Leading International Marathi News Daily
शनिवार १४ फेब्रुवारी २००९
नोंदणी अधिनियमाची शतकभराची वाटचाल
देखभाल शुल्क न देणारा सोसायटीचा शत्रूच!
घर पहाव घेऊन : कथा ‘मानसी’ची
सहकारी संस्थांच्या इमारत पुनर्विकास प्रकल्पातील सूत्रबद्ध शासकीय नियम
वास्तुरंग
मेलबॉक्स
गृहनिर्माण संस्था आणि तक्रारनिवारण :
ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील तक्रार निवारण कसे करावे?
निसर्गरम्य दापोली परिसर

 

कोकणातील पर्यटनाचा आनंद घ्यायचा झाला तर दापोली व आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य परिसराची भ्रमंती करणे, आवश्यकच आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली हे थंड हवेचे, तालुक्याचे ठिकाण आहे. इंग्रजांनी दापोलीचे महत्त्व ओळखून पेशवाईच्या इतिश्रीनंतर येथे कॅन्टोन्मेंटची स्थापना केली. सुरुवातीला इंग्रजी पत्रव्यवहारांमध्ये दापोलीचा उल्लेख ‘कॅम्प दापोली’ असा करण्यात येत असे. येथे इंग्रज अधिकाऱ्यांचे बंगले व सैनिकांच्या बराकी बांधण्यात आल्या होत्या. दक्षिण कोकणावर नियंत्रण ठेवण्याकरिता येथे इंग्रजी सैन्याचा तळ होता. इंग्रजांच्या दृष्टीने दापोली हे ‘मिनी महाबळेश्वर’ होते. १८४० मध्ये येथील सैन्याचा तळ हलविण्यात आला. दापोलीचे महत्त्व ओळखून १८६२ मध्ये सुवर्णदुर्ग येथील प्रशासकीय कार्यालय दापोलीत हलविण्यात आले. इंग्रजांनी दापोलीत न्यायालय, रुग्णालय व वाचनालय सुरू केले. युरोपियनांकरिता येथे सेंट अ‍ॅड्रय़ूज चर्चची स्थापना करण्यात आली. गॉथिक शैलीचा उत्तम नमुना असलेल्या या चर्चचे बांधकाम १८१० मध्ये करण्यात आले. जांभा दगडात बांधकाम केलेल्या या चर्चला उंच मनोरा असून, सभागृहाच्या भिंतींना बाहेरून आधार देण्याकरिता तिरक्या दगडी भिंती बांधण्यात आल्या होत्या. खिडक्यांना नक्षीच्या
 
काचा बसविण्यात आल्या होत्या. या चर्चच्या मनोऱ्यावर सहा फूट उंचीची घंटा बसविण्यात आली होती. १८७८ मध्ये ‘चर्च ऑफ प्रापगेशन’ या संस्थेने येथे अनाथालय सुरू केले होते. नर्सरी रस्त्यावर केळसकर नाक्याजवळ असलेल्या या चर्चचा उपासनाविधी १९३८ मध्ये बंद करण्यात आला. गॉथिक वास्तुशैलीतील हे ऐतिहासिक चर्च आज भग्न अवस्थेत उभे आहे.
दापोलीपासून साधारण १२ किलोमीटरवर हर्णे हे लहान बंदर आहे. पूर्वी दळणवळणाच्या दृष्टीने या बंदराला फार महत्त्व होते. खडकाळ किनारा लाभलेल्या या बंदरात संरक्षणाच्या दृष्टीने मराठय़ांनी शिबंदी ठेवली होती. १८१८ मध्ये येथे इंग्रज सैन्याचा तळ उभारण्यात आला होता. आजही हर्णे बंदर मत्स्य व्यवसायाचे महत्त्वाचे केंद्र आहे. सप्टेंबर ते जून या कालावधीत येथे मासेबाजारात मोठी उलाढाल होते. दुपारी ४ ते ७ या दरम्यान भरणाऱ्या या बाजारात मासे खरेदीकरिता दूर अंतरावरून ग्राहक मोठी गर्दी करतात. समुद्रकिनाऱ्यावर पडावातून आलेले ताजे मासे, बैलगाडय़ांतून विक्रीच्या ठिकाणी आणले जातात. ग्राहकांच्या गर्दीतून मासे घेऊन येणाऱ्या या बैलगाडय़ांची धावपळ पाहण्यासारखी असते. या बाजारात विविध प्रकारचे मासे, खेकडे, कोळंबीची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. येथे माशांचे लिलाव होतात. हे मासे निर्यातही केले जातात. हर्णे बंदराच्या किनाऱ्यालगत कोळ्यांची व मुस्लिम लोकांची वस्ती आहे.
