Leading International Marathi News Daily                               मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

प्रणवदांचा ‘हात जगन्नाथ’
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
चौदाव्या लोकसभेतील २००९-१० सालचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मनमोहन सिंग सरकारने आर्थिक आघाडीवर बजावलेल्या चौफेर कर्तबगारीचा आज हंगामी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आलेख मांडला. अंतरिम अर्थसंकल्पात प्रणवदांनी आकडय़ांची ‘हातचलाखी’ टाळली, पण आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सिद्ध होताना काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हाता’वरून शाब्दिक कसरत करण्याची राजकीय चलाखी दाखविली. आगामी लोकसभा निवडणुकांची वेळ येईल तेव्हा कोणत्या ‘हाता’मुळे ही चौफेर प्रगती शक्य झाली याची ओळख जनतेला निश्चितपणे पटेल.

संरक्षण खर्चात २७,१०३ कोटींनी वाढ
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

जाता जाता युपीए सरकार काही लोकप्रिय घोषणा करेल, ही अपेक्षा बाळगून असलेल्यांची आज प्रणब मुखर्जी यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाने निराशा केली. ‘हाता’च्या मुद्यावर विरोधक आक्षेप घेत असताना ७० मिनिटांच्या भाषणाअंती काँग्रेसचा प्रचार करण्याची शेवटची संधी सोडली नाही.मुखर्जी यांनी ७० मिनिटांच्या भाषणात केंद्र सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला.

निवडणुकीवर डोळा ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प
विरोधकांचे टीकास्त्र

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी / पी.टी.आय.

अंतरिम अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सादर करण्यात आला असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केला आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अर्थसंकल्प निराशाजनक असून यात जनसामान्यांशी निगडीत कोणत्याही मुद्यांना स्पर्श करण्यात आलेला नाही, असेही विरोधकांनी म्हटले आहे. भाजप नेते अरुण जेटली म्हणाले, सत्यमच्या ताळेबंदासारखा हा प्रकार आहे.

एका दामल्यांची गोष्ट..
चंद्रशेखर कुलकर्णी
सॅन होजे, १६ फेब्रुवारी

रंगभूमीच्या क्षेत्रातील अनेकानेक विक्रम, नावापुढे तब्बल नऊ हजार नाटय़प्रयोगांची नोंद अशा घसघशीत करिअरचे गाठोडे लीलया वागविणाऱ्या एका दामल्यांची गोष्ट ऐकताना पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील रसिक हरवून गेले होते. मनमुराद हसता हसता क्षणभर गंभीर झाले. कारण एका दामल्यांच्या या गोष्टीने निवृत्तीची चाहूल दिली. प्रशांत महासागराच्या कुशीतील ‘बे एरिया’त भरलेल्या या साहित्य संमेलनात अभिनेता प्रशांत दामले याने निवृत्तीचा प्लॅन रसिकांपुढे जाहीर करून टाकला.

..तारे जमीं पर
चंद्रशेखर कुलकर्णी
सॅन होजे, १६ फेब्रुवारी

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘ऑस्कर’च्या महिन्यात मनोरंजनाच्या दुनियेतील तीन तेजस्वी तारे अमेरिकेतील सॅन होजेच्या भूमीवर अवतरले. केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी हे तीन मराठी तारे अमेरिकी जमींपर आले आणि त्यांच्या ‘हसा चकटफू’च्या अफलातून आविष्कारामुळे मध्यरात्रीनंतर प्रेक्षागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक अनिवासी मराठी भारतीयांच्या चेहऱ्यावर होते, ते मिलियन डॉलर स्माइल!

‘ये अंदरकी बात है’!
मुंबई, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

काल्विन क्लीन, व्हर्साचि अशा आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या अंडरगार्मेटकरिता मॉडेल ठरू शकेल किंवा अशा अंतर्वस्त्रांच्या लाँचला आपल्या खुरटय़ा दाढीवरून हात फिरवत झकाकत्या फ्लॅशना सामोरा जाईल असा ‘माचो मॅन’ जॉन अब्राहम पैलवानांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नावाने म्हणजे ‘जयंत’ ब्रँडखाली उत्पादित करण्यात आलेल्या अंडरगारमेंट्सच्या वितरणाला आज हजर होता. जयंत पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या नावे अंतर्वस्त्र बाजारात आणून मतदारांच्या तन-मनाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला ही ‘अंदरकी बात’ लपून राहणे अशक्य आहे.

म्हाडा अभियंत्यांच्या अर्धागिनी बनल्या बिल्डर!
निशांत सरवणकर
मुंबई, १६ फेब्रुवारी

भ्रष्टाचाराचे कुरण मानल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये नोकरी करता करता मिळालेल्या मलिद्याच्या जोरावर बिल्डर होण्याचे स्वप्न अर्धागिनींच्या माध्यमातून तिघा अभियंत्यांनी पूर्ण करून घेतले आहे. मलिदा असलेल्या ठिकाणीच पोस्टिंग घ्यायची आणि नोकरीवर असतानाही बिल्डर म्हणून मिरविण्याचा उद्योग करताना या तीन अभियंत्यांनी लोकांचीही फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी तक्रार होऊनही कारवाई होऊ शकलेली नाही.

