Leading International Marathi News Daily
शनिवार, १४ फेब्रुवारी २००९
  प्रेमविवाहाला पालकांचं प्रोत्साहन!
  आकर्षण म्हणजे प्रेम नसतं!
  श्वापद
  खांद्याला खांदा
  विज्ञानमयी
  निगाहे मिलाने को जी चाहता है..
  आंतरप्रांतीय ‘वर’ पक्ष
  प्रतिसाद
  जबाबदारीमधली गंमत
  धडय़ाची तयारी
  गो ग्रीन, थिंक ग्रीन
  स्वप्नपूर्तीच्या वाटेवर..
  लाला लाला ने रे मला माझ्या गावाला
  जागतिक प्रेमोत्सव
  ‘सक्षम मी’ इंग्रजीत
  सर्वागीण विकासासाठी..
  शब्देविन संवादु..
  विश्व मराठी साहित्य संमेलन नगरी!

 

आपल्या मुला-मुलींनी प्रेमात पडून लग्न करावं, या गोष्टीला अनेक पालकांचा पूर्वी जबरदस्तच विरोध असे. परंतु आपल्या मुला-मुलींनी स्वत:चा जोडीदार स्वत:च निवडणं, हे पालकांना सोयीचं वाटू लागलं आहे. प्रेमविवाहांचं ते स्वागत करू लागले आहेत. हा स्वागतार्ह बदल का बरं व्हायला लागला असेल?
आज व्हॅलेन्टाईन्स डे! आपल्या प्रेम भावना एस. एम. एस., भेटकार्ड, फुलं, भेटवस्तू.. इ. मधून मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस! खरं तर भावना व्यक्त करण्याचं बुजलेपण ज्या काळात होतं, तेव्हा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे नव्हती नि आज सगळंच जेव्हा ‘खुल्लमखुल्ला’ होत चाललंय, म्हणजेच खरं तर ‘व्हॅलेंटाईन डे’ची जेव्हा तशी गरज उरलेली नाही, तेव्हा मात्र हा दिवस धूमधडाक्यात साजरा होतोय!!
काळ पूर्वीचा असो, वा आजचा.. आपण कुणाच्या तरी किंवा कुणीतरी आपल्या प्रेमात पडावं असं कुणाला वाटत नाही? पण आपल्या मुला-मुलींनी प्रेमात ‘पडून’ लग्न करावं या गोष्टीला अनेक पालकांचा पूर्वी जबरदस्तच विरोध असे. ‘पालकसत्ते’च्या भावनेतून त्यांचा ‘दाखवून-बघून’ विवाहावरच जास्त विश्वास असे!
 

आता मात्र हळूहळू का होईना, काही सुज्ञ आणि समंजस पालकांच्या या मानसिक बैठकीमध्ये बदल होताना दिसतो आहे. आपल्या मुला-मुलींनी स्वत: जोडीदार निवडणं, हे आता पालकांना सोयीचं वाटू लागलं आहे. प्रेमविवाहांचं ते मोकळेपणाने स्वागत करू लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत भारतातलं, विशेषत: महानगरातलं, आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक जग ज्या वेगाने बदललं आहे, त्याचे कौटुंबिक, मुख्यत: वैवाहिक, नात्यावर उमटणारे पडसाद प्रकर्षांने दृष्यमान व्हायला लागले आहेत. त्याची दखल घेऊन, ‘आपल्या पाल्याने आपल्या जोडीदाराची निवड आपणच केलेली बरी’ असं काही पालकांना वाटणं स्वाभाविक आहे. हा स्वागतार्ह बदल का बरं व्हायला लागला असेल?
