Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

नरसिंह सहकारी साखर कारखान्यात विजयश्री मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते शंकर बोरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

‘नरसिंह’च्या इंदापूर गटावर शिवसेनेची पकड
उस्मानाबाद, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

प्रशासकीय मंडळाचा गैरकारभार, शासनाच्या प्रतिनिधीला न पेलवणारा नरसिंह सहकारी साखर कारखान्याचा कारभार सभासदांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते शंकर बोरकर यांच्याकडे सुपूर्द के ला आहे.

केतुरा ग्रामस्थांना पाण्यासाठी कोठडी
मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्रसिंह यांची दंडेलशाही

बीड, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

केतुरा गावच्या पाणीपुरवठा योजनेचे अर्धवट काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी कार्यालयात आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि महिला-पुरुष ग्रामस्थांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्रसिंह यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाणी मागणाऱ्या दोन स्थानिक लोकप्रतिनिधींसह तीस महिला-पुरुषांना पोलिसांनी कोठडीत डांबले आहे.बीड जिल्हा परिषदेअंतर्गत भारत निर्माण योजनेतून तालुक्यातील केतुरा येथे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे.


युतीसाठी महाजन यांनी केलेले कार्य मुंडे शब्दबद्ध करणार
स्व. प्रमोद महाजन पत्रकार भवनाचे लोकार्पण

औरंगाबाद, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या स्थानिक विकास निधीतून भाग्यनगरमध्ये उभारण्यात आलेल्या प्रमोद महाजन पत्रकार भवन लोकापर्ण सोहळा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी मंत्री हरिभाऊ बागडे, आमदार किशनचंद तनवाणी, महापौर विजया रहाटकर, माजी आमदार श्रीकांत जोशी, माजी महापौर डॉ. भागवत कराड, अतुल सावे, बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, प्रशांत देसरडा, माजी महापौर गजानन बारवाल आणि संजीव रिंडलॉन.

पलाशपंख
उस्मानाबादहून थोडं पुढच्या रस्त्याला आल्यावर बीडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ग्लिरीसिडीयाची फुलांची झाडंच झाडं दिसायला लागली. या दिवसांत सगळी पानं गळून गेल्यावर फक्त फुलंच फुलं फांद्यांना लगडलेली. गुलाबी रंगाचे घोसच्या घोस खालपासून टोकापर्यंत फांदीला लगडलेले. ही झाडं रस्त्याच्या फार पुढेपर्यंत साथ देत होती. जणू काही रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना गुलाबी सलामी देत ‘शुभास्ते पंथान:’ म्हणत होती. ही लागवड करणाऱ्या रस्ता अभियंत्याचं मनोमन कौतुक वाटलं आणि हा जुना सखा प्रथम भेटला तेव्हाचे दिवस आठवले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडून महाविद्यालयाच्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला हा पुष्पमंडित गुलाबी वृक्ष मला प्रथम भेटला आणि माझ्या गोतावळ्याचा एक भाग बनून गेला.

‘तन’ अपंग; ‘मन’ अभंग
परतूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

लिंबाजी सोमला आढे. जन्मापासून दोन्ही पायांनी अपंग. तीनचाकी सायकलवर शहराच्या विविध भागात दिसणारा. स्वत:च्या अपंगत्वावर मात करून नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार मिळविण्यात यशस्वी झालेला. ‘कुठलेही काम मनापासून केले तर यश हमखास मिळते’ हे वाक्य स्वत:च्या कृतीतून सार्थ ठरविणारा. घरोघर जाऊन घेतलेल्या शिकवणीवर्गातून त्याला महिन्याकाठी आठ-दहा हजार रुपये मिळतात. त्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तन जरी अपंग असले तरी मन ‘अभंग’ आहे असेच लिंबाजीच्या बाबतीत म्हणावे लागेल.

