Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

मी मराठी मुलगा आहे..मला त्याचा गर्व आहे- जॉन अब्राहम
इस्लामपूर, १६ फेब्रुवारी / वार्ताहर

‘‘मी मराठी मुलगा आहे.. याचा मला गर्व आहे..’’ असं तो चक्क मराठीतच म्हणाला व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला..! तो आला.. भव्य दिव्य.. स्वप्नवत वाटाव्या अशा व्यासपीठावर.. आला! निळा शर्ट.. बाह्य़ा आखडलेल्या.. काळी पॅन्ट.. उंचापुरा.. तिरक्या नजरेनं पाहत.. मान वाकडी करीत व हात पुढे करून हाताचा अंगठा दाखवित.. अगदी त्याच्या स्वतच्या ‘स्टाइल’मध्ये तो आला..! व तमाम तरुणाईला आपल्या स्टाइलने वेड लावणारा तो.. मनस्वी आनंद देऊन गेला..! तोच तो हिंदी सिनेसृष्टीतील स्टाइल आयकॉन.. जॉन अब्राहम..!!

अपहृत मुलगा सुखरूप
कोल्हापूर, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी करवीर तालुक्यातील उचगाव येथून पळवून नेलेला राज दीपक पवार हा पाच वर्षे वयाचा मुलगा मिरज बसस्थानकावर सुखरूप सापडल्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी आज सुटकेचा निश्वास सोडला. राजला सुखरूप पाहून त्याच्या माता-पित्यांना आनंदाश्रू आले. राजला खंडणीसाठी मोटरसायकलवरून पळवून नेणाऱ्या अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अद्याप यश आलेले नाही. उचगाव पूर्व भागात असलेल्या हॉटेल संदीपच्या पिछाडीस दीपक विष्णू पवार यांचे किराणा माल व बेकरीचे दुकान आहे.

चिमुरडय़ाला पाहताच तिच्या डोळ्यात तरळले अश्रू!
सांगली, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वेळ सकाळी नऊची..! पोलिस मुख्यालयातील अधीक्षकांच्या कार्यालयासमोर झालेली मोठी वर्दळ.. अशातच एक तरुण जोडपे अधीक्षकांच्या केबिनकडे झपाझप पावले टाकत निघालेले.. पण ना त्यांच्या चालण्यात त्राण होता.. ना अंगात जीव! गेल्या तीन दिवसांपासून आपल्या लाडक्याच्या अपहरणामुळे या जोडप्याला अन्न-पाणीही गोड लागलेले नव्हते.. पोलिस अधीक्षकांच्या केबिनचा दरवाजा उघडताच कृष्णप्रकाश यांच्या मांडीवर बसलेल्या पाच वर्षांच्या आपल्या चिमुरडय़ाला पाहताच त्याच्या माउलीच्या डोळ्यात अश्रू तरळले.. त्या चिमुरडय़ाला आपल्या कुशीत घेत त्याच्यावर मायेचा वर्षांव केला.. हे पाहून उपस्थित पोलिस अधीक्षकांसह सर्वचजणांचे डोळे पाणावले..!!

देशात आघाडी सरकारची शक्यता : आंबेडकर
सातारा, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येत्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात काँग्रेस अथवा भाजप नेतृत्वाखालील सरकारऐवजी संयुक्त पक्षांचे सरकार सत्तेवर येण्याचीच जास्त शक्यता आहे. तीसपेक्षा जास्त खासदार येणारे सर्वच पक्ष पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शरद पवारांना आडवळणाचे राजकारण सोडून, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्रातल्या सर्व जागा लढवून दावेदार बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भारिप बहुजन सेक्युलर फ्रंट राज्यातील सर्व ४८ जागा लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
देशातील राजकीय व्यवस्था अस्थिर करण्यास काँग्रेस व भाजप जबाबदार आहे. त्यांनी फक्त सर्वाचेच हित जपले असल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