सुजयची आई म्हणते, ‘‘आम्ही कोकणातून मुंबईत आलो. बाळबोध वळणाच्या घरातली आम्ही साधी माणसं. आमचा सॉफ्टवेअर इंजिनीयर मुलगा सारं जग फिरतोय. त्याच्याशी बोलताना वारंवार जाणवतं, की त्याचं विश्वच आमच्यापेक्षा सर्वस्वी भिन्न आहे! त्याच्या भोवतीची दुनिया, माणसं, कार्यसंस्कृती, त्याची स्वप्नं, आव्हानं, मनीषा.. सारं, सारं जे आमच्या कल्पनाविश्वाच्याही पलीकडचं आहे, ते विश्व तो प्रत्यक्षात जगतोय! त्याच्या या स्वप्नांमध्ये त्याला साथ देईल, त्याच्या विश्वाशी जुळवून घेईल आणि रमेल, अशी त्याची सहचरी आम्ही कशी काय निवडणार? आणि साहचर्याच्या कल्पना तरी पूर्वीसारख्या कुठे उरल्या आहेत? आमच्या वेळच्या लग्नानंतर स्त्रीचं वर्तुळ नवऱ्याच्या, त्याच्या कुटुंबाच्या वर्तुळात पूर्ण विलीनच होऊन जायचं.. अपेक्षाच तशी होती. नंतर दोन वर्तुळं एकत्र येऊन ती जिथे एकमेकांना छेद देतात, तो सारा भाग म्हणजे ‘सह’जीवन आणि प्रत्येकाच्या वर्तुळातील उरलेली २०-२० टक्के जागा म्हणजे ‘तिची’ आणि ‘त्याचा’ स्वत:चा अवकाश (स्पेस) ही संकल्पना हळूहळू मान्य झाली. आता मी माझ्या मुलाला सतत जगभर फिरताना बघते, तेव्हा तर मनात येतं की विवाह या दोन वर्तुळांना एकत्र आणेल, पण अनेकदा त्यांना आपआपली वर्तुळं घेऊन स्वतंत्रच राहावं लागेल. अशा वेळी आमची ‘सून’ कशी असावी., यापेक्षा त्याची ‘बायको’ कशी असावी, हे त्यानेच ठरवलेलं बरं नाही का?’’
निकिता एक अत्यंत बुद्धिमान मुलगी आहे. ती सर्जन आहे आणि त्यातील सुपर-स्पेशालिटीचं तिचं पुढचं शिक्षण चालू आहे. या काळात विविध परिषदांना देश-विदेशात जाणं, अनुभवी तज्ज्ञांच्या जोडीने पेपर्स प्रेझेंट करणं, सतत वाचन, अभ्यास असं तिचं चाकोरीबाहेरचं, विविधांगी जग आहे. तिच्या आई-बाबांना वाटतं की, आमच्यासारखं साधं, सरळ, ठरीव दिनक्रमाचं, संसारासाठी लागणारं एक साचेबद्ध आयुष्य हिला कसं जगता येईल? मग तिचं प्रोफेशनभोवती केंद्रित असलेलं आयुष्य समजून घेणारा, त्याचा योग्य तो आदर करणारा, तिचे वेगळे अग्रक्रम मान्य करणारा, तिच्या अपेक्षा व आकांक्षांना भिडणारा जोडीदार तिचा तिनेच शोधलेला बरा.त्यामुळे आम्ही तिला प्रेमविवाहासाठी परवानगी काय, उत्तेजनच देत आहोत!
प्रश्न असा पडतो की, अशी परवानगी किंवा उत्तेजन देऊन प्रेमविवाह होतात का हो? प्रेमविवाह असे ठरवून नक्कीच होणार नाहीत; पण मैत्रीच्या वाटेने जाणारे परिचयोत्तर विवाह होऊ शकतात. मात्र तेही पालकांना वाटलं म्हणून तर नक्कीच नाही.
त्यासाठी मुलंमुली पौगंडावस्थेत असल्यापासूनच शेताची नांगरणी सुरू करावी लागते. पुढील अनेक वर्षे त्यांची मशागतही करावी लागते. मुला-मुलींना तुम्ही कसे वाढवता, तरुण वयात त्यांची जडणघडण कशी होते, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मुलामुलींचा स्वशोध (२ी’ऋ-्रीिल्ल३्र३८) सुरू होतो, तेव्हा मुळात त्यांची वेगळी आयडेंटिटी (स्वतंत्र ओळख) मान्य करणं, त्यानुसार त्यांच्या स्वतंत्र मतांचा व विचारांचा आदर करणं (किमानपक्षी अवमान न करणं), मुलामुलींना समानतेने व एक माणूस म्हणून वाढवणं, घरातलं वातावरण निकोप व मोकळेपणाचं ठेवणं, मुलं-मुली त्यांच्या अनेक गोष्टी घरात खुलेपणाने सांगू शकतील, असे परस्परांतील सुदृढ नातेसंबंध असणं- या सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. यातूनच मुलं-मुली स्वत:चा विचार करायला शिकतील. आपली मतं वेळोवेळी पडताळून बघून, त्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करून, आपल्या विचारांमागे ठामपणे उभं राहण्याचा आत्मविश्वास त्यांना येईल. त्यातूनच त्यांना स्वातंत्र्य पेलण्याची नि आपल्या निर्णयाची जबाबदारी आपण घेण्याची, ती निभावण्याची हिम्मत येईल.
