Leading International Marathi News Daily
रविवार, १५ फेब्रुवारी २००९

प्रश्नांतून सुटका होईल
रवी-शनी समोरासमोर असल्याने अधिकारापासून आरोग्यापर्यंत छोटे-मोठे प्रश्न मेष व्यक्तींसमोर उभे राहतील. दशमातील गुरू व मंगळाच्या आधाराने अन्यायाचा यशस्वी प्रतिकार करून शनिवारच्या चंद्र-शनी नवपंचम योगापर्यंत काही प्रश्नांतून सुटका करून घेता येईल. संयम, सत्य, शिस्त याच अस्त्रांनी सामना यशस्वी करता येईल.
दिनांक : १५, १६, १९, २० शुभकाळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश मिळेल.

प्रभावी यश लाभेल
भाग्यात गुरू, दशमात सूर्य, मीन शुक्र यांना कुशलता, शिकस्तीचे प्रयत्न यांची साथ दिली तर प्रभाव प्रस्थापित करणारं यश मिळवता येईल. त्यातून चतुर्थातील शनीच्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवू शकाल. महत्त्वाची प्रकरणे बुधवारच्या शुक्र-मंगळ शुभयोगाच्या आसपास मार्गी लावता येतील. शनिवारच्या चंद्र-हर्षल शुभयोगापर्यंत शोधकार्यात सफलता मिळवता येऊ शकेल.
दिनांक : १७, १८, २१ शुभकाळ.
महिलांना : पुढे चला, प्रगती होईल.

यशाबाबत संशय निर्माण होईल
अष्टमात गुरू, राहू, मंगळ आणि रवी, शनी समोरासमोर. अशा ग्रहकाळात अटीतटीचा सामना करूनही यश संशयास्पदच राहते. परंतु प्रतिष्ठा धोक्यात सापडणार नाही. अवास्तव साहस टाळले तर नियमित उपक्रम व्यवस्थित सुरू ठेवता येतील. शब्द, आश्वासन, शक्ती यांच्यापेक्षा कल्पकतेचा उपयोग केला तर नवीन समस्यांचा समावेश रोखता येईल. न्यायालयात मात्र सतर्क राहा. प्रकृतीची पथ्यं मोडू नका.
दिनांक : १५, १६, १९, २० शुभकाळ.
महिलांना : झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या.

सीमारेषा सांभाळा
सप्तमात गुरू-राहू, बुधवारचा शुक्र-मंगळ शुभयोग यातूनच कार्यभाग साधणारं तंत्र यशस्वी ठरणार आहे. साडेसातीची प्रखरता मारुतीची उपासना-आराधना कमी करू शकेल. भाग्यातील शुक्र प्रपंच आणि प्राप्तीमध्ये खूपच उपयुक्त ठरणार आहे. रवी-शनी प्रतियोग सुरू असेपर्यंत प्रकृती आणि प्रतिष्ठा यांच्यासंदर्भातील सीमारेषा सांभाळणं आवश्यक राहील. दुसऱ्यावर विसंबून कृती करू नका. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा.
दिनांक : १७, १८, २१ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा, प्रश्न सुटतील.

संशयाची व्याप्ती वाढेल
सिंह व्यक्तीच्या कार्यवर्तुळात नव्या समस्या, नव्या अडचणी सातत्याने प्रवेश करीत असल्याने सफलतेपेक्षा संशयाचीच व्याप्ती वाढत आहे. सप्तमात रवी, षष्ठात मंगळ यांच्यामुळे शत्रूंची आक्रमणे इभ्रतीच्या वस्त्रापर्यंत पोहोचणार नसल्याने शनिवारच्या चंद्र-हर्षल शुभयोगापर्यंत कार्यचक्र आपणाला व्यवस्थित फिरवत ठेवता येणार आहे. दुसऱ्यावर विसंबून कार्यक्रम तयार करू नका. अशुभ काळ हळूहळू मागे पडेल.
दिनांक १५, १६, १९, २० शुभकाळ.
महिलांना : वाद टाळा, प्रकृती सांभाळा.

स्पर्धेत प्रयत्नांची निकड
साडेसाती आणि पंचमात बुध-गुरू यामध्ये शुक्र-मंगळाचा शुभयोग आहो. अशा स्पर्धेत निर्णयात्मक यशासाठी थोडे प्रयत्न व हुशारी यांचीच आवश्यकता असते. शनिवारच्या चंद्र-हर्षल शुभयोगापर्यंत मजल-दरमजल करीत अपेक्षित यशापर्यंत आपण पोहोचू शकाल. व्यापारपेठ, राजकारण, कला व साहित्य विभाग यांचा त्यात समावेश राहील. आरोग्याच्या तक्रारींनी यात अडथळे आणू नयेत याची फक्त काळजी घ्यावी.
दिनांक : १५ ते १८ शुभकाळ.
महिलांना : कृती करा, यश मिळेल.

