Leading International Marathi News Daily                               गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंधेरी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर बुधवारी पोलिसांनी विविध कसरती करून आपले कौशल्य सादर केले.

पाकिस्तानमध्ये कसाबवर गुन्हा दाखल?
इस्लामाबाद, ११ फेब्रुवारी/पीटीआय

मुंबईवर गेल्या २६ नोव्हेंबर रोजी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी जिवंत पकडला गेलेला अजमल आमीर कसाब व या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या अन्य १३ लोकांवर पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असल्याचे वृत्त ‘जिओ’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र कसाबवर असा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नागपूरच्या पँसेंजर व कार्गो हब प्रकल्पाला मंजुरी
नागपूर, ११ फेब्रुवारी / प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर अ‍ॅण्ड कार्गो हब अ‍ॅट नागपूर’ अर्थात मिहान प्रकल्पात विमानतळाच्या विकासासाठी तब्बल एक वर्षांनंतर मंजुरी दिल्याने या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा दूर होऊन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्गो हबसाठी केंद्राने भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात संयुक्त कंपनी स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता विमानतळ विकासासाठी नवीन कंपनी जागतिक निविदा आमंत्रित करेल. त्यातही या नवीन कंपनीची भागीदारी राहणार आहे. मात्र, विमानतळाच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी गजराजसाठीच्या जमिनीचा प्रश्न, शिवणगाववासियांचे पुनर्वसन आणि मोबदल्याचा प्रश्न कायम आहे.

राणे-पवार पुन्हा भेटले!
पुणे, ११ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज पुण्यात पुन्हा भेट घेतली. निलंबनाची कारवाई मागे घेत योग्य पुनर्वसन करण्यात काँग्रेसकडून होत असलेल्या विलंबामुळे राणे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय पक्का केला असून पुढील राजकीय भवितव्य ठरविण्यासाठीच आजची भेट झाल्याची चर्चा आहे. पुण्यातील ताज ब्ल्यू डायमंड या तारांकित हॉटेलमध्ये सायंकाळी पाच वाजता दोन आलिशान गाडय़ा आल्या. त्यावर लाल दिवे वा बडी राजकीय व्यक्ती असल्याची चिन्हे नव्हती.

शिवसेनेला लागलेत डोहाळे, पण राष्ट्रवादी ‘थंड’च!
नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

भाजपशी दीर्घकाळची युती संपुष्टात आणून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे शिवसेनेला डोहाळे लागले असले तरी या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने तूर्तास थंड बस्त्यात टाकल्याचे दिसत आहे. शिवसेनेशी ‘गुफ्तगू’ सुरु ठेवण्यामागे जागावाटपाच्या वाटाघाटीत काँग्रेसवर दडपण आणण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे डावपेच असल्याचे म्हटले जात आहे.

मद्यपि चालकासमवेत प्रवास करणे हाही गुन्हा दोघांना एक दिवसाची कैद
मुंबई, ११ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत मद्यपि चालकाविरुद्ध कारवाई केली जात होती. मात्र आता मद्यपि चालकासमवेत प्रवास करणाऱ्या प्रवाशावरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कायद्यानुसार नोंदल्या गेलेल्या पहिल्या गुन्ह्यात मद्यपि चालकासह त्याच्यासोबत असणाऱ्या प्रवाशाला न्यायालयाने आज एक दिवसाच्या कैदेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे आता मद्यपि चालकांसमवेत प्रवास करणाऱ्यालाही तुरुंगवासाला सामोरे जावे लागणार आहे.

आता प्रतिक्षा लॉटरीची!
अवघ्या पावणेचार हजार घरांसाठी सव्वाचार लाख अर्ज!

मुंबई, ११ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईत नऊ ठिकाणी म्हाडाने उपलब्ध करून दिलेल्या तीन हजार ८६३ घरांसाठी एकूण चार लाख ३१ हजार ५२ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. आज दिवसभरात २० हजार ८११ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. वर्सोवा आणि प्रतिक्षानगर येथील घरांसाठी लोकांनी सर्वाधिक पसंती नोंदविल्याचे कळते.

‘ते’ खाणार मते आणि तुम्ही काय काय खाणार..!
संदीप प्रधान, मुंबई, ११ फेब्रुवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेची मते खाणार की भाजपची, राष्ट्रवादीचे बंडखोर काँग्रेसची मते गिळणार का, बहुजन समाज पार्टी काँग्रेसच्या मतांचा घास घेणार का अशा प्रश्नांची गणिते मांडण्यात मग्न असलेल्या राजकीय पक्षांनी यंदाच्या निवडणुकीत मतदारराजाला नेहमीसारखे आश्वासनांचे गाजर न दाखवता अगदी पोटभर खाऊन तृप्ततेचा ढेकर देण्याचा चोख बंदोबस्त केला आहे. शिवसेनेच्या ‘शिववडा’च्या प्रतिक्षेने खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. काँग्रेसवाल्यांचे कांदापोहे संमेलन भरण्याची प्रतिक्षा लवकरच संपेल. राज ठाकरे यांच्या मनसेने मुंबईतील ३६ विभागांत मारूती ओमनी गाडय़ांतून चकली-चिवडय़ापासून वारणाची विविध उत्पादने पुरविण्याचा संकल्प सोडला आहे.