मुला-मुलींसाठीचे निर्णय सतत आपणच घेत आलो, त्यांना कधी धडपडू दिलंच नाही, कोणतीच जबाबदारी त्यांच्यावर टाकली नाही, तर ती निर्णयक्षम बनणार कशी? आपली जबाबदारी आपण निभावण्याची ताकद त्यांच्यात येणार कुठून? हे म्हणजे शाळा-कॉलेजच्या शर्यतीतही कधीच न पळलेल्या माणसाला मॅरेथॉन धावायला सांगण्यासारखं आहे! त्यातून ही लग्नासारखी जबाबदारी.. जी पुढे दीर्घकाळ निभावयाची आहे आणि ज्यामध्ये दोन माणसं आणि तीन कुटुंबांचा (एक लग्नानंतरचं, स्वत:चं!) समावेश असणार आहे. म्हणून विवाहाची जबाबदारी पेलण्यासाठी जोडीदार निवडीविषयी त्यांना आवर्जून योग्य ते मार्गदर्शन मिळू देणं, त्यांच्यात त्याविषयीचा एक विचार विकसित करणं अत्यावश्यक आहे.
तेव्हा मुला-मुलींना प्रेमविवाहाला मुभा देऊन त्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकताना त्यांचे हे खांदे सशक्त करण्याची पालकत्वाची जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे, हे विसरता येणार नाही. आता ज्यांची मुलं विवाहेच्छु आहेत, त्या पालकांसाठी कदाचित यासाठी उशीर झालेला असू शकतो. परंतु बदलत्या काळाचं हे आव्हान लक्षात घेऊन ज्यांची मुलं-मुली आता तारुण्याच्या उंबरठय़ावर आहेत, त्या पालकांनी तरी हा काळाचा वेध दूरदृष्टी दाखवून आत्ताच घ्यायला हवा. आपला काळ आणि मुलांचा येणारा काळ यातली काळाच्या बदलातील वेगामुळे वाढत जाणारी दरी लक्षात घेऊन पालकसत्तेचा आग्रह सोडणं नि मुलामुलींना त्यांच्या विवाहाचे निर्णय त्यांना पेलता यावे यासाठी सक्षम बनवणं- ही या पालकांसाठी आव्हानं असणार आहेत!
शिवाय हे सर्व करत असताना मुला-मुलींना नातेसंबंधांची अधिकाधिक चांगली समज कशी येईल, प्रेमाचे आकर्षण (इनफॅच्युएशन), मैत्री, सख्य, परिपक्व प्रेम (ज्यामध्ये आदर, आस्था, काळजी (ूं१्रल्लॠ), शेअरिंग आणि समतेची जाणीव आहे) आणि वैवाहिक नातं या सगळ्यातला फरक त्यांना वेळोवेळी, विविध माध्यमांतून आणि खुल्या, सहिष्णू चर्चेतून समजून सांगता आला पाहिजे. मुला-मुलींनीही नुसत्या बाह्य आणि वरवरच्या आकर्षणांच्या आणि फक्त करियरच्या मागे न लागता, वाचन, श्रवण, मनन, चर्चा अशा विविध मार्गानी आपले नातेसंबंधविषयक विचार अधिक परिपक्व करायला हवे. अशा परिपक्व आणि परिपूर्ण विचारांचं अधिष्ठान असेल तरच निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाची जबाबदारी पेलून ते निभावण्याची क्षमता आणि त्याच्याच जोडीने येणारी सुरक्षिततेची भावना मुला-मुलींमध्ये तयार होऊ शकेल.
अवधूत परळकर यांनी उषा मेहतांच्या ‘मितवा’ या काव्यसंग्रहातल्या प्रस्तावनेत म्हटलंय, ‘प्रेमभावना काही केवळ तारुण्यसुलभ भावनांचा आविष्कार नाही. तो कालबद्ध कार्यक्रमही नाही. प्रेमभाव ही एक वयातीत, कालातीत आणि आयुष्यव्यापी जाणीव आहे..’
ही जाणीव ज्यांना होईल तेच विवाहाच्या दीर्घकालीन नात्याकडे अधिक व्यापकतेने आणि त्यातील प्रेमाच्या भावनेकडे अधिक सखोलतेने, परिपक्वतेने पाहू शकतील. असं जर पाहता आलं, तर प्रेमविवाह सर्वासाठीच आनंदाचे, समाधानाचे ठरतील. येणाऱ्या काळाची ती गरजच नाही का?
वंदना सुधीर कुलकर्णी
vankulk57@yahoo.co.in