Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघात मलिक व आफ्रिदी
कराची, १० फेब्रुवारी / पीटीआय

 

श्रीलंकेविरु द्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तानच्या २२ खेळाडूंच्या संभाव्य संघात माजी कर्णधार शोएब मलिक, अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांनी स्थान मिळविले आहे. कर्णधारपदाची धुरा युनूस खान वाहणार आहे. या संघाचे सराव शिबिर १७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
उभय संघात पहिला कसोटी सामना २२ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. गेल्या दोन हंगामात राष्ट्रीय व स्थानिक स्पर्धामध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना या संघात स्थान दिले असल्याचे, मुख्य निवड अधिकारी अब्दूल कादीर यांनी सांगितले.
दरम्यान जलदगती गोलंदाज ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर गुडघ्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे.
फलंदाजीची मधली फळी प्रभावी होण्यासाठी आसिम कमाल, फैसल इक्बाल व बाझीद खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक क्रिकेटमध्ये शैलीदार फलंदाजीने सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सईद बीन नासिरनेही संघात स्थान पटकावले आहे. मधली फळी भक्कम होण्यासाठीच या नावांचा विचार करण्यात आल्याचे कादिर म्हणाले. कराचीत १७ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी कर्णधारपद आफ्रिदीकडे सोपविण्यात येणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. तो एक गुणवान खेळाडू आहे, असे आफ्रिदीचे कौतुक त्यांनी केले. ते म्हणाले ‘‘सध्या त्याचे प्रदर्शन खराब होत असले तरी त्याची जागा घेऊ शकेल असा एकही खेळाडू सध्या नाही.’’
संभाव्य संघ- युनूस खान (कर्णधार ), मिसबाह-उल- हक, शोएब मलिक, सलमान बट्ट, नासिर जमशेद, खुर्रम मंजूर, असिम कमाल, फैसल इकबाल , सईद बिन नासिर, बाझिद खान, कामरान अकमल, सरफराज अहमद, फवाद आलम, शहिद आफ्रिदी, सोहेल तन्वीर , मोहम्मद तल्लाह, यासिर अराफात , सोहेल खान, उमर गुल, अब्दूर रऊफ, दानिश कनेरिया,
सईद अजमल.