Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

क्रीडा

हसी बंधूंच्या शतकी भागीदारीने ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
अ‍ॅडलेड, १० फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

सतत फ्लॉप ठरत असलेल्या डेव्हिड आणि मायकेल या हसी बंधूंनी आजच्या चॅपेल-हॅडली ट्रॉफीतील न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शतकी भागी रचत ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्ने विजय मिळवून दिला आणि संघाला मालिकेत २-२ अशी बरोबरी साधून दिली. साामन्यात सर्वाधिक धावा करून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून दिलेल्या डेव्हिड हसीला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मालिकेत नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला आणि तो निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

ऑल इंग्लंड सुपर सीरिजमध्ये खेळण्यास सायना उत्सुक
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी / पीटीआय

खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असली तरी ऑल इंग्लंड सुपर सीरिज स्पर्धेत खेळण्यासाठी ती उत्सुक आहे. ३ ते ८ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. सायनाने यासंदर्भात सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यापासून मला थोडीशी वेदना होत होती, तरीही मी त्या दुखापतीकडे दुर्लक्ष करून खेळत राहिले. पण गेल्या महिन्यात कोरियन सुपर सीरिजदरम्यान ही दुखापत वाढली. मात्र ही दुखापत फारशी त्रासदायक नाही. कालच फिजिओ हिथ मॅथ्यू यांनी दुखापतीची पाहणी केली व राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळणे टाळल्यास दुखापत लवकर बरी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघात मलिक व आफ्रिदी
कराची, १० फेब्रुवारी / पीटीआय

श्रीलंकेविरु द्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तानच्या २२ खेळाडूंच्या संभाव्य संघात माजी कर्णधार शोएब मलिक, अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांनी स्थान मिळविले आहे. कर्णधारपदाची धुरा युनूस खान वाहणार आहे. या संघाचे सराव शिबिर १७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. उभय संघात पहिला कसोटी सामना २२ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. गेल्या दोन हंगामात राष्ट्रीय व स्थानिक स्पर्धामध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना या संघात स्थान दिले असल्याचे, मुख्य निवड अधिकारी अब्दूल कादीर यांनी सांगितले.

सहकाऱ्यांना नेहमीच विश्वासात घेतले - मलिक
कराची, १० फेब्रुवारी/ पीटीआय

कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर शोएब मलिकने आता कारणे देण्यास सुरुवात केली आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंशी संवाद साधत नसल्याची टीका मलिकवर झाली होती. त्याचे खंडन करत आपण खेळाडूंना विश्वासात घेऊनच निर्णय घेत होतो असे मलिकने सांगितले. पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी स्वयंस्तुती करीत मलिक म्हणाला ‘‘ कर्णधारपदी असताना संघाने मिळविलेल्या विजयावरुनच आमच्यात संवाद होता हे सिद्ध होते.’’

पीटरसन बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार होणार
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या पर्वात उद्योजक विजय मल्ल्याने यावर्षी बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सच्या संघात इंग्लंडचा कर्णधार केव्हिन पीटरसनला विकत घेतल्यानंतर संघाच्या कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यात पडणार याची चाहूल लागली सर्वानाच होती. पहिल्या सत्रात राहुल द्रविडला कर्णधार म्हणून साजेसी कामगिरी करता आलेली नसल्याने त्यावर मल्ल्या यांनी जाहीर नापसंती दर्शविली होती.

आयपीएल हा पैशांचा नाही तर गंभीर क्रिकेटचा खेळ!
या वर्षी आयपीएल स्पर्धेत सीमेपलिकडील आपले मित्र म्हणजे कराची, लाहोर, मुल्तान आणि फैसलाबाद येथील क्रिकेटपटू दिसणार नाहीत. कारण तिकडच्याच अन्य लोकांनी येथे द्वेषाची आणि अविश्वासाची बीजे रोवली आहेत. हे सारे दुर्दैवी असले तरी सध्याच्या परिस्थितीत तेच योग्य आहे. खरं तर बंदुका चालविणाऱ्यांवर जो राग व्यक्त व्हायला होता त्या रोषात क्रिकेटपटू भरडले जात आहेत. क्रिकेटचाच विचार केल्यास पाकिस्तानच्या काही खेळाडूंची उणीव या स्पर्धेत नक्कीच जाणवेल. राजस्थान रॉयल संघाला याचा सर्वाधिक फटका बसेल. कारण त्यांच्या संघात सोहेल तन्वीरसारखी कामगिरी कुणीही करू शकला नव्हता.