पालिका अभियंत्यास आधार संस्थेतर्फे घेराव
इचलकरंजी, १६ फेब्रुवारी / वार्ताहर

शांतीनगरमधील मुस्लिम कब्रस्तानला ओढय़ाच्या बाजूने संरक्षक भिंत आणि स्मशानभूमीत पत्र्याचे शेड उभे करावे, या मागणीसाठी पालिकेचे अभियंता सूर्यकांत कोरे यांनी आधार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने तासभर घेराव घालण्यात आला. बांधकाम समितीचे सभापती रवि रजपुते यांनी या निविदा ताबडतोब काढून योग्य ती तजवीज केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर घेराव उठविण्यात आला.शांतीनगरमधील मुस्लिम कब्रस्तानलगत काळा ओढा आहे. संरक्षक भिंत नसल्याने नजीकच्या पावसाळय़ात ओढय़ास येणाऱ्या पुराच्या पाण्याने कब्रस्तानची ढासळणारी माती धुऊन गेल्याने काही कबरी उघडय़ा पडण्याचा धोका आहे म्हणून पालिकेने संरक्षक भिंत बांधून द्यावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला तरी नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे म्हणून आधार बहुद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अभियंता कोरे यांना स्मशानभूमीतच बोलावून त्यांना घेराव घातला.दरम्यान ही माहिती दूरध्वनीवरून बांधकाम सभापती रजपुते यांना दिली. रजपुते व प्रभारी नगरअभियंता के. वाय. चव्हाण घटनास्थळी आले. त्यांनी पाहणी केली तेव्हा तौफिक मुजावर, लतीफ गैबाज, फारूख बागवान, मेहबूब मुजावर आदींनी माहिती दिली. संरक्षक भिंत व पत्र्याची शेड यासाठी ताबडतोब निविदा मागविण्यात येईल. तसेच स्मशानभूमीत असलेल्या खडकाळ जमिनीतील खडक बाजूला टाकून त्या ठिकाणी माती टाकण्यात येईल, असेही रजपुते यांनी सांगितले.

‘गुड मॉर्निग’ पथकाकडून कारवाई
मिरज, १६ फेब्रुवारी / वार्ताहर

निर्मल तालुक्यासाठी मिरज पंचायत समितीच्या ‘गुड मॉर्निग’ पथकाने २० गावांत १५० जणांवर कारवाई केली. या पथकाच्या कारवाईत जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती कांचन पाटील यांच्या भोसे गावातील १३ जणांचा समावेश आहे. मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविस्तार अधिकारी डी. आर. गुरव व सचिन भोसले यांच्यासह पाचजणांच्या एका पथकाने भोसे, कांचनपूर, सावळी, म्हैसाळ, गुंडेवाडी, तानंग, कळंबी, कर्नाळ व पद्माळे आदी २० गावांत ही कारवाई केली. सकाळी उघडय़ावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.

राज्य मैदानी स्पर्धेत दोन खेळाडू चमकले
सांगली, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सूरज राजू भोसले व प्रथमेश दीपक भगाटे या खेळाडूंनी पुणे येथे झालेल्या राज्य मैदानी सब ज्युनिअर स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. सूरज भोसले याने १४ वर्षांखालील गटात लांब उडी या खेळप्रकारात ५.३६ मीटर उडी मारून दुसरा क्रमांक मिळविला. तो येथील सांगली हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे. यापूर्वी त्याने सातारा येथे झालेल्या शालेय विभागीय क्रीडा मैदानी स्पर्धेत १०० व २०० मीटर धावणे, लांब उडी व थाळी फेक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली होती. प्रथमेश भगाटे याने रिले रेस या प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. सूरज भोसले व प्रथमेश भगाटे यांच्या या यशाबद्दल त्यांचा सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक शहा व उपाध्यक्ष बाबासो गुंजाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अभय पटवा (पुणे), प्रशिक्षक एस. एल. पाटील व अविनाश सावंत उपस्थित होते.

‘प्रवासी पास देण्याची वेळ निश्चित करावी’
पंढरपूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

एस. टी. महामंडळाच्या प्रवासी वाढवा अभियानासह इतर योजना असून, त्या योजनेचे पास दिले जातात. हे पास प्रवाशांच्या सोयीच्या वेळेनुसारच एस. टी. महामंडळाने पास देण्याची वेळ निश्चित करून प्रवाशांना पास दिले जावेत, अशी मागणी माहिती संकलन संघाचे अध्यक्ष नरेंद्र कवडे व प्रवासी महासंघातर्फे करण्यात येत आहे.एस. टी. महामंडळाने प्रवाशांकरता योजना केल्यामुळे प्रवासी वाहतूक चांगली होत आहे. अशातच विविध योजनांचे पास देण्यात येतात. या पास देण्याची वेळ ही रात्री १२ ची घातली जाते, ही वेळच चुकीची आहे.यासंदर्भात लेखी निवेदन देताना प्रवासी महासंघाचे जिल्हा संघटक बावधाने शशिकांत हरिदास, ऐडके यांनी नमूद केले आहे, की प्रवासी शक्यतो रात्री ७ ते ८ च्या दरम्यान प्रवासाला सुरुवात करतो. त्यामुळे ही वेळ गैरसोयीची आहे.याबाबत आपले म्हणणे वरिष्ठांना कळवून त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आगारप्रमुख हरिराम साळुंखे यांनी सांगितले. याबाबत प्रवासी महासंघाचे महासचिव प्र. वि. कुलकर्णी हे महामंडळाच्या व्यवस्थापकांना भेटणार आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदीने कामाला लागावे- मदन पाटील
जत, १६ फेब्रुवारी / वार्ताहर

मरगळलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देऊन कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपापल्या मतदारसंघातील कामाला लागावे. माझी तुम्हाला साथ राहील, अशी ग्वाही पणनमंत्री मदन पाटील यांनी दिली.
जत विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात मदन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उमाजी सनमडीकर होते. याप्रसंगी जत- कंठी रस्ता व जिल्हा परिषद कन्या शाळा किचन शेडचे उद्घाटन, तर आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी इमारत, शिवाजी पुतळा चबुतरा, पाण्याची टाकी व जलवाहिनी आदी कामांचे भूमिपूजन मदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जत हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापुढील काळातही तो शाबूत राहील, यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, अशी सूचनाही मदन पाटील यांनी केली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे म्हणाले की, जत शहरात विविध कामे सुरू आहेत. या शहराला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच सुटेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक शिंदे, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडग, मन्सूर खतीब, सुभाष कुलकर्णी, सरपंच महादेव कोळी, उपसरपंच दिलीप सोलापुरे, शहाजी साळे व गटशिक्षणाधिकारी बी. एन. जगधने आदी उपस्थित होते.

संजय तरलगट्टींची उपनिरीक्षकपदी निवड
पंढरपूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन संजय हरिभाऊ तरलगट्टी यांची उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. संजय तरलगट्टी हे औषधनिर्माण शाखेचे पदवीधर आहेत. संजय तरलगट्टी यांचे प्राथमिक शिक्षण महिला प्राथ. तर विद्यालयीन कवठेकर प्रशाला येथे झाले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तरलगट्टी यांनी बी.फार्मसी पदवी नांदेड येथून संपादित केली आहे. संजयचे वडील हे निवृत्त शिक्षक आहेत. संजय यांचे अभिनंदन कवठेकर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक ना. बा. रत्नपारखी, प्रमोद पाठक, मो. चि. पाठक यांनी केले, तर ह.भ.प. तुकाराम काळे, आजरेकर फडाचे प्रमुखांनी सर्वाच्या वतीने अभिनंदन केले.

नाना पाटील पुतळा अनावरण समारंभ ऐतिहासिक बनविणार
आष्टा, १६ फेब्रुवारी / वार्ताहर

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणाचा कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त करीत या कार्यक्रमास दीड लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते वाळवा येथे होत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार व स्वातंत्र्यसैनिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून हेलिपॅड, रस्ते व दूरध्वनी यासह सर्व त्या यंत्रणा सज्ज केल्या आहेत. हुतात्मा उद्योग समूहातील प्रत्येक घटक या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे.

साईनाथ पतसंस्था ठेवीदारांचा मोर्चा
सांगली, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली येथील साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडील ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ठेवीदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खराडे व ठेवीदार संघटनेचे प्रदीप बर्गे यांनी केले.साईनाथ महिला सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, ठेवीदार संघटनेच्या नेत्यांना मारहाण करणाऱ्या संस्थापक धनंजय कुलकर्णी व त्यांच्या पत्नी अध्यक्षा श्रीमती विभावरी कुलकर्णी यांना अटक करावी, त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची आयकर विभागाकडून चौकशी करावी, त्यांची बँक खाती गोठविण्यात यावीत, आदीसह विविध मागण्या करण्यात आल्या.

‘केमिस्ट परिवार’ मासिकाचे प्रकाशन
पंढरपूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या, उत्पादक, डॉक्टर्स, वैद्यकीय प्रतिनिधी, दुकानदार या सर्वाचे प्रश्न मांडणारे अन् नव्या घडामोडींची माहिती सर्वानाच व्हावी या करिता पंढरीतून सुरवात करण्यात आलेल्या पहिल्याच वैद्यकीय विषयाला वाहिलेल्या ‘केमिस्ट परिवार’ या मासिकाचे प्रकाशन बी. ई. खोमणे व विठ्ठल एज्युकेशनचे सचिव प्रा. बी. पी. रोंगे यांचे हस्ते करण्यात आले.‘केमिस्ट परिवार’ या मासिकाची संकल्पना दासबाबू खंडेलवाल याची असून संपादकही ते स्वत: आहेत. वैद्यकीय विषयाला पूर्णपणे वाहिलेले मासिक प्रथमच प्रकाशित झाले असून यात महत्त्वाचे असे आरोग्याबाबत लेख, माहिती राहणार असून ती उपयुक्त असेल असे खंडेलवाल यांनी सांगितले.