इज्तेमाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला तीन ठार, ८ जखमी
औरंगाबाद, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

साजापूर येथील इज्तेमाहून परतणाऱ्या भाविकांवर वाटेतच काळाने घाला घातला. भाविकांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीनजण ठार तर ८ जण जखमी झाले. एक अपघात सिल्लोड रस्त्यावर फरशी पुलावर तर दुसरा अपघात छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. दोन्हीही अपघात मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडले. खाजूखा भीकनखा पठाण, शेख अश्फाक शेख मुनाख आणि सय्यद शमीनोद्दीन सय्यद नजीमोद्दीन (३०, रा. शिवना) अशी मृतांची नावे आहेत. एक वाजण्याच्या सुमारास काळी-पिवळी मोटारीतून जात असताना एका वळणावर मोटार धडकली. त्यात खाजू आणि अश्फाक यांचा मृत्यू झाला तर अन्य ८ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा अपघात छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. शमीनोद्दीन यांना रिक्षाने धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पिसाळलेल्या कुत्र्यामुळे संसारनगरात पळापळ
औरंगाबाद, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पिसाळलेल्या कुत्र्यामुळे क्रांती चौक पोलीस ठाण्याला लागून असलेल्या संसारनगरवासीयांना दुपारी सळो की पळो करून सोडले. नागरिक मागे लागल्याने त्याने एका घरात तब्बल अर्धा तास आश्रय घेतला दरम्यानच्या काळात पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तो काही बाहेर आला नाही. पोलीस परतल्यानंतर तो बाहेर पडला आणि अखेर नागरिकांनी दगडाने ठेचून त्याला ठार मारले. यामुळे येथील रहिवासी तब्बल दोन तास हैराण झाले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिसाळ-लेला कुत्रा धावत येत असल्याचे दिसताच मुलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तो सैरावैरा धावत होता. पिसाळलेल्या कुत्रा वसाहतीत आल्याचे दिसताच नागरिक त्याच्या मागे लागले. तोच त्याने एका घरात आश्रय घेतला. तोपर्यंत याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती आणि नागरिकांच्या मागणीवरून त्याला पकडण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र तब्बल अर्धातास तो काही बाहेर आला नाही. त्यानंतर कुत्रा बाहेर पडताच पाठलाग करून त्याच्यावर दगडाचा मारा करून नागरिकांनी त्याला ठार केले.

तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक
लातूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

पोलीस उपनिरीक्षक व हेडकॉन्स्टेबल असल्याचा धाक दाखवून एका महाविद्यालयीन तरुणाकडून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी रविवारी अटक केली. बार्शी रस्त्यावरील गरड गार्डनसमोर श्याम प्रभू कदम (रा. टाकळी) हा दयानंद महाविद्यालयात बी.कॉम. द्वितीय वर्षांत शिकणारा विद्यार्थी शनिवारी रस्त्यावरून जाताना पोलीस असल्याचे सांगून तोतया पोलीस उपनिरीक्षक मुक्तार उस्मान शेख व त्याचा साथीदार तोतया हेडकॉन्स्टेबल अनंत कुलकर्णी यांनी त्याला ‘तू पोलिसांना हवा आहेस. तुझ्यावर अनेक गुन्हे आहेत,’ असे सांगून त्याच्या खिशातील मोबाईल व ५०० रुपये काढून घेतले. मुक्तार याच्या डायरीत सर्व पोलीस अधिकाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक होते. ‘आता पोलीस गाडी मागवून तुला अटक केली जाईल,’ असे सांगितल्यावर तो विद्यार्थी घाबरून गेला. ‘तुला सुटायचे असल्यास २५ हजार रुपये दे,’ अशी मागणी केली. त्या विद्यार्थ्यांने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधून बोलावून घेतले व १५ फेब्रुवारीला पाच हजार रुपये देण्याचे ठरले. औसा रस्त्यावरील यसीआयसीआय बँकेसमोर भेटून हे पैसे देण्याचे ठिकाण ठरवले गेले होते. नेमके त्याच वेळी छेडछाडविरोधी पथकही त्या परिसरात होते. रस्त्यावरील गर्दीत श्याम कदमने पोलिसांना आपण या कारणासाठी येथे आल्याचे सांगितले व पोलिसांनी मुक्तार शेख, अनंत कुलकर्णी या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात श्याम कदम याच्या तक्रारीवरून रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रवाशांची हेल्पलाईन - राजू बारी
सोयगाव, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

