Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ऑल इंग्लंड सुपर सीरिजमध्ये खेळण्यास सायना उत्सुक
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी / पीटीआय

 

खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असली तरी ऑल इंग्लंड सुपर सीरिज स्पर्धेत खेळण्यासाठी ती उत्सुक आहे. ३ ते ८ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
सायनाने यासंदर्भात सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यापासून मला थोडीशी वेदना होत होती, तरीही मी त्या दुखापतीकडे दुर्लक्ष करून खेळत राहिले. पण गेल्या महिन्यात कोरियन सुपर सीरिजदरम्यान ही दुखापत वाढली. मात्र ही दुखापत फारशी त्रासदायक नाही. कालच फिजिओ हिथ मॅथ्यू यांनी दुखापतीची पाहणी केली व राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळणे टाळल्यास दुखापत लवकर बरी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. अन्यथा मला नंतरच्या स्पर्धात खेळताना त्रास सहन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेली सायना म्हणाली की, ऑल इंग्लंड सुपर सीरिज स्पर्धेपूर्वी मी तंदुरुस्त होणार आहे.
सायनाला मॅथ्यू यांनी दोन आठवडय़ांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून सायना दिलेल्या सल्ल्यानुसार पूर्ण आराम करीत आहे. विश्रांतीच्या काळात चाललेल्या हलक्या सरावाबद्दल ती म्हणते की, मी केवळ धावण्याचा व्यायाम करीत असून उजव्या खांद्याला त्रास होईल, अशी कोणतीही हालचाल करीत नाही. त्यामुळे पुढील दोन ते तीन आठवडे मी प्रत्यक्ष बॅडमिंटनपासून लांबच राहणार आहे.
सायनाने सांगितले की, सध्या तरी मला माझ्या फॉर्मची चिंता नाही. केवळ दुखापत लवकरात लवकर बरी होण्याकडे मी लक्ष केंद्रित केले आहे. दुखापतीतून एकदा सावरल्यावर मी ऑल इंग्लंड सुपर सीरिज स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी खेळू शकेन.
दरम्यान, भारताचा चेतन आनंद यानेही राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदलाही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नाही. मात्र २४ फेब्रुवारीपासून जर्मन ग्रां प्रि या स्पर्धेत तो आपले कौशल्य आजमावणार आहे.
चेतन आनंद आपल्या या निर्णयाबद्दल म्हणाला की, गेले सहा महिने मला दुखापतीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळेच मलेशियन व कोरियन स्पर्धामध्ये मी चांगली कामगिरी करू शकलो नव्हतो. मी जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असून यंदा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाचा कार्यक्रम भरगच्च आहे. म्हणूनच मी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. दुखापत पूर्ण बरी व्हावी, हाच माझा प्रयत्न आहे. चेतन आनंद याला जर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळता आले असते तर तो सलग तिसरे विजेतेपद पटकावून शकला असता पण त्याची ही संधी हुकणार आहे.