल्यावर सहज नोकरी मिळते. बऱ्याच मुलांना पदवी परीक्षेच्या गुणांवर सरकारी नोकरी मिळते असे वाटत असते. पोलीस, उपनिरीक्षक होण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो का? बँकेत नोकरी मिळविण्यासाठी अकाऊंटस्चे ज्ञान गरजेचे आहे. अन्यथा आपणास बँकेत नोकरी मिळणार नाही असे बरेच गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतात.
डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा पदांना तर फारच वलय असल्याचे सगळ्यांना ज्ञात असते, परंतु ही पदे मिळवायची कशी? त्यासाठी शिक्षण किती लागते? त्यासाठी पदवी परीक्षेत काही टक्केवारीची अट असते का? आपण या पदास पात्र आहोत का? एकूणच काय, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मार्ग कोणता? हेच माहीत नसते. याचे कारणही तसेच आहे. शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन स्तरावर याबाबत कोणतीच माहिती मिळवीत नाहीत आणि पदवी परीक्षा पास झाल्या झाल्या सुरुवात करतात नोकरी मिळविण्याचा, पगार मिळविण्यासाठी. आणि मग या वाटचालीत उद्दिष्ट, महत्त्वाकांक्षा राहते बाजूला आणि मार्ग दिसेल त्याप्रमाणे मार्गक्रमणास सुरुवात होते.
बँकिंग परीक्षा अथवा केंद्र शासनात नोकरी मिळविण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन व राज्य सरकारी नोकरीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे समीकरण ठराविक वयात व वेळेतच कळायला हवे. म्हणूनच आता या सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एमपीएससीतर्फे राजपत्रित अधिकारी पदासाठी अर्ज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत विचार करू. ही राज्यसेवा (पूर्व) परीक्षा २०० गुणांची असून त्यासाठी १२० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. हा अभ्यासक्रम सहा घटक व २२ व उपघटकांत विभागलेला आहे. ज्या उमेदवारांची परीक्षेपूर्वी वरील सर्व अभ्यासक्रमांची चांगली तयारी होते व परीक्षेच्या दिवशी संपूर्ण पेपर नियोजित वेळेत जास्तीत जास्त अचूक सोडवून होतो त्यांना या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे जाते. अभ्यासक्रमाची योग्य तयारी नसणाऱ्या व परीक्षा हॉलमध्ये दोन तासांत पेपर सोडवू न शकणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड जाते हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणजेच ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रमाची चांगली तयारी करणे व परीक्षे दिवशी वेळेत पेपर पूर्ण करणे ही अत्यावश्यक अट आहे.
पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास अभ्यासक्रमाबाबत असे
दिसते की-
१) कला शाखा- ३० गुण (प्रत्येक उपघटकावर सहा गुण)
२) विज्ञान व अभियांत्रिकी शाखा ३० गुण (प्रत्येक उपघटकावर सहा गुण)
३) वाणिज्य व अर्थव्यवस्था शाखा ३० गुण (प्रत्येक उपघटकावर सहा गुण)
४) कृषी शाखा ३० गुण (प्रत्येक उपघटकावर सहा गुण)
५) चालू घडामोडी- ३० गुण.
६) बुद्धिमापन चाचणी- ५० गुण.
अशा प्रकारे प्रश्नांची व गुणांची विभागणी झालेली आहे. आतापर्यंतच्या गुणवत्ता यादीचा विचार करता पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यास १६५-१७० गुण मिळवावे लागतात. अभ्यासक्रमातील घटक व उपघटक यावर समान प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सर्व अभ्यासक्रमाचे पायाभूत ज्ञान उमेदवाराला पक्के असायला हवे. साधारणत: उमेदवारांनी पुढील प्रकारचे पायाभूत ज्ञान अवगत करून घ्यावे. कला शाखा घटक (३० प्रश्न)
१) इतिहास (सहा गुण)- इ. स. १४५६ च्या कॉन्स्टॅटिनोपलच्या पाडावापासून १९९० पर्यंतच्या काळातील महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात घडलेल्या ठळक घटनांची माहिती असावी. इ. स. १४५६ ते १९९० या काळात नोंद घेण्यासारख्या घटना घडल्या असतील तर त्या ज्ञात असायला हव्यात. इ. स. १४९३- कॉन्स्टॅटिनोपलचा पाडाव, १४९८- वॉस्को-द. गामाचे आगमन, १५१०- पोर्तुगीजांचा गोव्यावर ताबा, १६००- ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या वखारी, १७५७- प्लासीची लढाई, १७६४- बक्सालारची लढाई, १७६५- अलाहाबादचा तह ते १८५७ च्या उठावापर्यंतच्या घटना व १८५७ च्या उठावापासून १९९० पर्यंतच्या घटनांचा आलेख पाठ असावा. ब्रिटिश राजवट, स्थानिक राजवटी, स्वातंत्र्यलढा, राजकीय नेते, क्रांतिकारक, विविध ठराव व करार, स्थापन केलेल्या संस्था, राष्ट्रीय सभेची अधिवेशने, विविध नेत्यांनी केलेल्या चळवळी, घटनात्मक प्रगती इ.
