Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सहकाऱ्यांना नेहमीच विश्वासात घेतले - मलिक
कराची, १० फेब्रुवारी/ पीटीआय

 

कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर शोएब मलिकने आता कारणे देण्यास सुरुवात केली आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंशी संवाद साधत नसल्याची टीका मलिकवर झाली होती. त्याचे खंडन करत आपण खेळाडूंना विश्वासात घेऊनच निर्णय घेत होतो असे मलिकने सांगितले.
पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी स्वयंस्तुती करीत मलिक म्हणाला ‘‘ कर्णधारपदी असताना संघाने मिळविलेल्या विजयावरुनच आमच्यात संवाद होता हे सिद्ध होते.’’ मात्र प्रशिक्षक इन्तिखाब आलम व व्यवस्थापक यावर सईद यांनी मात्र मलिकला एकलकोंडा व स्वत:च्याच कोशात रमणारा खेळाडू असे हिणवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मलिकमध्ये व अन्य खेळाडूंमध्ये संवादाचा अभाव होता. बैठकीतही मलिक फक्त पाचच मिनिटे बोलत असे. तेही तो कर्णधार होता म्हणून. एका यशस्वी कर्णधाराने सहकाऱ्यांसाठी निश्चितच वेळ काढला पाहिजे, अशी चर्चाही स्थायी समितीच्या बैठकीत रंगली होती. या चर्चेबाबत नाराजी व्यक्त करत मलिकने या आरोपांचे खंडन केले आहे. मलिक म्हणाला, ‘‘माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत संघाने अनेक विजय नोंदविले आहेत.’’ विजय सांघिक कामगिरीनेच मिळतो, असा टोलाही त्याने टीकाकारांना लगावला.
सामन्यादरम्यान खेळीमेळीचे वातावरण राखण्याचा प्रयत्न मी करीत असे. त्यामुळेच मी त्या पदासाठी योग्य होतो. कर्णधारपद गमावल्याचे दु:ख आहे; पण आता युनूसच्या नेतृत्वातही चांगली कामगिरी करण्याचा निर्धार मलिकने व्यक्त केला.