फाफु इलेव्हन व संगम क्लब विजेते
पुणे, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ७ व्या एनईसीसी एन्डय़ुरो साहसी क्रीडा स्पर्धेतील खुल्या गटात फाफु इलेव्हन तर हौशी मिश्र गटात संगम हेल्थ क्लबने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील विविध गटात २०० संघांनी भाग घेतला होता.

पंजाब सुवर्णचषक हॉकी : हॉलंडकडून भारत पराभूत
चंदिगड, १० फेब्रुवारी / पीटीआय

पंजाब सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला हॉलंडकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यातही आपल्या खेळातील सातत्य कायम राखत हॉलंडला चांगली लढत दिली. अखेरच्या क्षणी पेनल्टी कॉर्नर मिळाल्यावर त्या संधीचा अचूक लाभ घेत हॉलंडच्या जेरॉन हेर्ट्बेर्गरने ६६ व्या मिनिटाला गोल केला आणि आपल्या संघाला २-१ असा विजय मिळवून दिला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. त्यानंतर उत्तरार्धात ४३ व्या मिनिटाला हॉलंडच्या वुटर जोली याने शिवेंदर सिंगला नियमबाह्य़ पध्दतीने अडविल्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. त्याच्या मदतीने हॉलंडच्या गोलरक्षकाला चकवत कर्णधार संदीप सिंगने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला हॉलंडच्या रॉबर्ट केम्परमन याने गोल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारताने आघाडी घेण्याचे बरेच प्रयत्न केले. भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले होते; पण त्याचे रूपांतर गोलमध्ये करण्यात भारतीय संघाला अपयश आले.

पट्टाया ओपन : सानिया दुसऱ्या फेरीत
पट्टाया (थायलंड), १० फेब्रुवारी/पीटीआय

येथे सुरू असलेल्या पट्टाया ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने स्थानिक टेनिसपटू निचा लेर्टपिटाकसिनचाई हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महेश भूपतीसह मिश्र दुहेरीचे ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या सानियाने निचाचा ७-६ (४), ७-५ असा पराभव केला. एक तास आणि ५१ मिनिटे चाललेल्या या लढतीत सानियाने मिळालेल्या १८ ब्रेकपॉइंटपैकी सहा गुण मिळविले. सानियाची सव्‍‌र्हिस पाचवेळा निचाने भेदली. वाइल्ड कार्डद्वारे या स्पर्धेत प्रवेश मिळालेल्या सानियाला दुसऱ्या फेरीत स्लोव्हाकियाच्या तिसऱ्या मानांकित डॉमिनिका सिबुल्कोव्हा व रशियाची व्हिटालिया दियात्चेन्को यांच्यातील विजेत्या खेळाडूशी झुंजावे लागेल. सानियाने या सामन्यानंतर सांगितले की, निचाचा जागतिक क्रमवारीत ९४५ क्रमांक असला तरी ती त्यापेक्षाही सरस खेळत होती. ती पहिल्या ५० क्रमांकातली वाटत नसली तरी पहिल्या ७५ किंवा १०० खेळाडूंमध्ये खेळत असल्यासारखी नक्कीच वाटली.

कबड्डी : नवमहाराष्ट्र आणि गजानन विजयी
मुंबई, १० फेब्रुवारी / क्री. प्र.

