Leading International Marathi News Daily                              शुक्रवार, १३ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानची कबुली!
इस्लामाबाद, १२ फेब्रुवारी/पीटीआय
मुंबईवर गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण हल्ल्याचा कट काही अंशी पाकिस्तानमध्येच शिजला होता अशी कबुली अखेर पाकिस्तानने आज दिली. तसेच मुंबई हल्ल्याप्रकरणी अजमल आमीर कसाबसह नऊ जणांविरुद्ध पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सहा जणांना अटक केली असल्याची माहिती पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी आज पत्रकारांना दिली. मुंबई हल्ल्याशी आमचा काहीच संबंध नाही, असा पाकिस्तानने गेले दोन महिने चालविलेला कांगावा अखेर आज अशाप्रकारे उघडा पडला. तत्पूर्वी मुंबई हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने केलेल्या चौकशीचा अहवाल रहमान मलिक यांनी पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त सत्यव्रत पाल यांच्याकडे आज सकाळी सुपूर्द केला.

कसाबला वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड
समर खडस
मुंबई, १२ फेब्रुवारी

अजमल अमीर कसाब जिवंतच नाही, असे सांगणाऱ्या पाकिस्तानला आता कसाब हा पाकिस्तानचा नागरिक असून त्याचा मुंबई हल्ल्यातील सहभाग मान्य करावा लागला आहे. कसाबचा विविध पद्धतीने काटा काढण्याचा पाकिस्तान प्रयत्न करू शकते, असे ‘रॉ’ने सांगितल्यानंतर मुंबई पोलीस कसाबला जीवापाड जपत आहेत. कसाबला रोज खास तपासणी करण्यात आलेले जेवण आणि बिस्लेरीचे पाणी दिले जाते. तसेच कसाबाबतच्या काही बातम्या दिल्लीतील पत्रकारांनी फोडण्यास सुरुवात केल्यावर कसाबबाबत पूर्ण गुप्तता पाळण्यातही कोणतीही कसर मुंबई पोलीस ठेवत नसल्याचे राज्याच्या गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानने केलेल्या मागण्या
मुंबईवरील हल्ल्यामध्ये जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाबला आमच्या ताब्यात देण्यात यावे. त्याने न्यायालयात दिलेले निवेदनही आमच्याकडे सुपूर्द करावे. त्यामुळे कसाबवर कायदेशीर कारवाई करता येईल.
मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी ९ मृत अतिरेक्यांकडून हस्तगत करण्यात आलेली कागदपत्रे, डायऱ्या, सीम कार्ड आणि इतर वस्तू ताब्यात द्याव्यात. या दहशतवाद्यांना भारतात सीम कार्ड कशी उपलब्ध झाली, ते जाणून घेणे गरजेचे आहे.
नरिमन हाऊसमधील घटनेची सविस्तर माहिती भारताकडून यायला हवी. ज्यू लोकांनाच का मारले गेले. या भागाचे निश्चित स्थान आणि येथे गोळीबार सुरुवातीला कुणाकडून, केव्हा झाला त्याची संपूर्ण माहिती येणे आवश्यक आहे.
दहशतवाद्यांनी आपल्या मोबाईलवरून कुणाशी संभाषण केले? दहशतवाद्यांनी आपल्या मोबाईलवरून पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये संपर्क साधला होता, त्याची सर्व माहिती चौकशीत उपयुक्त ठरेल.
कसाबसह इतर मृत दहशतवाद्यांचे हातांचे ठसे, ‘डीएनए’चे नमुने सुपूर्द करण्यात यावेत. यामुळे या दहशतवाद्यांची माहिती मिळणे सोपे होईल तसेच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेता येईल.
समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या ‘ट्रॉलर’मध्ये मुंबई किनारपट्टीनजीक इंधन भरण्यात आले होते. दहशतवाद्यांची मदत कोणी व का केली, दहशतवाद्यांची ‘ट्रॉलर’ अडवली कशी गेली नाही, याबाबतची माहिती भारताने द्यावी.

पाकिस्तानचे सकारात्मक पाऊल
नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

तब्बल दहा आठवडय़ांनंतर पाकिस्तानने कबुली दिल्यावर भारताने त्याचे ‘सकारात्मक घडामोड’ अशा सावध शब्दात स्वागत केले आहे. पाकिस्तानने दिलेल्या औपचारिक उत्तराचा विस्तृत अभ्यास करूनच प्रतिक्रिया देण्याचे भारताने ठरविले आहे. अनेकवेळा घूमजाव करणाऱ्या पाकिस्तानच्या कबुलीजबाबामुळे भारताचा आरोप सिद्ध झाला असला तरी भारताने तेवढय़ावर समाधान न मानता पाकिस्तानवरील दडपण पुढेही कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने हाती घेतलेल्या चौकशीशी संबंधित माहिती भारताकडून मागितली आहे. पाकतर्फे उपस्थित करण्यात आलेले मुद्दे केंद्र सरकार तपासून बघेल. त्यानंतरच पाकिस्तानला आणखी काही माहिती देणे शक्य होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

पाकिस्तान झुकले - ‘लष्कर’ची टीका
श्रीनगर, १२ फेब्रुवारी/पी.टी.आय.