विद्यापीठ कागदावर; कुलगुरूनिवड मात्र ‘फास्ट-ट्रॅक’वर!
आशिष पेंडसे, पुणे, ११ फेब्रुवारी

केवळ काही दिवसांपूर्वी कागदावरच अस्तित्वात आलेल्या १२ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंचा शोध घेण्यासाठी जाहिराती देत मनुष्यबळ विकास खात्याने निवड प्रक्रियेचा अक्षरश: ‘बाजार’ मांडला असून कोणत्याही परिस्थितीत महिनाअखेरीपर्यंत नव्या कुलगुरूंची नामनिषिती करण्याचा अलिखित आदेश समितीला बजाविण्यात आला आहे. एरवी, एका कुलगुरूच्या निवडीसाठी पाच-सहा महिने तिष्ठत ठेवले जात असताना देशभरातून आलेल्या सुमारे दोन हजार अर्जाची छाननी करून अंतिम यादी तयार करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत
मुंबई १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकाजवळ संध्याकाळी अपघात झाल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. बोरिवली येथे सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने गाडय़ा किमान अर्धातास उशीराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या काळात ही घटना घडल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत पोहोचण्यासाठी दोन तास लागत होते. चर्चगेट - बोरिवली गाडीची धडक लागल्याने महालक्ष्मी स्थानकाजवळ एकजण ठार झाला. त्यामुळे ही गाडी बराच वेळ एकाच ठिकाणी उभी होती. त्यामुळे बोरिवलीकडे जाणाऱ्या इतर गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. साधारण अर्धातास उशीराने गाडय़ा धावत होत्या. संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. ऐन गर्दीची वेळात ही घटना घडल्याने गाडय़ांचा खोळंबा झाला. बोरिवली येथे सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने चर्चगेटकडे येणाऱ्या गाडय़ाही उशीराने धावत होत्या. या सिग्नल बिघाडाचा विरारकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही फटका बसला. त्यामुळे आज दोन्ही मार्गावरील गाडय़ा उशीरा धावत होत्या. सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

पी. चिदम्बरम संतापले नरेंद्र मोदींवर
नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी/पीटीआय

पाकिस्तानी दहशतवाद्यांना मुंबईमध्ये हल्ला घडविण्यासाठी मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांची चौकशी करण्यात यावी या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मागणीमुळे व अशाच आशयाची प्रतिक्रिया पाकिस्ताननेही व्यक्त केल्याने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम संतप्त झाले. नरेंद्र मोदी हे पाकिस्तानच्या बाजूचे आहेत का असा खडा सवाल चिदम्बरम यांनी विचारला आहे. दरम्यान मुंबई हल्ल्यासंदर्भात मंगळवारी आपण केलेले वक्तव्य त्यामागील संदर्भ वगळून प्रसारित करण्यात आले असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी व पाकिस्तान परस्परांच्या संपर्कात आहेत का हे तुम्हीच मोदींना विचारा असे चिदम्बरम यांनी पत्रकारांना सांगितले. मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर भारतामध्ये आणखी हल्ले चढविण्यात येतील या अल काईदाने दिलेल्या धमकीसंदर्भात बोलताना पी. चिदम्बरम यांनी सांगितले की, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे. हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे ठोस पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहेत. त्या पुराव्यांची छाननी करून पाकिस्तानने मुंबई हल्लाप्रकरणी चौकशी केली आहे. मात्र या चौकशीच्या निष्कर्षांसंदर्भात पाकिस्तानने भारताला अधिकृतपणे अद्याप काहीही कळविलेले नाही असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले.

तीन बँकांत सरकारची ३८०० कोटींची गुंतवणूक
नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी/ पीटीआय

सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि विजया बँक या तीन बँका सरकारकडून आर्थिक वर्ष २००९-१० मध्ये अतिरिक्त ३८०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक मिळवतील. नऊ टक्क्यांच्या भांडवली पूर्तता प्रमाणाचे (सीएआर) ‘बेसल २’ दंडक पाळणे या तिन्ही बँकांसाठी आवश्यक बनले आहे. मात्र या नव्या सरकारी भांडवली गुंतवणुकीतून या तिन्ही बँकांच्या सीएआर १२ टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. या ३८०० कोटी रुपयांपैकी सेंट्रल बँकेच्या वाटय़ाला सर्वाधिक १,४०० कोटी रुपये, तर यूको बँक आणि विजया बँकेला प्रत्येकी १२०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक मिळेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर दिली.

अर्थसंकल्पसाठी आजपासून संसदेचे अधिवेशन
नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळातील संसदेचे शेवटचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. पंधराव्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन बोलविण्यात आले असले तरी ते वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. सत्यम कॉम्प्युटर्सच्या रामलिंगम राजूने केलेला सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा आणि निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना हटविण्याची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपाळस्वामी यांनी केलेली शिफारस यामुळे मनमोहन सिंग सरकारच्या संसदेतील शेवटच्या सत्रातही सत्ताधारी आणि विरोधी आघाडय़ांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा शेवटचा अंक रंगणार आहे. शुक्रवारी २००९-१० सालासाठी रेल्वेचा, तर सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येतील.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८