हर्णे बंदराच्या परिसरात सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, गोवा व फत्तेगड हे चार किल्ले आहेत. हर्णे बंदराच्या समोर समुद्रात बेटावर सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. बेटावरील खडक खोदून मधल्या उंचवटय़ावर हा किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याकडे नावेतून जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार सहजगत्या दृष्टिक्षेपात येत नाही. शिवकालातील किल्ल्याची ही खासियत आहे. चहूबाजूंनी तटबंदी असलेल्या या किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे असून, मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढच्या बाजूस बांधकामाचे भग्न अवशेष दृष्टीस पडतात. प्रवेशद्वाराच्या अतिरिक्त संरक्षणाच्या दृष्टीने हे बांधकाम करण्यात आले असावे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर मारुतीची मूर्ती असून, उंबऱ्याच्या अलीकडील पायऱ्यांवर कासव कोरलेले आहे. तटालगत कोरडे पडलेले तलाव व हौद आहेत. किल्ल्याच्या नैऋत्येकडील चिंचोळ्या भागातून कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा या किल्ल्यांचे दर्शन होते. विजापूरच्या आदिलशहाने १६६९ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम केले असावे. १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन तटबंदीची डागडुजी केली. मराठय़ांच्या नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचा तळ येथे होता. कान्होजीनंतर तुळाजी आंग्रे यांनी या सागरावर आपली हुकमत गाजवली. १७५५ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या आरमाराच्या मदतीने बाणकोट व सुवर्णदुर्ग किल्ल्यांवर हल्ला चढविला. सुवर्णदुर्गास २५ मार्च १८५५ मध्ये वेढा घालून १२ एप्रिलला किल्ला ताब्यात घेण्यात आला. इंग्रज-मराठा करारानुसार हा किल्ला कमोडोर जेम्स याने मराठय़ांच्या स्वाधीन केला. यशवंतराव होळकरांच्या पुणे हल्लाप्रसंगी १८०४ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने या किल्ल्यात काही काळ आश्रय घेतला होता. पेशव्यांच्या पराभवानंतर १८१८ मध्ये इंग्रजांनी सहजगत्या या किल्ल्यावर ताबा मिळविला. १८६२ मध्ये सुवर्णदुर्गाच्या तटबंदीची दुरुस्ती केल्याचा उल्लेख इंग्रजी साधनांमध्ये आढळतो. इंग्रजांनी येथून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात तळ हलविल्यानंतर या किल्ल्यातील वास्तूंची पडझड झाली. सध्या या किल्ल्याच्या परिसरात भग्नावस्थेतील वास्तूंचे अवशेष, बोरी-बाभळीची दाट झाडी याशिवाय येथे पाहण्यासारखे काही नाही. इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग अनुभवलेला सुवर्णदुर्ग आज मात्र संपूर्ण दुर्लक्षित अवस्थेत आहे.
हर्णे बंदराच्या समुद्रात शिरलेल्या खडकाळ भागात थोडीफार तटबंदी असलेला कनकदुर्ग हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्याकरिता पायऱ्या आहेत. या किल्ल्यावर हर्णे दीपगृह आहे. दीपगृहाच्या कर्मचाऱ्यांची येथे निवासस्थाने आहेत. हर्णे बंदराकडे जाताना वळणावर समुद्रकाठी गोवा किल्ला आहे. दोन एकर क्षेत्रफळ असलेला हा किल्ला उत्तर-पश्चिमेकडून समुद्राने वेढलेला आहे. १७५७ मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. पेशव्यांच्या पराभवानंतर १८१८ मध्ये इंग्रजांनी येथे तळ उभारला. इंग्रजांच्या काळात येथे जिल्हाधिकारी निवासस्थान व डाक बंगला होता. १८६२ च्या नोंदीनुसार या किल्ल्यावर ६९ निकामी तोफा असल्याचा उल्लेख आहे. या किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्राभिमुखी असून, उत्तरेकडे आहे. प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागाच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती असून, डाव्या बाजूस गंडभेरूंडाचे म्हणजे द्विमुखी गरुडाचे सहसा कुठेही न आढळणारे दुर्मीळ शिल्प आहे. कोकणातील सागरतिरावरील किल्ले इतिहासप्रेमींनी अवलोकन करावे असेच आहेत. या किल्ल्यांचा पर्यटनांच्या दृष्टीने विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.
