Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

हसी बंधूंच्या शतकी भागीदारीने ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
अ‍ॅडलेड, १० फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

 

सतत फ्लॉप ठरत असलेल्या डेव्हिड आणि मायकेल या हसी बंधूंनी आजच्या चॅपेल-हॅडली ट्रॉफीतील न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शतकी भागी रचत ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्ने विजय मिळवून दिला आणि संघाला मालिकेत २-२ अशी बरोबरी साधून दिली. साामन्यात सर्वाधिक धावा करून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून दिलेल्या डेव्हिड हसीला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मालिकेत नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला आणि तो निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. रॉस टेलरने (७६) केलेल्या झुजांर अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ २४४ धावांची मजल मारू शकला. पण डेव्हिड हसी (७९) आणि मायकेल हसी (नाबाद ७५) यांनी रचलेल्या ११५ धावांच्या भागीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्स आणि दहा चेंडू राखत मालिकेतील दुसरा विजय संपादन केला.
२४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांचा सलामीवीर मायकेल क्लार्क (१४) आणि कर्णधार रिकी पॉन्टींग (१५) स्वस्तात तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे मालिकेतले आव्हान संपणार की काय अशी भिती वाटत होती. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून संघाला मालिकेतील पहिला विजय मिळवून देणाऱ्या यष्टीरक्षक ब्रॅड हॅडीनने (४३) पाच चौकार आण एक षटकार ठोकत संघांची धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही हॅडीन चमक दाखविणार असे वाटत असताना तो धावचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. या धक्यातून संघाला बाहेार काढून पैलतीरावर पोहचवले ते हसी बंधूंनी. २५ व्या षटकात ३ बाद १०१ अशी धावसंख्या असताना कोणतीही जोखिम न उठवता या दोघांनीही नेत्रदिपक खेळ करीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. डेव्हिडने ९६ चेंडूत ७९ धावा फटकावित मायकेल बरोबर १२१ चेंडूत ११५ धावांची भागी रचली आणि संघाला विजयासमीप नेऊन पोहचवले. डेव्हिड बाद झाल्यानंतर मायकेलने सामन्याची सुत्रे हातात घेत विजयावर शिक्कामोर्तब केले, त्याने ७१ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद ७५ धावा काढल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला सलामीवीर ब्रॅन्डम मॅक्यूलम (३३) आणि मार्टीन गुप्टील (४५) यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण त्यानंतर अवघ्या १७ धावांमध्ये त्यांचे तीन फलंदाज बाद झााल्याने त्यांचा संघ चांगलाच संकटात सापडला होता. त्यांना या संकटातून बाहेर काढून तारणहार ठरला तो रॉस टेालर. त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना साथीला घेऊन संघाला सव्वा दोनशेचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रलियातर्फे मिचेल जॉन्सनने तीन तर जेम्स होप्सने दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ५० षटकात ८ बाद २४४ (रॉस टेलर ७६, मार्टीन गुप्टील ४५, मिचेल जॉन्सन ५१ धावांत ३ बळी, जेम्स होप्स ३७ धावांत २ बळी)
ऑस्ट्रेलिया ४८.२ षटकांत ४ बाद २४७ (डेव्हिड हसी ७९, मायकेल हसी नाबाद ७५, लेन ऑब्रियन ५४ धावांत २ बळी).