Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

सल्लागारांनी कोटय़वधींचा चुना लावूनही महापालिकेचे पहिले पाढे पंचावन्न
संजय बापट

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरात कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प राबविताना सल्लागारांच्या चुकीमुळे महापालिकेस कोटय़वधी रुपयांचा फटका बसल्याचा घरचा अहेर पालिका आयुक्तांनी दिल्यानंतरही प्रशासनाला त्याचा बोध झालेला नाही. बीएसयूपी घरबांधणी प्रकल्पासाठी नव्याने सात सल्लागार नेमण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.

शिवसेनेला डिवचण्यासाठी राष्ट्रवादीचे खास दुकान
ठाणे/प्रतिनिधी : व्हॅलेंटाईनमुळे देशाची संस्कृती धोक्यात आल्याचा आरोप करून सेना- भाजपने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास कडवा विरोध दर्शविला असतानाच, त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने व्हॅलेंटाईनसाठी खास दुकान थाटले आहे. पाश्चिमात्य देशांतील संस्कृतीचे भारतात अनुकरण केले जाऊ लागल्याने तरुण पिढी बरबाद होईल, असा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांनी व्हॅलेंटाईन डेला विरोध दर्शविला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने त्याचे समर्थन केले आहे. गेली दोन वर्षे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावरून ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अनेकदा संघर्ष उडाला होता. यंदा तर राष्ट्रवादीने तरुण-तरुणींसाठी खास व्हॅलेंटाईन दुकान सुरू केले आहे. युवा वर्गाचा मोठा राबता असलेल्या राम मारुती रोडवर अमित नांदगावकर यांनी हे दुकान सुरू केले असून, ते व्हॅलेंटाईन डेपर्यंत चालणार आहे. या दुकानात आकर्षक पण महागडी भेटकार्डे अवघ्या १० रुपयांना देण्यात येत आहेत. व्हॅलेंटाईनसाठी आकर्षक गिफ्टही दुकानात आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज या दुकानाचे उद्घाटन केले, त्यामुळे आता सेना कोणती भूमिका घेते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

जकात चोरीप्रकरणी पालिका कर्मचाऱ्यासह दोघांना अटक
ठाणे/प्रतिनिधी
: जकात पावत्यांमध्ये खाडाखोड करून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार कॅसल मिल येथील एल महेंद्र हार्डवेअर दुकानदाराने पालिकेची जकात चुकविल्याप्रकरणी एका नागरिकाने लोकशाही दिनात पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर जकात विभागाने एल महेंद्र हार्डवेअर या दुकानाचे रेकॉर्ड तपासले.

शिवकृपा कॉम्प्लेक्सच्या ३१ जणांवर एमआरटीपी दाखल करण्याचे आदेश?
ठाणे/प्रतिनिधी : दादा पाटील वाडीतील शिवकृपा कमर्शियल कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी कॉम्प्लेक्समधील ३१ जणांवर एमपीडीएअंतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी दिले होते. तर दोन्ही पक्षकारांच्या सुनावणीनंतर अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा निर्णय महापालिकेने घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भावी पिढीमध्ये देशभक्ती व प्रेम रुजविण्यासाठी..
ठाणे/प्रतिनिधी :
२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमी भिवंडी शहरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणाऱ्या उद्देशाने पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भावी पिढीमध्ये देशभक्ती व देशप्रेम निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून पोलीस खात्याची व शहीद जवानांच्या कुटुंबियांचे मनोबल उंचाविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन ठाणे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या शहिदांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात केले. शहिदांना श्रद्धांजली या कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, संचालित के.जी. ते पी.जी.पर्यंतच्या सर्व शाखांनी मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त अनिल ढेरे, उपायुक्त अंकुश शिंदे, सहाय्यक पोलीस उपायुक्त एस.एन. जाधव, संस्थाध्यक्ष विजय जाधव, बी.डी. काळे, सरचिटणीस आर.एन. पिंजारी आदी उपस्थित होते.