नवमहाराष्ट्र संघ आणि गजानन क्रीडा मंडळ यांनी ‘भगवा चषक’जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेतेपद पटकविले. स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जोगेश्वरी येथे ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या ‘अ’ गटातील निर्णायक सामन्यात बोरीवली येथील नवमहाराष्ट्र संघाने भांडूप येथील उत्कर्ष क्रीडा मंडळाचा २७ विरुद्ध २२ असा पराजय करून स्पर्धेतील जतेपद पटकाविले. उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या निलेश चिंदरकरला सवरेत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले तर सवरेत्कृष्ट चढाईपटू रोहित शेठ ठरला. नवमहाराष्ट्र संघाच्या कमलेश पालवला सवरेत्कृष्ट पक्कडपटू ठरविण्यात आले. गजानन क्रीडा मंडळाने (विलेपार्ले) सह्याद्री क्रीडा मंडळाचा (जोगेश्वरी) ३७ विरूद्ध १० असा धुव्वा उडवत कुमार गटातील जेतेपद पटकाविले. गजानन क्रीडा मंडळाने सुरुवातीपासून सामान्यावर वर्चस्व राखत सह्याद्री क्रीडा मंडळाला डोके वर काढण्याची संधी न देता २७ गुणांची आघाडी घेत सामना खिशात घातला. सामन्यात गजानन क्रीडा मंडळाचा योगेश कुराडे सवरेत्कृष्ट खेळाडू ठरला तर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गौरव चव्हाणला उत्कृष्ट चढाईपटू घोषित करण्यात आले. गजानन क्रीडा मंडळाच्या सचिन सावंतला उत्कृष्ट पक्कडपटू म्हणून निवडण्यात आले.

कॅरम : राहुल गायकवाडची हॅटट्रिक
मुंबई, १० फेब्रुवारी/क्री. प्र.

कै. जगन बेंगळे स्मृती बँक ऑफ महाराष्ट्र सहपुरस्कृत १८ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात विजय कॅरम क्लबच्या राहुल गायकवाडने बोरीचा स्पोर्टस् क्लबच्या प्रकाश हडीमालचा २५-५, २५-२१ व २५-४ असा तीन गेमच्या लढतीत पराभव करून विजेतेपद पटकाविले आणि सलग तीन वर्षे मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा जिंकून सुरेख हॅटट्रीक केली.
कुमार एकेरी १८ वर्षांखालील अंतिम फेरीत बँक ऑफ इंडियाच्या प्रशांत मोरेने अपेक्षेप्रमाणे फाईव्ह स्टार स्पो. कॅरम अ‍ॅकॅडमीच्या राहुल कोळीवर २५-१८, २५-२१ अशी मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
वयस्कर पुरुष गट उपान्त्य फेरी निकाल : शामजी पडाया वि. वि. रुद्रनाथ बागवे २५-०, २५-५, प्रकाश कांबळे वि. वि. रविंद्र पारकर २५-२, २५-१०.
पुरुष एकेरी उपउपान्त्य फेरी निकाल : जितेंद्र काळे वि. वि. राहुल कोळी २५-१०, २५-५, नागसेन एटांबे वि. वि. अनंत गायत्री २५-२४, २५-१६, महेंद्र तांबे वि. वि. मनू बारीया २५-१२, १५-२५, २५-४, हार्दिक भावसार वि. वि. मनू बारीया २५-६, २५-५.
वयस्कर महिला गट उपान्त्य फेरी निकाल : मंजिरी वैद्य वि. वि. प्रिया साटम २५-२०, २५-२, ज्योती काटदरे वि. वि. शिल्पा सावंत २५-१५, २५-९.

आर्यन स्पोर्टस् विजयी
मुंबई, १० फेब्रुवारी/क्री.प्र.

चारचौघे मित्र मंडळाने कै. कु. विक्रम (विंडा) नवले याच्या स्मरणार्थ लालबाग येथील जाम मिल कंपाऊंडच्या आवारात आयोजित केलेल्या ५५ किलो वजनी गट कबड्डी सामन्यात आर्यन स्पोर्टने २७-१० असा १७ गुणांनी न्यु गुडलक क्रीडा मंडळावर सहज विजय मिळविला तो नितेश मोरे व मुकेश गवाणकर याच्या अष्टपैलू खेळाने. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात हिन्दमाता सेवा मंडळाने महाराष्ट्र स्पो. क्लबचा ३२-१९ असा पराभव केला. विजयी संघाच्या मनोज राणे व हृषिकेश डिचोलकर याच्या यशस्वी चढाया तर उदय नाटेकर याच्या अचूक पकडीमुळे अन्य दुसऱ्या फेरीच्या सामन्यात विजय बजरंग क्रीडा मंडळाने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३०-२२ विद्यासागर क्रीडा मंडळाने आर्यन स्पो. क्लबचा ३७-२४ असा पराभव केला तो गिरीधर भोईर व नितीन वारगे यांच्या चढाईच्या बळावर त्यांना क्षेत्ररक्षणात संतोष भोईरने चांगली साथ दिली.

