Leading International Marathi News Daily
रविवार , १५ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

रवींद्र पाथरे
कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी
वृद्ध नाटय़कलावंतांच्या मानधनात घसघशीत वाढ (आतापेक्षा दुप्पट मानधन), गरजू कलावंतांच्या गृहयोजनेस भूखंड देण्याचा निर्णय महिनाभरात, सांस्कृतिक कार्य विभागासाठी प्रतिवर्षी ५० कोटी रु.ची तरतूद, कलावंतांसाठी सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा देण्याकरिता स्वतंत्र इस्पितळ उभारण्यासंदर्भात चर्चेची तयारी, तसेच बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य शासनातर्फे पाठपुरावा करून २०० कोटी रु.च्या या प्रकल्पातील राज्याचा हिस्सा अग्रक्रमाने देण्याची घोषणा.. अशा चौफेर आश्वासनांची आणि घोषणांची खैरात करीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत आणि बीडवासीय या दोघांनाही येथे भरलेल्या ८९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात खूश केले. बीड येथे भरलेल्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्या वेळी ते बोलत होते. राजकारण्यांचे संपूर्ण वर्चस्व असलेल्या या संमेलनात ऐनवेळी अर्धाडझन मंत्री अनुपस्थित राहिले. हिंदी चित्रसृष्टीतील तारे-तारकांना संमेलनास आणण्याचे संयोजकांचे प्रयत्न तोकडे पडल्याने सामान्य रसिकांचा थोडासा विरस झाला, तरी बीडच्या सुपुत्राने- अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी खास मायबोलीत केलेल्या खुमासदार आणि हृद्य भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. वर्तमान नाटय़संमेलनाध्यक्ष रमेश देव यांची तब्येत अचानक बिघडल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवे संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द करण्यात आली; परंतु दुपारी पाऊणच्या सुमारास रमेश देव अकस्मात संमेलनस्थळी आल्याने पुनश्च एकदा संमेलनाध्यक्षपदाचा पदभार सुपुर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला.

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन
साहित्यापेक्षा मनोरंजनावर भर!

प्रवीण बर्दापूरकर, सॅन होजे, १४ फेब्रुवारी

उद्योग-व्यवसायानिमित्त अमेरिकेत वसलेल्या मराठी माणसांचे पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वप्न साकार होणार असून काही क्षणातच तुतारी वाजणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आवडत्या मराठी लेखक-कलावंतांच्या भेटीचा योग बे-एरियाच्या तरुणांनी जुळवून आणला आहे. या धाडसामागे साहित्यकारणापेक्षा मनोरंजनाचीच उर्मी अधिक आहे आणि त्याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पडल्याचे दिसते. मिलपिटासच्या या परिसरात पहावे तिकडे कसे उल्हासाचे वातावरण आहे! सॅन होजेचे घडय़ाळ भारतापेक्षा जवळपास १३ तास ३० मिनिटांनी मागे आहे. भारतीय गाढ झोपेत असतील तेव्हा येथे भल्या सकाळी उद्घाटनाचा सोहळा रंगलेला असेल. आवडत्या लेखक-कवींचे येथील मराठी माणसाला अप्रुप आहेच; सोबतच पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री अश्विनी भावे, अभिनेता प्रशांत दामले, संगीतकार-गीतकार सलील कुळकर्णी, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ ही स्टार मंडळीही आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत. येथील तरुण पिढीला त्यांच्या आवडत्या कलावंतांना, लेखकांना ऐकायचे-पहायचे तर आहेच पण, त्याहीपेक्षा बडय़ा मंडळींपुढे स्वत:च्या कलागुणांचे प्रदर्शन मांडून पाहुण्यांकडून वाहव्वासुद्धा मिळवायची आहे. त्यासाठीच तर गेल्या सहा महिन्यांपासून व्हालेंटियर्स खपत आहेत. या काळात तो उत्साह अधिक दुणावल्याचे दिसते. नियोजनाचा पसारा या तरुणांना तितकाचा सावरता आलेला नसला तरी त्याची उणीव त्यांनी परस्परात उत्साह वाटून भरून काढली आहे.