शेंदूर्णी बसस्थानकावर उतरलेल्या चहाच्या हॉटेलजवळ खाकी कपडय़ातील युवक उभा असतो. कोणती बस कुठे जाते, या गावाला किती वाजता बस आहे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे केवळ राजू बारीच देऊ शकतो. या बसस्थानकावर राजू १५ वर्षांपासून चहाचा व्यवसाय करीत आहे. त्यावेळी बसस्थानक नव्हते व नियंत्रकही नव्हते. त्यामुळे बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना कोणती बस आली-गेली याची माहिती मिळत नसे. अशा वेळी राजूने प्रवाशांची गरज ओळखून त्यांना मदत करायला सुरुवात केली. त्याच्या सहकार्य व चांगल्या स्वभावामुळे अल्पावधीत तो लोकप्रिय झाला. उन्हाळ्यात मोफत पाणी, वृद्ध प्रवाशांच्या बॅगा बसमध्ये ठेवणे, वर्तमानपत्रांची पार्सले टाकणे अशी अनेक महत्त्वाची कामे राजू करतो.
शेंदूर्णी बसस्थानकावर आल्यानंतर बसबाबत कोणतीही चौकशी राजूकडे केल्यास अचूक उत्तरे देऊन तो प्रवाशांचे समाधान करतो. राजू बारी या युवकाचा आदर्श घेऊन बसस्थानकावरील व्यापारीही प्रवाशांना सहकार्य करू लागले आहेत.

किसान सभेचे धरणे
परभणी, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वीज कपातीमुळे मोठी अडचण निर्माण झाली असून पाण्याअभावी पिके जोपासणे कठीण होत चालले आहे. या पाश्र्वभूमीवर कृषीपंपांना सोळा तास वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वीजकपातीमुळे पिके जोपासणे कठीण होत चालले आहे. दुसरीकडे नवीन पीककर्ज वाटप बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जून २००९ च्या हंगामाकरिता नव्याने पीककर्ज वाटप करण्यात यावे, चार टक्के व्याजदराने पीककर्जाचा पुरवठा करण्यात यावा, कापसावरील लाल्या रोगामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे परभणी तालुका किसान सभेच्या वतीने करण्यात आले. विलास बाबर, आनंद कच्छवे, अशोक कांबळे, विष्णू मोगले, बाबासाहेब पवार, अच्युत लोखंडे, कमलाकर वावर, भारत पवार आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

अर्बन बँकांच्या अडचणी सोडवू - मुंडे
बीड, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

आर्थिक अडचणीत सापडलेल्या दोन बँकांना वाचविण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत मदत केली. पण सरकारने प्रशासक नेमला आहे. अर्बन बँकांच्या अडचणी आपणाला माहीत असून त्या सोडविण्यासाठी त्यांचे वकीलपत्र आपण स्वीकारले आहे, अशी ग्वाही देऊन छत्रपती बँकेचा आदर्श इतर बँकांनी घ्यावा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केले. शहरातील श्रीछत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप. बँक नगर रोड शाखेत श्री. मुंडे यांच्या हस्ते कोअर बँक सेवेचा प्रारंभ झाला. अर्बन बँकांना नवी दिशा मिळावी यासाठीच आपण या क्षेत्रात पदार्पण केले असून नागरी बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘मनसे’च्या नामफलकाचे उद्घाटन
चाकूर, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील खुर्दळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नामफलकाचे उद्घाटन व शाखा स्थापना जिल्हा चिटणीस महेश उटगे यांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजीराव शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे, तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, तालुका चिटणीस बाबुराव शेवाळे, म. न. विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन हामणे, विभाग अध्यक्ष बळीराम सलगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक विशाल करडिले यांनी केले. या वेळी तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी यांनी पुढील कार्यकारिणी जाहीर केली. शाखा अध्यक्ष- महादेव साळुंके, उपाध्यक्ष- विशाल करडिले, अमोल शिंदे, चिटणीस- शत्रुघ्न चामले, सहचिटणीस- तानाजी भालेराव, कोषाध्यक्ष- मुन्ना शेख, प्रसिद्धीप्रमुख- केशव भालेराव, सदस्य- इसराईल शेख, अनिल रेड्डी, गजानन शिंदे, मयुम शेख, अर्जुन जवणे, आदी.