२) समाजसुधारक (सहा गुण) - विविध समाजसुधारकांच्या (अगदी आतापर्यंतच्या म्हणजे अण्णा हजारेपर्यंतच्या) जन्मापासूनचा जीवनपट माहिती असावा. त्यांनी केलेली कार्ये, त्यांचे विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके, वृत्तपत्रे, शिक्षण, त्यांना मिळालेला सन्मान इ.
३) भूगोल (सहा गुण)- महाराष्ट्र, भारत, जग, भौगोलिक वैशिष्टय़े, प्राकृतिक रचना, मृदा, भूस्तर रचना, हवामान, पर्जन्य व वने, क्षेत्रफळ, लोकसंख्या, जिल्हे, राज्ये, जीवनमान, पिकं-पाणी, जंगल संपत्ती, खनिज संपत्ती, नद्या, धरणे, काठावरची शहरे, सिंचन सुविधा, ऊर्जा, उद्योगधंदे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, थंड हवेची ठिकाणे. इ.
४) राजकीय पद्धती (सहा गुण) - घटनेची निर्मिती प्रक्रिया, तरतुदी, वैशिष्टय़े, परिशिष्टे, मूलभूत हक्क व कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, भारतीय संघराज्ये, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, न्यायव्यवस्था, घटक राज्यांचे शासन, घटना दुरुस्त्या इ.
५) ग्रामप्रशासन व पंचायत राज (सहा गुण)- पंचायत राज पद्धती, इतिहास, समित्या, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती, कार्ये, अधिकारी- निवड- नियुक्त्या- राजीनामे, निवडणुका इ. महसूल प्रशासनामध्ये विभागीय आयुक्तांपासून तलाठय़ापर्यंत तसेच पोलीस पाटील, कोतवाल यांचे अधिकार, कर्तव्ये, निवड प्रक्रिया, नेमणुका इ.
विज्ञान व अभियांत्रिकी शाखा ( ३० प्रश्न)
१) वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन (सहा गुण)- वैज्ञानिक अभ्यास पद्धत, विज्ञानाचे वर्गीकरण, प्रणाली, विज्ञानाची गृहीततत्त्वे, वैज्ञानिक पद्धतीचे टप्पे, अभ्युपगम, विगमन, निगमन, केवलगणन, साम्यनुमान, अमूर्तीकरण, प्रतिकृती,उचित अम्युपगमाच्या आवश्यक अटी, वर्गनाम इ.
२) आधुनिकीकरण व विज्ञान (सहा गुण)- आधुनिकीकरण म्हणजे काय? त्याची वैशिष्टय़े, पाश्चात्तीकरण, आधुनिकीकरणाची कारणे, अडथळे, भारतीय समाज व आधुनिकीकरण, सुयोग्य तंत्रज्ञान इ.
३) वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती (सहा गुण)- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र यांच्यातील प्राथमिक संकल्पना, या शास्त्रात झालेली प्रगती, तसेच तंत्रज्ञानाच्या व विज्ञानाच्या विविध शाखांत झालेली प्रगती, नियम, सिद्धांत, शास्त्रज्ञ लावलेले शोध, रोग, उपाय, उपकरणे व त्यांचे उपयोग, उपग्रह प्रक्षेपण, आण्विक कार्यक्रम, संगणक इ.
४) शहरी व ग्रामीण जीवनावरील परिणाम (सहा गुण)- विज्ञानामुळे समाजव्यवस्थेत होणारे सर्वागीण बदल, त्याचे परिणाम, व्यक्तिमत्त्व विकास, स्थलांतर, रोजगार निर्मिती, कुटुंबपद्धती, ग्रामरचना, जातिव्यवस्थेतील बदल, वाहतूक साधने, प्रदूषण, निर्माण झालेल्या समस्या, औद्योगिकीकरणाचे फायदे-तोटे, नितीमूल्य इ.
