Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पीटरसन बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार होणार
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

 

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या पर्वात उद्योजक विजय मल्ल्याने यावर्षी बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सच्या संघात इंग्लंडचा कर्णधार केव्हिन पीटरसनला विकत घेतल्यानंतर संघाच्या कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यात पडणार याची चाहूल लागली सर्वानाच होती. पहिल्या सत्रात राहुल द्रविडला कर्णधार म्हणून साजेसी कामगिरी करता आलेली नसल्याने त्यावर मल्ल्या यांनी जाहीर नापसंती दर्शविली होती. त्यामुळे यावेळी आयपीएलमध्ये पहिल्या तीन आठडय़ासाठी हजर असणाऱ्या पीटरसनवर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येईल असे सुत्रांनी सांगितले आहे. पीटरसन दौऱ्यावर गेल्यानंतर यष्टीरक्षक मार्क बाऊचरला किंवा राहुल द्रविड यांच्यापैकी एकजण संघाची धुरा वाहतील. पीटरसनला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून या निर्णयाची औपचारीक घोषणा लवकरच करण्यात येईल असे सुत्रांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी द्रविडच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सला फक्त एकच सामना जिंकता आला होता. या वर्षी १० एप्रिल ते २४ मे दरम्यान आयपीएलचे आयोजन करण्यात आले असून पीटरसन मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत संघासाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर तो वेस्टइंडिजविरूद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. पीटरसन हा एक दर्जेदार क्रिकेटपटू असून तो संघात आल्याने आमच्या फलंदाजीला चांगलीच धार येईल. कर्णधारपदाचे विकल्प अजुनही खुले असून लवकरच योग्य निर्णय घण्यात येईल. या निर्णयापूर्वी मी संघातील खेळाडूंबरोबरच द्रविडशी चर्चा करणार आहे, असे मल्ल्या यांनी सांगितले.

पीटरसनला संधी द्यायला हवी - जेनिंग्स
संघाच्या कर्णधारपदासाठीचे सर्व विकल्प खुले असून त्यावर संघ व्यवस्थापन योग्य तो निर्णय घेतील. एक कर्णधार म्हणून पीटरसनने चांगली कामगिरी बजावलेली आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही या वेळी करण्यात येईल. द्रविडपेक्षा त्याची शैली नक्कीच निराळी असून तो एक सकारात्मक कर्णधार असल्याने त्याला यावेळी संधी द्यायला हवी , असे बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनिंग्स यांनी सांगितले.