हौसेला मोल नसते! विश्व मराठी साहित्य संमेलन
प्रवीण बर्दापूरकर, सॅन होजे, १४ फेब्रुवारी

वर्षांनुवर्षांपासून कामधंद्यानिमित्त सातासमुद्रपार दूर अमेरिकेत वसलेल्या आपल्या माणसांनी चक्क मराठी साहित्य संमेलनाचा हट्ट धरला तेव्हा अनेकांनी त्यांना वेडय़ात काढले होते पण, हेच वेड पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचून गेले आहे. संमेलनात सहभागी होणारे निमंत्रित आणि प्रतिनिधींनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हा बे-एरियाच्या मराठमोळ्या तरुण पिढीने त्यांचे मोठय़ा आतिथ्यशीलतेने स्वागत करून हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय आज दिला. उत्सुकता, वादग्रस्तता आणि नवलाईच्या रंगांनी भारलेल्या या क्षणांची मराठी मनाला प्रतीक्षाच होती. मिलपिटास येथील इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन साजरे होणार असून आज कॅफे पॅसिफिक, एमिरत आणि कोरियनच्या विमानांनी भारतातील मंडळी सॅन होजेला पोहोचली तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या संमेलनाचा अट्टहास धरणारे आणि गेल्या सहा महिन्यांपासून राबणारे संयोजक संदीप देवकुळे यांचा उत्साह तर बघण्यासारखा होता.

चौघडे आणि तुताऱ्यांच्या निनादात नाटय़दिंडीचे जोरदार स्वागत
बीड, १४ फेब्रुवारी/वार्ताहर

पडदा उघडला आणि चौघडे आणि तुताऱ्यांच्या निनादात हत्ती, घोडे, उंटासह नाटय़दिंडीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रांगोळी, जागोजागी औक्षण, देशभक्तीपर गीतांच्या गजरात विविध शाळांतील मुले आणि देखाव्यांनी नाटय़दिंडी मार्गस्थ झाली त्यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन स्वागत करीत सामील झाले.बीड शहरात शनिवारी सकाळी ८.३० वा. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावरून नाटय़दिंडीला सुरुवात झाली. संकुलाच्या प्रवेशद्वाराचा पडदा उघडताच ढोल, ताशा, तुताऱ्यांच्या निनादात वाद्यांच्या गलबलाटात नाटय़ संमेलन अध्यक्ष रामदास कामत यांनी श्रीफळ वाढवून आणि नटराजची मूर्ती असलेली पालखी उचलली. रामदास कामत, परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, कार्याध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, दीपा क्षीरसागर, दिलीप प्रभावळकर, स्मिता तळवलकर यांच्या समवेत दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीसमोर एक हत्ती, पाच घोडे, पाच उंट त्याचबरोबर विविध शाळांतील मुलींचे लेझिम पथक, पाच देखाव्यांच्या गाडय़ा तर शाळा

बीड नाटय़संमेलनात मुख्यमंत्र्यांची खैरात
रवींद्र पाथरे, कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

नाटय़ परिषदेने जे जे प्रश्न शासनासमोर मांडले, ते ते सोडविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केले. भविष्यातही करू; परंतु नाटय़कलावंतांनीही मुंबई-पुण्याच्या पलीकडे असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील सामान्य रसिकांची सांस्कृतिक आणि कलात्मक भूक भागविण्यासाठी आपली कला त्यांच्यासमोर सादर करायला हवी. त्यासाठी जिल्हा पातळीवर नाटय़गृहे आणि तालुका पातळीवर अ‍ॅम्पी थिएटर बांधण्याचा शासनाचा संकल्प आम्ही जोमाने राबवीत आहोत. तेव्हा कलावंतांनीही पुढे येऊन आम्हा रसिकांची कलेची भूक भागविली पाहिजे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नाटय़कलावंतांची अत्यल्प उपस्थिती असलेल्या ८९व्या नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास बीडवासीयांनी तुडुंब गर्दी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

‘म्युझिकल ड्रामा स्कूल’ हवे! -रामदास कामत
कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड) १४ फेब्रुवारी / नाटय़-प्रतिनिधी
आज संपूर्ण मरगळ आलेल्या संगीत रंगभूमीला संजीवनी देऊन तिचे पुनरुज्जीवन करावयाचे असेल तर दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या (ठरऊ)धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय पातळीवर ‘स्कूल ऑफ म्युझिकल ड्रामा’ (रटऊ)स्थापन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण व्यवसायाभिमुख असेल तरच विद्यार्थ्यांचा त्याकडे ओढा असतो, ही बाब ध्यानी घेऊन या म्युझिकल ड्रामा स्कूलमधल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक रंगमंडळ (रेपर्टरी) उभारावी आणि या रंगमंडळातर्फे गुणी विद्यार्थ्यांकरवी जुन्या-नव्या सुविहित संगीत नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही करावेत, अशी सूचना ८९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली.