५) भारतीय समस्यावर वैज्ञानिक उपाय (सहा गुण)-
१) ऊर्जा समस्या- विविध ऊर्जा प्रकार, ऊर्जा निर्मिती, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा, ऊर्जा संकट इ. २) अन्नधान्य समस्या- शेती उत्पादकता कमी असण्याची कारणे व उपाय, सध्याची अन्नधान्य उत्पादन वाढ, भारताची स्वयंपूर्णता, हरितक्रांती, हमी किंमत आयोग, अन्न महामंडळ इ. ३) लोकसंख्या समस्या- लोकसंख्येची सद्य:स्थिती, वाढीची कारणे, उपाय, परिणाम, लोकसंख्या स्फोट, लोकसंख्या बॉम्ब इ. ४) पर्यावरण समस्या, पर्यावरण, प्रदूषणाचे प्रकार, त्याचे मानवावर परिणाम इ. ५) शैक्षणिक समस्या- साक्षरता, धोरणे, मोहिमा, सध्याच्या शैक्षणिक पद्धतीची फलनिष्पत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, नेट-सेट, नवोदय विद्यालये इ. ६) गृहनिर्माण- प्रतिकूल परिस्थितीत टिकणारी घरे, एच.डी.एफ.सी. इंदिरा आवास इ. ७) परिवहन समस्या- राष्ट्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे, विमान, रस्ते, जलवाहतूक इ. ८) संपर्कविषयक समस्या- दूरदर्शन, टपाल, तार, दूरध्वनी, रेडिओ, एस.टी.डी., वातावरणाचे थर, इ. (९) आरोग्यविषयक- विविध रोग व त्यावरील उपाय, जन्म-मृत्यू दर, आयुर्मान, आहार, स्वच्छता इ.
वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक (३० प्रश्न)
१) भारताची आयात-निर्यात (सहा गुण): स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची भारताची आयात-निर्यात परिस्थिती, योजना कालावधीतील व्यापार, दिशा, रचना कोणत्या देशांना होते, शासकीय धोरणे, संस्था, कागदपत्रे, रुपयाचे अवमूल्यन व त्याचे फायदे-तोटे, जागतिक व्यापारी संघटना इ.
२) बँकांची भूमिका (सहा गुण) : बँकांची कार्ये, रिझव्‍‌र्ह बँकेची कार्ये, व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, एक्झिम बँक, सहकारी बँका, जागतिक बँका, रिझव्‍‌र्ह बँकेचे धोरण इ.
३) शासकीय अर्थव्यवस्था (सहा गुण) : अर्थसंकल्पाची प्राथमिक माहिती, ती कोण तयार करतो, कोण, केव्हा, कोठे मांडतो, शासनाला कोणत्या करापासून जास्त उत्पन्न मिळते, लेखा परीक्षण, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करापासूनचे उत्पन्न इ.
४) पंचवार्षिक योजना (सहा गुण) : नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, त्यांची रचना, स्थापना, वर्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष, योजनांचा कालावधी, रोजगार निर्मितीचे कार्यक्रम, दारिद्रय़ निर्मूलनाचे कार्यक्रम इ.
५) किमती वाढण्याची कारणे व उपाय (सहा गुण) : किंमत वाढ म्हणजे काय, ती कशी मोजतात, तिचे प्रकार, किंमत निर्देशांक, आतापर्यंत वाढलेल्या किमतीमागची कारणे व उपाय इ.
कृषी शाखा घटक (३० प्रश्न) :
१) जमिनीचा वापर व प्रमुख पिके (सहा गुण) : जमिनीचे विविध प्रकार, तिच्यात येणारी पिके, पिकांच्या जाती, खरीप पिके, रब्बी पिके, पिकांची पेरणी, पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती इ.
२) जलसिंचनाची साधने व पद्धती (सहा गुण) : जलसिंचनाची साधने, सिंचन प्रकल्प, पाझर तलाव, कोणत्या पिकाला कोणती पद्धत वापरावी, पाणलोट विकास कार्यक्रम इ.
३) अ) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (तीन गुण) : दुग्ध उत्पादन, दूध महापूर योजना, दुग्ध व्यवसाय, जीवनसत्त्वे, कोणत्या गाई किती दूध देतात, स्निग्धांशाचे प्रमाण, पशुसंवर्धनामध्ये गाय, म्हैस, कोंबडी, शेळी, मेंढी इत्यादींचे संवर्धन इ.
३) ब) फलोत्पादन (तीन गुण) : विविध प्रकारांची फळे, भाजीपाला, फुले, त्यांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, त्यांचे संगोपन इ.
