Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

विविध

उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनास वादळी प्रारंभ
लखनौ, १० फेब्रुवारी / पीटीआय

उत्तर प्रदेश विधानसभेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनास आज वादळी प्रारंभ झाला. मायावतींच्या नेतृत्त्वाखालील बहुजन समाज पार्टी सरकारच्या कार्यपद्धतीस जोरदार विरोध दर्शविताना समाजवादी पार्टीच्या आमदारांनी राज्यपाल टी.व्ही.राजेश्वर यांच्या भाषणात सातत्याने अडथळे आणले.अंदाजपत्रकी अधिवेशनाचा प्रारंभ संयुक्त सभागृहासमोरील राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार होता.

महाराष्ट्राला आयआयटी, आयआयएमसह जागतिक दर्जाचे विद्यापीठ हवे : कदम
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

केंद्र सरकारने महाराष्ट्रात एक आयआयएम, पाच आयआयटी, एक केंद्रीय विद्यापीठ आणि एक जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करावे, अशी आग्रही मागणी आज राज्याचे शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज राष्ट्रीय शिक्षण सल्लागार समितीच्या ५५ व्या बैठकीत बोलताना केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस. गिल, नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर तसेच विविध राज्यांचे शिक्षणमंत्री उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बनविणार गोमूत्रयुक्त कोला!
डेहराडून, १० फेब्रुवारी/पीटीआय

विदेशी शीतपेयांमुळे अनेक विकार बळावतात असे शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झाले आहे शिवाय या शीतपेयांच्या विक्रीतून भारताला फारच कमी फायदा होतो व अन्य देशांच्या तिजोऱ्या भरण्याचे काम मात्र होते. या विदेशी शीतपेयांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गोमूत्रयुक्त कोला बाजारात आणण्याचे ठरविले आहे. गोमूत्रात अनेक औषधी गुणधर्म असून या शीतपेयाला उत्तम प्रतिसाद लाभेल असा विश्वासही संघाने व्यक्त केला आहे.

मुलायमप्रकरणी सीबीआय केंद्राच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे सुप्रीम कोर्टाचे ताशेरे..
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी/पी.टी.आय.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी जमविलेल्या कथित अगणित संपत्तीविषयी प्रकरणात सीबीआय केंद्रसरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहे अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. अल्तमश कबीर आणि न्या. सायरॅक जोसेफ यांनी या संस्थेला फटकारले आहे. मुलायम यांच्या कथित अगणित मालमत्तेसंदर्भात केलेल्या चौकशीवर अहवाल सादर करावयाचा आहे अशी विनंती सीबीआयची सुप्रीम कोर्टाला होती. मात्र अचानक या मागणीपासून दूर होऊन सीबीआयने यासंदर्भात विधी खात्याचे मत विचारात घ्यावे लागेल, असे या पीठासमोर सांगितले. त्यावेळी या दोन्ही न्यायाधीशांनी या संस्थेला कडक शब्दांत फटकारले. अ‍ॅड्. विश्वनाथ चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयात मुलायमसिंह यादव, त्यांचे पुत्र अखिलेश आणि प्रतीक आणि सून डिम्पल यांनी अगणित संपत्ती जमा केली असल्याबाबत चौकशी व्हावी अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानेच सीबीआयला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता याप्रकरणी अहवाल सीबीआयला सादर करावयाचा आहे, मात्र मध्येच विधी खात्याचे मत घेण्याचा उल्लेख संस्थेने करताच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना फटकारले आहे.

‘ऑस्ट्रेलियातील वणवे लावणारे हे सामूहिक हत्याकांडाचे दोषी’
सिडनी, १० फेब्रुवारी/वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियामधील जंगलांत लागलेल्या भीषण वणव्यात आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला असून ही आजवरची सगळ्यात मोठी दुर्घटना मानली जात आहे. मात्र यातील काही आगी समाजकंटकांनी मुद्दाम लावल्याचा आरोप होत असून या आगी लावणारे सामूहिक हत्याकांडाचे दोषी आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई केली जाईल, असा निर्धार पंतप्रधान केव्हिन रूड यांनी आज पार्लमेंटमध्ये व्यक्त केला.
या वणव्यातील किमान गिप्सलँड येथील मोठी आग ही ‘लागली’ नसून ‘लावण्यात’ आली आहे, याविषयी पोलिसांची आता खात्री पटली आहे. या आगीत किमान २० जण जळून मृत्युमुखी पडले आहेत. असे कृत्य कोणी करू शकेल या नुसत्या विचारानेच आम्ही नि:शब्द झालो आहोत. या कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना योग्य तो शासन करण्यासाठी संपूर्ण देशानेच आता लक्ष घालण्याची गरज आहे, असे आवाहन रूड यांनी पार्लमेंटमध्ये केले. हा प्रकार म्हणजे निव्वळ सामूहिक हत्याकांडाचा प्रकार असून या वृत्तीचा तातडीने नायनाट करणे हे देशापुढील प्रमुख आव्हान आहे, असेही ते म्हणाले.

इस्राएलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान
जेरुसलेम, १० फेब्रुवारी/पीटीआय

हमास संघटनेविरुद्ध सुरू असलेला संघर्ष, गाझा पट्टीत इस्राएल लष्कराने नुकतीच केलेली कारवाई व त्याविरोधात व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया अशा वावटळीतून जात असलेल्या इस्राएलमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले.अतिउजव्या विचारसरणीचे नेते बेंजामिन नेतान्याहू व विद्यमान परराष्ट्रमंत्री झिपी लिवनी यांच्यापैकी कोणाला नवे सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार हे या निवडणुकीत ठरणार आहे. हमास संघटनेशी शस्त्रसंधी पुकारण्यात आला असला तरी इस्राएल या संघर्षांच्या छायेतून अजून बाहेर आलेला नाही. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९२६३ केंद्रांवर मतदान पार पडले. या देशात सुमारे ५३ लाख मतदार आहेत. इस्राएलमधील निवडणुकांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचेही लक्ष लागले आहे.