कॅरम : हिदायत अन्सारी, प्रियांका चौगुले, दिप जोशी अंतिम फेरीत
मुंबई, १० फेब्रुवारी/क्री.प्र.
मुलुंड जिमखाना, नवघर रोड, मुलुंड (पूर्व), मुं. ६१ येथे मुलुंड जिमखान्याने आयोजित केलेल्या २ री मुंबई उपनगर जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटात हिदायत अन्सारी, सलाउद्दीन शेख, महिला गटात प्रियांका चौगुले, आयेशा मोहम्मद तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटात दिप जोशी व निल जोशी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. सलाउद्दीन शेख याने राष्ट्रीय खेळाडू मोहम्मद ओवेस याचा अटीतटीच्या लढतीत २५-२१, २५-२३ असा पराभव करून उपनगर जिल्ह्य़ाच्या आतापर्यंत झालेल्या स्पर्धामध्ये प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेच्या तिन्ही गटातील अंतिम सामने बुधवारी खेळविण्यात येतील.
अन्य निकाल पुढीलप्रमाणे- पुरुष गट-उपान्त्य फेरी : हिदायत अन्सारी (नॅसिल इं.) विजयी x मोहम्मद साजिद (कु. सभा) २५-२०, २५-५, सलाउद्दीन शेख (कु. सभा) विजयी x मोहम्मद ओवेस (कु. सभा) २५-२१, २५-२३. महिला गट-उपान्त्य फेरी : आयेशा मोहम्मद (एम.डी.के.) विजयी x नॅन्सी सिक्वेरा (नाबार्ड) २५-५, २५-०, प्रियांका चौगुले (एम.डी.के.) विजयी x मनिषा सावंत (एम.डी.के.) २५-६, १४-१३.
१४ वर्षांखालील मुले-उपान्त्य फेरी दिप जोशी (एम.डी.के.) विजयी x विभव धुरी (एम.जी.) १८-२, १०-१६, २५-०, निल जोशी (एम.डी.के.) विजयी x वेदांग धुरी (एम.जी.) ७-१२, २५-०, २४-४.

क्रिकेट : पारसिक जनता बँक अजिंक्य
मुंबई, १० फेब्रुवारी/क्री.प्र.

आयडीयल स्पोर्टस् अकॅडमी आयोजित व सिंधुदुर्ग सहकारी बँकेच्या सहकार्याने कलातज्ज्ञ प्रा. जगदीश कांदळकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनाप्रीत्यर्थ शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या आंतर बँक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीत ठाण्याच्या पारसिक जनता सहकारी बँकेने वसई विकास सहकारी बँकेचा पराभव करून अंतिम विजेतेपदाचा मान मिळविला व रोख रक्कमबरोबरच प्रा. जगदीश कांदळकर स्मृतिचषक पटकविला. या स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला होता. वसई विकास बँकेचा दिनेश पाटील मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. पारसिक जनता सहकारी बँकेचा रोशन पाटील (उत्कृष्ट गोलंदाज) व फैजल चेवूलकर (उत्कृष्ट फलंदाज), तसेच वसई विकास बँकेचा तुषार वर्तक (उत्कृष्ट क्षेत्ररक्षण) हे वैयक्तिक पुरस्काराचे मानकरी ठरले. अ‍ॅड. विजय तुळपुळे, काँग्रेसचे नेते राजन भोसले, स्तंभलेखक श्रीकृष्ण हरचांदे, कोटक महिंद्राचे व्यवस्थापक प्रदीप सावंत, मोनाली कोळनूरकर यांच्या हस्ते विजयी संघ व खेळाडूंचा रोख रक्कम व चषक देऊन गौरव करण्यात आला.