४ अ) वनविकास व वनउत्पादने : (तीन गुण) : सामाजिक वनीकरण, वनशेती, वनांचे प्रकार, कोणत्या वनात कोणते वृक्ष वाढतात, विविध वृक्षांचे उपयोग, जलद वाढणारे वृक्ष, बियांपासून तेल काढणे इ.
४ ब) मत्स्य व्यवसाय (तीन गुण) : गोडय़ा पाण्यातील प्रमुख मासा, महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सापडणारा मासा, भातशेतीतील मत्स्य व्यवसाय,
मत्स्य प्रदूषण, माशांच्या जाती, त्यांचा आहार इ.
५) कृषी अर्थशास्त्र (सहा गुण) : भारतीय शेतीक्षेत्राचा वाटा, उत्पादन आणि उत्पादकता, शेतमाल किमती, अल्प भूधारक, नाबार्ड, शेतकी कर्जाचे प्रकार, पूरक व्यवसाय इ.
चालू घडामोडी (३० प्रश्न) : राजकीय, सामाजिक, भौगोलिक, आर्थिक चालू घडामोडी, महत्त्वाच्या व्यक्ती, प्रसिद्ध शहरे, जगातील महत्त्वाच्या संघटना, विविध संघटनांनी घोषित केलेली वर्षे, खेळ-पारितोषिक, ऑलिम्पिक, महत्त्वाचे खेळाडू, राज्याचे मंत्रिमंडळ, जागतिक मराठी परिषदा, विविध समित्या, प्रसिद्ध स्थळे, टेनिस स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा इ.
बुद्धिमापन चाचणी (५० प्रश्न) : हा राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक होय. या घटकाचा अभ्यासक्रम आयोगाने उमेदवाराची अचूक व जलद विचार करण्याची क्षमता या एका वाक्यात दिलेला आहे. तरीसुद्धा गेल्या काही वषार्ंचे पेपर पाहता या घटकात संख्यामालिका वर्णमालिका, समान संबंध, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, वेन-आकृत्या, विधाने, अनुमान, माहितीचे पृथक्करण, तुलनात्मक प्रश्न, घडय़ाळ व कालमापनावरील उदाहरणे, अंकगणित, आकृत्यांची संख्या ओळखणे अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
अशा प्रकारचा या परीक्षेचा अभ्यासक्रम असून या परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तक निवडीचा प्रश्न बिकट असतो. कारण हा अभ्यासक्रम फार विस्तृत व व्यापक असा आहे. या परीक्षांसाठी संदर्भ सूची फारच मोठी सुचविली जाते. त्यात एकाच विषयाची अनेक लेखकांची पुस्तके असतात, त्यामुळेच एखाद्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराच्या मदतीने पुस्तकांची निवड करायची. उगाचच आपणास वेळ आहे तेव्हा अथवा सुट्टीच्या दिवशी अभ्यास करून स्वत:च्या करिअरशी खेळू नका. येथे प्रयत्नात थोडी जरी उणीव झाली तर यश दूर निघून जाईल हे लक्षात ठेवा.
परीक्षा ३१ मार्च २००९ रोजी होणार आहे, म्हणजेच परीक्षेस फार अवधी आहे, असे समजून गाफील राहू नका, वेळेचे नियोजन करा व त्याप्रमाणे अभ्यासास सुरुवात करा. प्रत्येक दिवसाचे नियोजन करा. प्रत्येक घटकासाठी वेळापत्रक ठरवून त्या दिशेने अभ्यासास सुरुवात करा.
सध्या सर्वच क्षेत्रांत मंदी असल्याने खासगी क्षेत्रातील अस्थिरता, उद्योग क्षेत्रातील मंदी, नोकरकपातीचे धोरण, विद्यार्थ्यांची वाढती संख्या, यामुळे सर्वच क्षेत्रांतील विद्यार्थी या परीक्षांकडे वळत आहेत. स्पर्धा फार तीव्र आहे. डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए झालेले विद्यार्थी असे अनेकजण या क्षेत्राकडे वळत आहेत, त्यामुळेच परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या ही दोन लाखांपेक्षा जास्त असते. याचा विचार करता किती मेहनत घ्यावी लागेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, त्यामुळे संपूर्ण परीक्षेसाठी नियोजन करा.
आता तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी योग्य दिशेने करून परीक्षेला सामोरे जा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यासाला खंड न पाडता मुख्य परीक्षेची तयारी सुरू करा.
परीक्षेसाठी शुभेच्छा!
प्रा. संजय मोरे
९३२२३५०४६६