पाकिस्तान सरकार भारत आणि अमेरिकेच्या दबावापुढे झुकले असून लष्कर-ए-तोयबाच्या नेत्यांना या कटात विनाकारण गोवले असल्याची टीका लष्कर-ए-तोयबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवी याने येथे केली आहे. पाकिस्तानने आपला नेता झाकी-उर रेहमान लकवी याचे नाव गोवल्याने लष्करने पाकिस्तान सरकारचा निषेध केला आहे. मुंबईच्या हल्ल्यात लष्करचा हात नव्हता असे गझनवी याने येथे सांगितले. ‘आपण कोणाचे तुष्टीकरण करू इच्छिता असे आम्ही पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांना विचारू इच्छितो’, असे गझनवी म्हणाला.

रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार?
प्रसाद मोकाशी
मुंबई, १२ फेब्रुवारी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्या सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये राज्यातील गेल्या १२ वर्षांंपासून रडतखडत चाललेल्या प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पांमध्ये मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेच्या विस्तारीकरणाचाही समावेश आहे.यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प आहे. राज्यातील प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा व्हावा यासाठी रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अगोदर महाराष्ट्रातील खासदारांची एक बैठक मुंबईत झाली. राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या १२ वर्षांंपासून रखडले आहेत. किंबहुना या प्रकल्पांना म्हणावी तशी गती मिळालेली नाही. १९९३-९४ मध्ये जाहीर झालेले अनेक प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

सोने १४,७०० रुपयांवर!
मुंबई, १२ फेब्रुवारी/ व्यापार प्रतिनिधी

भावाचे नवनवे शिखर गाठण्याचा क्रम पुढे सुरू ठेवताना सोन्याने आज प्रति ग्रॅम १४,७०० रुपयांपल्याड मजल मारत नवीन विक्रम नोंदविला. आज सराफ बाजारात झालेल्या व्यवहारात स्टँडर्ड सोन्याचा (९९.५ टक्के शुद्धतेचे) भाव तोळ्यामागे तब्बल ३१५ रुपयांनी वधारून १४,७०५ रुपयांवर बंद झाला. जागतिक बाजारात सर्वत्रच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या मागणीत अलीकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेच्या ओबामा सरकारने जाहीर केलेल्या ताज्या बेलआऊट पॅकेजमुळे अडचणीत सापडलेली आर्थिक व्यवस्था लवकर सावरण्याची चिन्हे नसल्याचे संकेत आंतरराष्ट्रीय ट्रेडर्सकडून मिळत आहेत. त्यामुळे अन्य गुंतवणूक पर्यायांपेक्षा सोन्यातील गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे सराफ बाजारातील जाणकारांनी सांगितले.

निठारी हत्याकांड
पंधेर, कोहिली दोषी
गाझियाबाद, १२ फेबुवारी / पी.टी.आय.

लहान मुले तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी उद्योगपती मोहिंदर पंधेर तसेच त्याचा नोकर कोहिली यांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. सर्वाच्या मनाचा थरकाप उडविणाऱ्या निठारी हत्याकांडाला या निकालामुळे आज एक वेगळे वळण लागले आहे. पंधेर तसेच कोहिली यांच्यावर तब्बल १९ जणांच्या हत्येचा आरोप असून यापूर्वी केंद्रीय गुप्तचर खात्याने याप्रकरणी चौकशी करून त्यांना ‘क्लीनचिट’ दिली होती. लहान मुले तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याचा या दोघांवर आरोप आहे. यापैकी रिमपा हलदर या १४ वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती रामा जैन यांनी पंधारे तसेच कोहिली यांना दोषी ठरविले. तथापी त्यांची शिक्षा शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. ‘सीबीआय’ ने १९ पैकी १६ प्रकरणात पंधारे तसेच कोहिली यांना ‘क्लीनचिट’ दिली असतानाच विशेष न्यायालयाने त्यांना एका प्रकरणी दोषी ठरविल्याने ‘सीबीआय’ च्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

जेएनआरयुएम अंतर्गत नवीन बसेससाठी बेस्टचा प्रस्ताव
मुंबई, १२ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बेस्टने नवीन बसेस खरेदीसाठी केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण योजनेतून पैसे मिळवण्यासाठीचा प्रस्ताव मांडला असून हा निधी मिळाला तर, बेस्टच्या ताफ्यात नवीन एक हजार ६०६ बसेसची भर पडणार आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार ९४८ बसेस आहेत. २०१० पर्यंत बसेसचा ताफा पाच हजार ४०० पर्यंत वाढवण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रयत्न आहे. नवीन बसेस घेण्यासाठी निधीची कमतरता सध्या बेस्टला भेडसावत आहे. मुंबई महापालिकेने बेस्टला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे, अशी मागणी बेस्टचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे तसेच बेस्ट सदस्यांनी मागील वर्षांपासून पालिकेकडे केली होती. मात्र पालिकेकडून त्याला अद्याप होकार मिळालेला नाही. नवीन १६०६ बसेस खरेदीसाठी ४५६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जेएनआरयुएम अंतर्गत १५९.६१ कोटी (३५ टक्के), राज्य शासनाकडून ६८.४१ कोटी (१५ टक्के) व बेस्टचा स्वतचा वाटा २२८.०२ कोटी (५० टक्के) अपेक्षित आहे. बेस्ट सध्या तोटय़ामध्ये असल्याने महापालिकेने या निधीसाठी अर्थसहाय्य करण्याची बेस्ट सदस्यांची मागणी आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८