‘व्यावसायिक रंगभूमी जगविण्याची जबाबदारी सर्वाचीच’
कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

व्यावसायिक रंगभूमी जगविण्याची, ती प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी केवळ प्रेक्षकांची- कलावंतांची नसून, सर्वच घटकांची आहे. अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या पहिल्या दिवसातील एकमेव परिसंवादामध्ये सर्वच वक्तयांनी असा सूर लावला. मुख्य सभामंडपातील आद्यकवी मुकुंदराज रंगमंचावर आज सायंकाळी ‘व्यावसायिक रंगभूमी जगविण्यासाठी प्रेक्षक व कलावंतांची जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले. अजय अंबेकर, जयंत पवार, राम रानडे, अशोक पाटोळ, दिलीप शेंडे, प्रा. शशिकांत चौधरी, शिवराम कुलकर्णी, किशोर फुले, बापू लिमये सहभागी झाले होते.

‘माणसाच्या समाधानासाठी मनाला, आत्म्याला सुखावणाऱ्या गोष्टी हव्यात’
बीड, १४ फेब्रुवारी/वार्ताहर

अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या भाषणाचा संपादित भाग.. जग ही रंगभूमी आहे आणि आपण सारे त्यातील कलावंत आहोत आणि तो जगन्नियंता दिग्दर्शक आहे, अशा अर्थाचे भाष्य शेक्सपीअर या महान नाटककाराने केले आहे. त्या भाष्याप्रमाणे राजकारण नावाच्या नाटकात गेली ३०-३५ वर्षे विविध भूमिका पार पाडीत असताना अनेकांशी जवळचे नाते निर्माण झाले.

मकरंद अनासपुरेच्या ‘गोष्टी गावाकडील..’
सतीश कुलकर्णी, केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या शानदार उद्घाटनासाठी जमलेल्या हजारो रसिकांना आज जिंकले अभिनेता मकरंद अनासपुरे याने! उद्घाटनाच्या या सोहळ्यात बाजी मारून गेला तो बीडचा हा सुपुत्रच! ‘‘माझ्यावर अभिनयाचे संस्कार झाले ते याच आणि याच मातीतून,’’ असी कृतज्ञता व्यक्त करीत मकरंदने ‘गोष्टी गावाकडील मी वदता गडय़ा रे’ असाच सूर लावला. त्यात हळवेपण होते, कृतकृत्यतेची भावना होती, गावाबद्दल आणि गाववाल्यांबद्दल ओसंडून वाहणारे प्रेमही होते. ‘‘आज एक परिक्रमा पूर्ण झाली,’’ अशी सुरुवात करून मकरंद म्हणाला, ‘‘चंपावती शाळेचा, बलभीम कॉलेजचा मी विद्यार्थी. तेथेच अभिनयाचे धडे गिरविले. या गावातून १९९० मध्ये मी मुंबईस जाण्यासाठी निघालो. तेथे स्थिरावलो. नायक बनण्यासाठी एक तप लागलं. बीडमध्ये, मुंबईमध्ये भेटलेल्या माणसांनी मला समृद्ध केले, याचे मला भान आहे.’’ ‘‘माझी भाषा तशीच राहिली; तीच राहिली. भारतातून ‘इंडिया’मध्ये गेल्यावर ती बदलली नाही. गावाची, मातीची भाषा सोडण्यात फार शहाणपण नाही, हे उमगलेला मी माणूस आहे,’’ असे भावनोत्कट उद्गार मकरंदने काढले आणि बीडकरांनी त्याला समरसून दाद दिली. ‘‘या मातीचं प्रेम माझ्यावर आहे. माझे पाय जमिनीवर आहेत; ते तसेच राहोत,’’ अशीही भावना त्याने व्यक्त केली. त्याच्या १३ मिनिटांच्या भाषणात किस्से होते, धडपडीची कहाणी होती, गमती होत्या आणि होता मराठवाडी मातीचा सार्थ अभिमान!

नाटय़ संमेलनात आज ‘उंच माझा झोका’
लातूर, १४ फेब्रुवारी/वार्ताहर

बीड येथे होणाऱ्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनात लातूर येथील सूर्योदय सांस्कृतिक कला मंचची अ‍ॅड्. शैलेश गोजमगुंडे लिखित मराठी एकांकिका ‘उंच माझा झोका गं!’चा प्रयोग उद्या (रविवार) सायं. ४ वा. यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल येथे होणार आहे. दर संमेलनात अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध स्पर्धामध्ये विजेत्या एकांकिकांपैकी निवडक एकांकिकांचे प्रयोग सादर होत असतात. यात लातूरच्या ‘उंच माझा झोका गं!’ या नाटकाचा समावेश आहे. या एकांकिकेचे लेखन-दिग्दर्शन शैलेश गोजमगुंडे यांनी केले असून प्रकाशयोजना संजय अयाचित, सुधीर राजहंस, नेपथ्य लक्ष्मण वासमोडे, संगीत राजकुमार गोजमगुंडे यांनी, तर प्रमुख भूमिका वैभवी सबनीस, जान्हवी सबनीस, संतोष साळुंके, रेश्मा माने, बालाजी सूळ, बालाजी शेळके, गोविंद जोशी, दीपक गायकवाड, शिल्पा जाधव, प्रिया जाधव आदींनी साकारल्या आहेत.