कृषी क्षेत्राला बळकटी देणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री
मुंबई, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला आणखी बळकटी देणारा, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणारा, ग्रामीण बँकांना मजबूत करणारा आणि गरीब घटकांना न्याय देणारा आज संसदेत सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प असल्याचे मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
चव्हाण यांनी देशाच्या आर्थिक विकासाचा दर सलग तीन वर्षे नऊ टक्क्यांपर्यंत राखल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

राणे यांचे निलंबन रद्द
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींवर आगपाखड करून निलंबन ओढवून घेणारे माजी महसूल मंत्री नारायण राणे यांना तब्बल दहा आठवडय़ांनंतर आज काँग्रेस पक्षात पुनर्वसन करण्यात आले. राणे यांचे पुनर्वसन करताना त्यांच्यात आणि काँग्रेसश्रेष्ठींमध्ये कोणत्या तडजोडी झाल्या हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडेन, हे राणे यांनी आज १०, जनपथपुढे पत्रकारांपाशी केलेले वक्तव्य सूचक मानले जात आहे. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सामील व्हायचे की अन्य कोणती जबाबदारी स्वीकारायची याचा निर्णय राणे यांनी काँग्रेसश्रेष्ठींवरच सोपविला असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्राविषयी काँग्रेसश्रेष्ठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असलचे संकेत देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राणे यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे त्यांच्यावर या निवडणुकांविषयीच जबाबदारी टाकली जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.राणे यांना भेटण्याची औपचारिकता आज सोनिया गांधी यांनी दहा मिनिटांतच पूर्ण केली. सोनिया गांधींसह काँग्रेसश्रेष्ठींवर टीका केल्याबद्दल राणे यांनी या भेटीत खेद व्यक्त केला आणि पक्षाने निलंबन मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी १०, जनपथबाहेर जमलेल्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी, आज दुपारी राणे यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याची घोषणा काँग्रेसचे संघटन सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी केली.

आण्विक पाणबुडय़ांची टक्कर
लंडन, १६ फेब्रुवारी/पी.टी.आय.

अणुतंत्रज्ञान विकसित झाल्यापासून पहिल्यांदाच अणुइंधनावर चालणाऱ्या दोन पाणबुडय़ांची टक्कर होण्याचा प्रसंग अटलांटिक महासागरात या महिन्याच्या सुरुवातीला घडला. गंभीर बाब म्हणजे या दोन्ही पाणबुडय़ांवर अण्वस्त्रे तैनात केलेली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या पाणबुडय़ांचे अथवा अण्वस्त्रांचे काही नुकसान झाले का याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. ब्रिटनच्या शाही नौदलाची ‘ट्रायडंट’ श्रेणीतील ‘एचएमएस वँगार्ड’ ही अणुपाणबुडी तसेच फ्रेंच नौदलाची ‘ल ट्रायम्फंट’ श्रेणीतील अणुपाणबुडी एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त ‘द सन’ या वृत्तपत्राने दिले आहे. ३ अथवा ४ फेब्रुवारीला अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात झाला त्या वेळी दोन्ही पाणबुडय़ांमध्ये मिळून सुमारे २५० नौसैनिक उपस्थित होते. अपघातात दोन्ही पाणबुडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताबद्दल दोन्ही देशांकडून कमालीची गुप्तता राखण्यात येत आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने या बाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ब्रिटनकडे ट्रायडंट श्रेणीतील चार पाणबुडय़ा असून त्यातील एक पाणबुडी कायम आक्रमक टेहळणीच्या कामगिरीवर तैनात असते. या सर्व पाणबुडय़ा सुमारे १५० मिटर लांब आणि १३ मिटर रुंद आहेत. त्यावर ४८ अण्वस्त्रे बसविण्यात आली आहेत. या अपघातामुळे आण्विक स्फोट होण्याची शक्यता नाही. परंतु किरणोत्सार होण्याची शक्यता मात्र होती. समुद्राच्या एकाच भागात दोन देशांच्या अणुपाणबुडय़ा एकाच वेळी येण्याची शक्यता लक्षावधींमध्ये एक एवढी अत्यल्प असते.

बुधवार-शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही
ठाणे, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शहाड टेमघर पाणीपुरवठा प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकेला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणीपुरवठय़ामध्ये कळवा लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने ६.६४ टक्के पाणी कपात करण्यात आल्याने स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराच्या घोडबंदर परिसराला होणारा पाणीपुरवठा बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते गुरुवार १९ फेब्रुवारी सकाळी ८ या कालावधीत व पुढील १५ दिवसांनी येणाऱ्या बुधवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते शनिवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ या कालावधीत व पुढील १५ दिवसांनी येणाऱ्या शुक्रवारी उपरोक्त महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी कृपया महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शाहरूखच्या खांद्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आज शाहरूख खानच्या खांद्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरूख खानच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाचे चित्रीकरण करताना त्याचा खांद्यातून खूप कळा येत होत्या. लंडनमध्ये ‘बिल्लू’ या चित्रपटाचे प्रमोशन करून तो आज सकाळीच मुंबईत आला. त्यावेळी खांद्यावरील शस्त्रक्रीया लगेचच उरकून घ्यावी, असा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला. यापूर्वी पाठदुखीच्या तक्रारीमुळे लंडनमध्येही त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती.

दररोज धावणार जनशताब्दी एक्स्प्रेस
मुंबई, १६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई-मडगाव आणि मुंबई-औरंगाबाद जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडय़ा यापुढे दररोज धावणार आहेत. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस उद्या १८ फेब्रुवारीपासून तर, मुंबई-औरंगाबाद जनशताब्दी एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीपासून दररोज धावणार आहेत. त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही. आतापर्यंत या गाडय़ा आठवडय़ातून केवळ सहा दिवस चालविण्यात येत होत्या. मुंबई-मडगाव जनशताब्दी बुधवारी तर मुंबई-औरंगाबाद जनशताब्दी शनिवारी चालविण्यात येत नव्हती. प्रवाशांच्या मागणीखातर या गाडय़ा दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होईल, असा विश्वास रेल्वेकडून वर्तविण्यात येत आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी