Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

गुंडाप्पा विश्वनाथ हे नाव १९६०च्या दशकात क्रिकेटविश्वात झळकायला लागले होते. १९६९-७० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी विश्वनाथची निवड झाली आणि पदार्पणातल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्या नावावर धावा लागल्या शून्य! निवड समितीला आपला अंदाज चुकणार नाही, याची खात्री होती. विश्वनाथने दुसऱ्या डावात झंझावाती १३७ धावा झळकावल्या. त्यानंतर विश्वनाथ हे नाव तब्बल ९१ कसोटी सामन्यांमध्ये गाजत राहिले. १९६९-७० ते १९८२-८३ या काळात ४२ धावांच्या सरासरीने विश्वनाथने आपल्या नावावर सहा हजार ८० धावा जमा केल्या. चेन्नईच्या मैदानावर त्याने इंग्लंड विरुद्ध २२२ धावा केल्या, त्या त्याच्या कारकीर्दीतल्या सर्वोच्च ठरल्या. कर्नाटकात भद्रावतीला १२ फेब्रुवारी १९४९ ला जन्मलेल्या विश्वनाथने फलंदाजीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली होती.

 

त्याच्या बरोबरीच्या सुनील गावसकरचे स्क्वेअर ड्राइव्हचे फटके जसे आकर्षक असत, तसे विश्वनाथचे लेट कट फटके. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटची चौदा शतके जमा आहेत. तथापि त्याने जेव्हा जेव्हा शतक फडकवले, तेव्हा तेव्हा भारतीय संघाला फक्त पराभवच पाहावा लागला. मात्र व्यक्तिश: त्याला आव्हाने स्वीकारायला आवडत असे. फलंदाजीत त्याच्याएवढी शास्त्रशुद्ध खेळी करू शकणारा दुसरा फलंदाज गावसकरच. हे दोघे एकत्र खेळायचे, तेव्हा त्यांच्या स्वैर फटकेबाजीची गंमत अनुभवण्यात मजा येत असे. पुढे विश्वनाथ हा गावसकरचा चक्क मेहुणाच बनला. गावसकरची बहीण ही विश्वनाथची पत्नी आहे. १९७४-७५ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध चेन्नईच्या मैदानावर त्याने अ‍ॅन्डी रॉबर्ट्सच्या द्रुतगती गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत नाबाद ९७ धावा केल्या होत्या. खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करण्यात वाकबगार म्हणूनच त्याची ओळख आजही दिली जाते. १९७९-८० मध्ये विश्वनाथ हा अल्पकाळासाठी भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधारही होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आलेल्या दोन सामन्यांपैकी एकात भारतीय संघ सामना अनिर्णीत ठेवू शकला, तर दुसऱ्यात भारताला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या बॉब टेलरला पंचांनी बाद दिले होते आणि तो मैदानातून परतू लागला तेव्हा त्याला तू बाद नाहीस, असे सांगून परत खेळायला लावणारा कर्णधार हा विश्वनाथच होता. त्यानंतर मात्र इतर कर्णधारांकडून असा दिलदारपणा फारच क्वचित पाहायला मिळाला. गंमत म्हणजे तो सामना टेलरच्या खेळीमुळे भारताला गमवावा लागला होता. पण आपल्या त्या कृत्याचा आपल्याला अजिबात पश्चात्ताप होत नाही, असे विश्वनाथ आजही सांगतो. आपल्या विचारांशी ठाम असणारा खेळाडू म्हणून त्याला ओळखण्यात येत असे. विश्वनाथ आणि गावसकर यांच्यात झुंज लावायची खेळी त्या काळात काहींनी खेळून पाहिली होती. विश्वनाथ हा गावसकरपेक्षा चांगला खेळतो, असे प्रसिद्ध झाले. त्याचे असे झाले की गावसकरने ‘एमसीसी’च्या कॉलिन कौड्री स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मैदानावरल्या वागणुकीवर टीका केली. त्याबरोबर तुफानी गोलंदाजीबद्दल प्रसिद्ध असलेल्या डेनिस लिलीने ‘गावसकरपेक्षा विश्वनाथ उत्तम खेळायचा’ असे जाहीर केले. गावसकरला चिडवण्यासाठी हे विधान होते, पण त्याने गावसकर चिडला तर नाहीच, पण विश्वनाथही शेफारला नाही. ‘आमचा खेळ संपल्यावर कुणीतरी आमची तुलना करतो, हे बरोबर नाही. गावसकर तो गावसकर,’ असे विश्वनाथने तेव्हा स्पष्ट केले. मी कुणाही एकापेक्षा चांगला आहे, असे सांगणे आपल्याला मुळीच मान्य नाही, इतक्या स्पष्ट शब्दांत विश्वनाथने आपली नाराजी व्यक्त केली. विश्वनाथ हा आपल्या सहकाऱ्यांमध्ये ‘विशी’ म्हणून ओळखला जायचा. कर्नाटकच्या संघाचे काही काळ प्रशिक्षकपद सांभाळणारे विश्वनाथ कर्नाटक क्रिकेट संघटनेचे काही काळ उपाध्यक्ष होते. १९९२-९३ मध्ये राष्ट्रीय निवड समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांना १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने ‘सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येत आहे. १५ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.