दापोली तालुक्यातील आंजर्ले गावाला वृक्षराजी असलेला रम्य सागरी किनारा लाभलेला आहे. या गावच्या डोंगरावर कडय़ावरील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. या मंदिराविषयी अशी दंतकथा सांगतात की, आंजर्ले गावातील समुद्रकिनाऱ्यावरील खडकावर अजरालयेश्वराचे व गणपतीचे अशी दोन मंदिरे होती. समुद्राची पातळी वाढून ही मंदिरे पाण्यात बुडाल्यानंतर डोंगरावर सुरक्षित ठिकाणी सध्याचे श्री गणपती मंदिर बांधण्यात आले. इ. स. १४३० पासून येथे गणपती मंदिर असावे, असे म्हणतात. मूळ लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार १७७० मध्ये आंजल्र्याचे रामकृष्ण हरभट नित्सुरे यांच्या प्रयत्नांनी करण्यात आला. १७७० मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू होऊन १७८० मध्ये ते पूर्ण झाले. या मंदिराकरिता आर्थिक मदत पुण्यातील वासुदेव रघुनाथ घाणेकर, धारवाड येथील सुभेदार रघुनाथ कृष्ण भट व आंजर्ले, मुर्डी येथील धनिकांकडून गोळा करण्यात आली. या मंदिरासमोर असलेले तळे, सभोवतालची तटबंदी व शेजारी असलेले शिवमंदिर नंतरच्या काळात बांधले गेले असावे. या गणपती मंदिराचे बांधकाम स्थानिक जांभ्या दगडात केलेले असून, मंदिराला आतून बाहेरून सफाईदार गिलावा केलेला आहे. या मंदिराची लांबी १८ मीटर, रुंदी १३ मीटर असून, उंची २० मीटर आहे. या मंदिराच्या शिखरावर नक्षी व वेलबुट्टय़ा काढलेल्या आहेत, तसेच १६ उपकलश व अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत. गाभाऱ्यात नैसर्गिक प्रकाश येण्याकरिता शिखराजवळ झरोका आहे. गाभाऱ्यासमोरील सभागृहाच्या अंतर्गत गोलाकार छतावर पूर्वी रामायण- महाभारत व भागवतातील मराठा शैलीतील पौराणिक चित्रे चितारलेली होती. १९४५ पर्यंत ती चित्रे अस्तित्वात होती. येथील गाभाऱ्यातील व सभामंडपात असलेल्या कारंज्यांना वरच्या मजल्यावरून भिंतीमधून तांब्यांच्या नळ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. कालांतराने या तांब्यांच्या नळ्या निकामी झाल्यामुळे ही कारंजी बंद पडली.
या मंदिरातील गणेशाची मूर्ती पाऊण मीटर उंचीची असून, सिंहासनावर बसलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस चवऱ्या ढाळणाऱ्या ऋद्धी-सिद्धी आहेत. गणेशाच्या पोटाभोवती नाग असून, हातात परशू व अंकुश ही शस्त्रे आहेत. मागे प्रभावळ आहे. मूर्ती, सिंहासन व प्रभावळ काळ्या बेसाल्ट दगडातील आहे. याचे कोरीव काम अप्रतिम आहे. गणेशाची कोरीव मूर्ती दाभोळच्या धोंडू पाथरवटाने घडविलेली आहे. गणेशाचे रूप प्रसन्न असून, खिळवून ठेवणारे आहे. कडय़ावरील गणपती भक्तांची मनोकामना पूर्ण करतो अशी येथे येणाऱ्या असंख्य भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिराचा दुसऱ्यांदा जीर्णोद्धार १९९० मध्ये करण्यात आला. या वेळी भिंती, छत, कळस व अंतर्गत भागात अत्याधुनिक बांधकाम तंत्रानुसार दुरुस्ती करण्यात आली. येथे येणाऱ्या भाविकांची सोय भक्तिधाम बांधून करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या आवारात प्राचीन दीपमाळ आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ असे की, येथील आवारात सहाशे वर्षांपूर्वीचे जाड बुंध्याचे बकुल वृक्ष आहेत. या मंदिराशेजारी काळ्या दगडात बांधलेले लहान शिवमंदिर असून, मंदिरातील काळ्या दगडातील शिवलिंग कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. अनेकविध वृक्षांनी वेढलेल्या या डोंगरावरून सिंधुसागरातील सुवर्णदुर्गाचे विहंगम दर्शन होते. अस्सल कोकणातील निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर कडय़ावरचे गणपती मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे. दापोलीहून बसमार्गे हर्णे व आंजर्ले येथे जाता येते. नारळी-सुपारीच्या दाट बागा, लांबच लांब पसरलेले स्वच्छ रमणीय समुद्रकिनारे यामुळे दापोली परिसरातील किल्ले व मंदिरांचे अवलोकन एक वेगळीच अनुभूती देऊन जाते.
sambhajibhosale@yahoo.co.in