अनधिकृत रेती उत्खनन, १६ जणांविरुद्ध गुन्हे
भिवंडी/वार्ताहर

भिवंडी तालुक्यातील खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावांमध्ये अनधिकृतपणे रेती उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने गोवे गावच्या हद्दीत अथवा दक्षता पथक रेतीगट ठाणे व भिवंडी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत १६ जणांविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून दोन सक्शन पंप जप्त केले. अनधिकृत रेती उपसा करून ती विकल्याने शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत असल्याने त्याबाबतची तक्रार ग्रामपंचायत गोवे यांनी महसूल खात्याकडे केली होती. त्याची दखल घेत ठाणे येथील दक्षता पथकासह निवासी नायब तहसीलदार सुनील कोळी, मंडळ अधिकारी जी.के. पष्टे, टेमघर तलाठी बी.एस. टाकवेकर, वेहळे तलाठी एस.पी. पाटील. कोन तलाठी शरद पाटील, अंजूर तलाठी दीपक अनारे यांनी गोवे येथील खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या ठिकाणी धाड टाकली, तेव्हा चार संक्शन पंपाद्वारे अनधिकृत रेती उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. यावेळी संक्शन पंप जप्त करून प्रत्येकी ब्रासप्रमाणे १०५ ब्रास रेतीचे उत्खनन केल्याचे उघड झाले.

मुंब्रा येथे महिलेची गळा दाबून हत्या
ठाणे/प्रतिनिधी :
एकटय़ा राहणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेची अज्ञात व्यक्तीनी काल रात्री गळा दाबून हत्या केली. ही घटना मुंब््रयातील गुलाब पार्क मध्ये घडली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली नसावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोंडे यांनी दिली. अमृतनगरमध्ये राहणाऱ्या सायराबानो अब्दुल रसीद खान (५०) या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली. तिच्या घरातील तिजोरीतून रोख रक्कम पळविण्यात आलेली नाही. पतीपासून विभक्त झालेली सायराबानो एकटीच राहत असे. या घटनेची माहिती तिच्या भावाने कळविल्यानंतर पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालात ही हत्या गळा दाबून झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटरसायकलचोर कॉन्स्टेबलसह पाचजण जेरबंद
ठाणे/प्रतिनिधी :
मोटारसायकल चोरांच्या टोळीमुळे ठाणेकर हैराण झाले असताना वर्तकनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास यादव याच्यासह पाच जणांच्या टोळीला १२ मोटारसायकलसह खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी विकास यादव, निकेत धायगुडे, विकी स्वाईन रा. शिवाईनगर, हेमंत पटेल रा. शास्त्रीनगर आणि प्रवीण मोरे यांची कसून चौकशी केली जात असून त्यात एका व्यापारीसुद्धा सामील आहे. या टोळीने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील मोटारसायकल चोरलेल्या असून आठ गुन्ह्णाांची उकल झाली आहे. उर्वरित चार मोटारसायकलचे मालक अद्याप सापडलेले नाहीत. नोंदणी नसलेल्या मोटारसायकल ठाण्यात फिरत असल्याची गुप्त माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकातील शिपाई रवी परब यांना मिळाल्यानंतर हा सापळा रचण्यात आला. त्यात पोलीस शिपाई यादव अडकल्याने पोलीस अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

शकुंतला निंबाळकर यांना पुरस्कार
ठाणे/ प्रतिनिधी

नवी मुंबई येथील योग विद्याधाम या संस्थेच्या संस्थापक सदस्य आणि माजी विश्वस्त शकुंतला निंबाळकर यांना सांगली जिल्'ाातील मिरज येथील विश्वयोग दर्शन केंद्राच्या वतीने दिला जाणारा सहकारमहर्षी कै. विष्णू अण्णा पाटील योगभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ फेब्रुवारी रोजी सांगली येथे आयोजित एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक हजार एक रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.