Leading International Marathi News Daily
शनिवार १४ फेब्रुवारी २००९
नोंदणी अधिनियमाची शतकभराची वाटचाल
देखभाल शुल्क न देणारा सोसायटीचा शत्रूच!
घर पहाव घेऊन : कथा ‘मानसी’ची
सहकारी संस्थांच्या इमारत पुनर्विकास प्रकल्पातील सूत्रबद्ध शासकीय नियम
वास्तुरंग
मेलबॉक्स
गृहनिर्माण संस्था आणि तक्रारनिवारण :
ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील तक्रार निवारण कसे करावे?
निसर्गरम्य दापोली परिसर

 

नुसते पोलीस खात्यावर आणि सिक्युरिटीच्या माणसावर खापर फोडून उपयोग होणार नाही. सभासदांनी स्वत: काही बंधने पाळायला तयार असले पाहिजे. सिक्युरिटीने केलेली चौकशी किंवा घेतलेला आक्षेप हा आपला अपमान किंवा उपमर्द समजता कामा नये.
चाळीची वस्ती हळूहळू कालबाह्य़ झाली आणि बंद फ्लॅट्सच्या हाऊसिंग सोसायटय़ा जन्माला आल्या. लोक बंद दरवाजाच्या फ्लॅटमध्ये राहायला लागल्यावर त्यांना आपल्या जीविताची आणि मालमत्तेची काळजी घ्यावीेशी ही निकड उत्पन्न झाली. पूर्वी चाळीत राहणारे लोक खऱ्या अर्थाने परस्पर सहकार्याने म्हणजेच ‘को-ऑपरेटिव्हली’ राहात असत. आता ते को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहतात पण प्रत्यक्ष वागणुकीत सहकार्याचा अभाव. त्यामुळे त्याना आपल्या लाखमोलाच्या मालमत्तेची आणि अमूल्य अशा जीवित रक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करायची गरज भासू लागली. पूर्वी फक्त बँका, सराफी पेठय़ा, मोठय़ा कंपन्या किंवा गिरण्या कारखान्याच्या गेटवर दिसणारे ‘वॉचमन’ आता हाऊसिंग सोसायटय़ांच्या गेटवर दिसू लागले.
मुंबईच्या व अन्य ठिकाणच्या शहरात तसेच उपनगरात नवीन इमारती उभ्या राहिल्या. त्या बहुतांशी ‘को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग’
 
पद्धतीच्याच उभ्या राहिल्या. आणि मागणी तसा पुरवठा या न्यायाने शहरामध्ये ‘सिक्युरिटी एजन्सीज बस्तान बसवू लागल्या. पूर्वी पोलीस दलात, सैन्यात, मोठय़ा कंपन्यांच्या वॉच अँड वॉर्डमध्ये काम केलेल्या व्यक्ती स्वत:च्या ‘सिक्युरिटी एजन्सीज काढून गरजूंना त्या सिक्युरिटी पुरवू लागल्या. अर्थातच दाम तसे काम या न्यायाने आधुनिक शस्त्रसज्ज, प्रशिक्षित आणि सर्वसामान्य म्हणजे खोगीरभरतीप्रमाणे भरती केलेले उमेदवार अशा प्रकारच्या सिक्युरिटीज उपलब्ध होऊ लागल्या. आधुनिक शस्त्रसज्ज आणि प्रशिक्षित सिक्युरिटीज प्रतीनुसार किंमत मोजून उपलब्ध असतात. अशा महागडय़ा ‘सिक्युरिटीज’ कांही मान्यवर लोकांच्या हाऊसिंग सोसायटय़ाव्यतिरिक्त कुठेच आढळणार नाहीत.
फार पूर्वी जो मुलगा अभ्यासात ‘ढ’ असेल त्याला ‘मिल्ट्रीत’ घाला असा सल्ला देत असत. आज ज्या व्यक्तीला घरदार नाही, असल्यास त्याच्यासाठी जागा नाही, ज्याला कोठलेही कलाकौशल्य येत नसेल. एखादे शारीरिक व्यंग असेल, नोकरी-धंदा करण्याचे वय उलटले असेल अशा व्यक्तींना एकमेव आसरा म्हणजे ‘सिक्युरिटी’ मध्ये भरती होणे.
अशा प्रकारच्या व्यक्ती इमारतीवर जानमालाचे रक्षण करण्यासाठी नेमणे म्हणजे एक उपचाराचा भाग झाला आहे. मध्यंतरी मी एका हाऊसिंग सोसायटीत गेलो होतो. तिथल्या सिक्युरिटीवरील माणसाला त्या हाऊसिंग सोसायटीचे नावही माहीत नव्हते. सिक्युरिटीवरील माणसाचे काम काय, तर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना न चुकता सलाम मारणे, त्यांच्या घरची बारीक सारीक कामे करणे, श्रीमंत, महंत आणि दानशूर सभासदांची मर्जी राखणे, सभासदांना कामवाल्या आणि कामवाल्यांना कामे मिळवून देणे, दूधवाले, इस्त्रीवाले, फुलपुडीवाले, लहानसहान कारागिरावर वचक ठेवून त्यांना गिऱ्हाईक पटवून देणे, सभासदांच्या गाडय़ा पैसे घेऊन साफ करणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इमारतीचे पाणी नियोजन करणे, आणि जमल्यास येणाऱ्या अनोळखी माणसासमोर वही टाकून त्यात नोंद त्यालाच करण्यास सांगणे थोडक्यात सिक्युरिटी करणे म्हणजे जे अपेक्षित असते ते सोडून सर्व करणे. आणि एका ठिकाणची दिवसपाळी ठरवून दुसऱ्या ठिकाणी चादर घेऊन रात्रपाळीला (झोपायला) जाणे, अत्यल्प वेतन आणि ‘बारा घंटेका डोटी’ असल्यावर याशिवाय आणखी कसल्या सेवेची अपेक्षा करणार? जेवढे सोसायटीचे सभासद जे सर्व त्याचे ‘बॉस’ आणि सर्वच घरगुती मामला असल्यावर कडक र्निबध ठेवून काम करणे कठीणच असते.
ज्या ज्या वेळी मी एखाद्या इमारतीत जातो त्या त्या वेळी मला त्या इमारतीत एक गोष्ट बऱ्याचदा निदर्शनास येते. बऱ्याच ब्लॉकना, एक संरक्षक दरवाजा अधिक बसवलेला असतो. तोच नेमका उघडा टाकलेला असतो. दरवाजा उघडायला आतून एक शाळकरी मुलगी किंवा कामवाली येते आणि क्षणात दरवाजा उघडून आत अदृष्य होते. कारण मुले आपला खेळ टाकून, आणि कामवाली आपले काम टाकून बेल वाजली म्हणून दरवाजाकडे धावलेली असते. अशा परिस्थितीत चोऱ्यामाऱ्या झाल्या की सर्वाच्या रोषाचा धनी ‘सिक्युरिटीवाला’ पडतो. खूपच ओरडा झाला की ‘सिक्युरिटी’ बदलली जाते. नांव आणि गणवेश बदलतो थोडे दिवस बरे जातात की परत पहिले पाढे पंचावन्न. शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेऊन पोलीस खात्याने सहकारी सोसायटय़ांना कांही मौलिक सूचना आणि सल्ला दिलेला आहे. ते सर्व सभासदानी, स्वत:च्या जान-मालाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याने घ्यायला हवे. नुसते पोलीस खात्यावर आणि सिक्युरिटीच्या माणसावर खापर फोडून उपयोग होणार नाही. सभासदांनी स्वत: काही बंधने पाळायला तयार असले पाहिजे. सिक्युरिटीने केलेली चौकशी किंवा घेतलेला आक्षेप हा आपला अपमान किंवा उपमर्द समजता कामा नये. पाणी नियोजनाची माहिती करून घेतली पाहिजे. अन्यथा सिक्युरिटी बदलली की पाणी पुरवठय़ाचा बोजवारा उडालाच म्हणून समजा. सोसायटीने स्वत: पुढाकार घेऊन, संबंधित व्यक्तींना जुजबीतरी प्रशिक्षण द्यायला हवे. आपली लाख-करोडो किमतीची स्थावर मालमत्ता आणि कुटुंबियांचे अमूल्य प्राण ज्या सिक्युरिटीवर सोपवणार आहोत त्या सिक्युरिटीसंबंधी अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा.
मोहन गद्रे
लेखक संपर्क : ९८६९९६६९३६