‘व्हॅलेंटाइन डे’ ठरला प्रेमींसाठी यातना दिन..
नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

शनिवारचा ‘व्हॅलेंटाइन डे’ देशभरातील प्रेमी युवक-युवतींसाठी यातना देणारा दिवस ठरला असून पोलिसांनी या दिनाला विरोध करणाऱ्या अनेक शिवसैनिक, श्रीराम सैनिक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. उज्जनमध्ये प्रेमी युवकांच्या जोडप्याला मारहाण झाली असून हरियाणामध्ये पोलिसानेच काही तरुण-तरुणींना मारहाण करण्याचा प्रकार घडला. पुण्यामध्ये एका पार्कमध्ये बसलेल्या दोघा प्रेमी जोडप्यांचे शिवसैनिकांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले असून खडकवासला धरणाजवळील पार्कमध्ये हा प्रकार घडला. उज्जनमध्ये विक्रम विद्यापीठाच्या भावा-बहिणीला छळणाऱ्या बजरंग दलाच्या चौघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र दलाने हे चौघे त्यांचे कार्यकर्ते असल्याचा इन्कार केला आहे.

पाकिस्तानात तालिबान्यांची मोठी संख्या; अध्यक्ष झरदारींचीच कबुली
न्यूयॉर्क, १४ फेब्रुवारी/पीटीआय

पाकिस्तानात तालिबानी अतिरेकी मोठय़ा प्रमाणावर असून आमचे सरकार तसेच संपूर्ण देशच आज अस्तित्वाची लढाई लढत आहे, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीच दिली आहे. अमेरिकेतील ‘सीबीएस टीव्ही नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत झरदारी यांनी ही कबुली दिली. तालिबानी एकेकाळी अफगाणिस्तानला लागून असलेल्या डोंगराळ भागातच सीमित होते. तेथून ते अफगाणिस्तानातील अमेरिकाप्रणीत फौजांवर हल्ले चढवित असत. मात्र आता त्यांनी आपला प्रभाव हळूहळू पेशावर, स्वात खोरे इथेही वाढवला आहे. त्यांचे प्रभावक्षेत्र वाढत असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.

कसाबला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तान करणार?
इस्लामाबाद, १४ फेब्रुवारी/पीटीआय

मुंबईवरील हल्ल्यात भारताच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी अजमल अमिर कसाब याला तपासासाठी आपल्या ताब्यात द्या, अशी मागणी कदाचित आम्ही करू, अशी शक्यता पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली. मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी तशी मागणी केली आणि पाकिस्तानी न्यायालयानेही त्याला हजर करण्याचा आदेश दिला तर आम्ही कसाबला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी भारताकडे करू, असे गृहमंत्री रहमान मलिक यांनी आज सांगितले. यासंदर्भात पुढे काय होईल, याविषयी आताच काही सांगणे घाईचे ठरेल. मात्र एखाद्या व्यक्तीचे नाव ‘एफआयआर’मध्ये असेल तर तपासासाठी तो ताब्यात असणे आवश्यक असते, असे त्यांनी सांगितले. गेल्या गुरुवारी पाकिस्तानने मुंबई हल्ल्यांसंदर्भात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एकूण नऊजणांची नावे घेतली असून त्यात कसाबचेही नाव आहे. कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे या वेळी प्रथमच पाकिस्तानने मान्य केले आहे.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची युती काँग्रेसशीच
नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

आगामी निवडणुकांमध्ये रिपाइं आणि समाजवादी पक्षासाठी पाच जागा सोडून उरलेल्या जागा आध्र्या-आध्र्या वाटून घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसपक्षासमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही नसली तरी वाटाघाटीद्वारे त्यावर तोडगा काढण्यात येईल, मात्र निवडणुकीत काँग्रेसबरोबरच युती राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज स्पष्ट करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आर.आर. पाटील, छगन भुजबळ,सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. या बैठकीत रिपाइंच्या (गवई, आठवले, आंबेडकर, कुंभारे-कवाडे) चार आणि समाजवादी पक्ष अशा पाच जागा सोडून उरलेल्या निम्म्या वाटून घेऊ असा प्रस्ताव काँग्रेसकडे ठेवण्यात आल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत अधिक चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रस्तावावर वाटाघाटींद्वारे तोडगा काढला जाईल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबतच युती करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८