काडीचा आधारही उपयोगी
पंचमात सूर्य, लाभात शनी याचा आधार काडीचा पण अनिष्ट राहू, गुरू, मंगळ यांच्याशी सामना करताना उपयुक्त ठरेल. महत्त्वाची प्रकरणे त्यामुळेच सांभाळता येतील. शुक्र मंगळाचा शुभयोग मलमपट्टी करणारा योग हुशारीने उपयोगात आणला तर प्रापंचिक, आर्थिक तणाव नियंत्रणात आणता येतील. साहस, आश्वासनं, प्रलोभनं यापासून कटाक्षाने दूर राहा. शासकीय नियम सांभाळा, अनिष्टता कमी होत राहील.
दिनांक : १५ ते १९ चंद्रभ्रमण उत्साह देत राहील.
महिलांना : धोका स्वीकारू नका, साहस टाळा, गाडी रुळावर राहील.

प्रभाव वाढत राहील
पराक्रमी गुरू, राहू पंचमात शुक्र आणि शुक्र-मंगळाचा शुभयोग यांच्यातून वृश्चिक व्यक्तींचा प्रभाव वाढतच राहणार आहे. राजकारण, कला, साहित्य, विज्ञान यामध्ये त्याचा प्रत्यय शनिवारच्या चंद्र-हर्षल शुभयोगापर्यंत येतच राहणार आहे. प्रवास होतील. मंगलकार्य ठरावे, व्यापारी सौदे पैसा देतील. रवी, शनी समोरासमोर आहेत. प्रपंच आणि आरोग्य या संबंधात सतर्क राहणे योग्य ठरेल.
दिनांक : १७ ते २० शुभकाळ.
महिलांना : तुमची कृती प्रभावी ठरेल, परिश्रमाचा आनंद मिळेल.

श्रेष्ठत्व सिद्ध होईल
राशिस्थानी बुध, गुरू पराक्रमी, सूर्य मीन, शुक्र भाग्यात, शनी देव द्यायला लागले म्हणजे कोठून कोठून देतील याचा अंदाज येत नाही. कुशलता, परिश्रम, अचूक निर्णय, बिनचूक कार्यपत्रक यातून श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सफलता मिळवता येईल. त्यामुळे व्यापारात भरभराट होईल. बढती- बदलीचे निश्चित होईल. जागेचा प्रश्न सुटेल. मंगलकार्ये ठरतील. प्रवास ठरवाल. कलासाहित्यात आघाडीवर राहाल, प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष नको.
दिनांक : १५, १६, १९, २० शुभकाळ.
महिलांना : अपेक्षा पूर्ण होतील. समाजकार्यात आनंद मिळेल.

कराल ती पूर्व
मकर राशीत मंगळ, पराक्रमी शुक्र राशिस्थानी बुध, गुरू आणि शुक्र, मंगळाच्या सहयोग प्रयत्नाचे सोने या वाक्प्रचाराचा प्रत्यय अशाच ग्रहकाळात येत असतो. शनिवारच्या चंद्र- हर्षल शुभयोगापर्यंत काही कार्यप्रांतात चमत्काराचाही संभव आहे. प्रवास होतील. शुभकार्ये ठरतील. व्यापारात पैसा मिळेल. उधारी वसूल कराल. नव्या करारातून साहित्य-कला प्रांतात झकास जम बसणार आहे. अष्टमातील शनीची सध्या तरी धास्ती नको, अधिकाराचा उपयोग मात्र जपून करा. आरोग्याची काळजी घ्यावी.
दिनांक : १५ ते १८ शुभकाळ.
महिलांना : संधीचा फायदा घ्या.

प्रवास सुरक्षित होईल
कुंभ व्यक्तींच्या कार्यप्रांतात व्ययस्थ राहू, मंगळ यांनी अनेक प्रश्नांची गर्दी तयार केली आहे. प्रपंचापासून प्राप्तीपर्यंतचे बरेच विभाग त्यात समाविष्ट असतील. राशिस्थानचा सूर्य प्रतिष्ठा सांभाळील. मीन, शुक्र निराश होऊ देणार नाही. सप्तमातला शनी प्रयत्नाला वेग देत असतो. याच समीकरणातून कुंभ व्यक्तींना शनिवारच्या चंद्र-हर्षल शुभयोगापर्यंत प्रवास सुरक्षित सुरू ठेवता येईल. अचूक निदान होईपर्यंत कोणालाही आश्वासन देऊ नका. उगाचच चिंता करू नका.
दिनांक : १६ ते २१ प्रयत्नाने यश.
महिलांना : निराश होऊ नका, पुढे चलत राहा.

आगेकूच सुरू राहील
राशिस्थानी शुक्र, लाभात बुध, गुरू आणि शुक्र-मंगळाचा शुभयोग मीन व्यक्तींची आगेकूच वेगवान व्हावी, अशी ग्रहस्थिती आहे. त्यामध्ये अनिष्ट शनी, रवीने अडथळे आणू नयेत म्हणून सतर्क राहून निर्णय घेतले, कृती केली तर शनिवारच्या चंद्र-हर्षल शुभयोगापर्यंत कार्यपत्रकात बदल करण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रापंचिक प्रश्न सुटतील. अचानक पैसा मिळेल, समाजकार्याचे नेतृत्व मिळेल, नोकरीतल्या समस्या सोडविण्यासाठी मात्र कष्ट घ्यावे लागतील.
दिनांक : १८ ते २१ शुभकाळ.
महिलांना : निर्धार हाच नेत्रदीपक यशाचा मंत्र.