शाळेचे प्रांगण, नव्हे कचराकुंडी!
सिल्लोड, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण हे प्रात:र्विधी व कचरा टाकण्याचे ठिकाण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी शिक्षकांचा आवाज कमी पडत आहे. जिल्हा परिषदेची शाळा शहराच्या मध्य वस्तीत आहे. या भागात स्वच्छतागृहांची सोय नसल्याने शाळेच्या प्रांगणातच सर्व विधी उरकले जातात. बाजूंनी दुकाने असल्याने येथील कचरा शाळेच्या आवारात फेकला जातो. शिवाय स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने त्यासाठीही उपयोग होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेला दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यावर प्रवेशद्वार बसवून प्रवेश बंद करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

साजेदा बेगम यांचे निधन
परभणी, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

साजेदा बेगम अब्दुल रहीम खान यांचे आज पहाटे नांदेड येथील रुग्णालयात निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शमीम अहेमद खान हे त्यांचे चिरंजीव आहेत. साजेदा बेगम यांची शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णावयात हलविण्यात आले. उपचार चालू असतानाच त्यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर काद्राबाद प्लॉट येथील मशिदीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्यमंत्री चषक फुटबॉलचे विजेतेपद हैदराबादच्या ग्लो संघाने पटकावले
नांदेड, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

मुख्यमंत्री चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हैदराबादच्या ग्लो संघाने मुंबई पोलीस संघाचा २-१ अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. नांदेड-वाघाळा मनपाच्या स्थायी समितीचे सभापती मसूद अहेमदखान व नगरसेवक मुन्ना अब्बास हुसेन यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री चषक स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातील २८ संघांनी सहभाग नोंदविला होता. आज झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात हैदराबाद ग्लो संघाने मुंबईचा २-१ असा पराभव करून मुख्यमंत्री चषक व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

शिक्षक-मुख्याध्यापकांत शीतयुद्ध
सोयगाव, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यात विविध कारणांवरून पेटलेले शीतयुद्ध अखेर पोलिसात गेले आहे. शाळेतील एक शिक्षक त्याच्या विक्षिप्त वागण्यामुळे सध्या चर्चेचा विषय झाला आहे. एवढेच नाही तर महिला कर्मचाऱ्यालाही मानसिक त्रास होत असल्याने या शिक्षकाची बदली करावी, अशी मागणी होत आहे. नुकताच या शिक्षकाने काही कारणामुळे मुख्याध्यापकाशी केलेल्या वादामुळे हे प्रकरण पोलिसात गेले आहे. शिक्षण क्षेत्रात शिक्षकाच्या या वागण्याची चर्चा होत आहे.

‘कोणत्याही संस्थेचे पुनरुज्जीवन अवघड’
परळी वैजनाथ, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

कोणत्याही संस्थेची नवनिर्मिती प्रक्रिया सोपी असते; परंतु एखाद्या संस्थेचे पुनरुज्जीवन करणे अवघड असते. आपण अनेक कारखाने वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून चालविले असल्याचा त्याचा अनुभव आला असून योग्य पद्धतीने नियोजनबद्ध काम केल्यास संस्था चालविणे सोपे होऊ शकते, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त करीतच सावरकर पतसंस्थेने सर्वसामान्यांचे आर्थिक हित जोपासावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मुंडे बोलत होते. अध्यक्षपदी वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक सामंत होते.

बनावट मजूर संस्थांची मान्यता रद्द करण्याची मागणी
नळदुर्ग, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

मजूर सहकारी संस्था या राजकीय ठेकेदारांचे चरण्याचे कुरण झाल्या आहेत. सहकारी संस्था निबंधकांनी मंजुरीशिवाय मजुरांच्या नावे चालणाऱ्या बनावट मजूर संस्थांची चौकशी करून मान्यता रद्द करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सर्वसामान्य मजुरी करणाऱ्या मजुरांच्या हाताला गावातल्या गावात काम मिळावे याकरिता सरकारने नोंदणीकृत मजूर संस्थांना पाच लाखांपर्यंतची सरकारी कामे विनानिविदा बहाल करावीत असे सांगितले; परंतु सरकारच्या या आदेशाचा मजुरांना लाभ होत नाही. मजुरांच्या अशिक्षित -भोळे-भाबडेपणाचा राजकीय गावगुंड, ठेकेदार फायदा करून घेत आहेत. या सर्व प्रकरणी सहकारी संस्था निबंधकांनी लक्ष देऊन मजुरांशिवाय चालणाऱ्या संस्थांची चौकशी करून त्यांच्या मान्यताच रद्द कराव्यात अशी मागणी होत आहे.

वैद्यनाथ मंदिर उडविण्याची धमकी
परळी वैजनाथ, १६ फेब्रुवारी/वार्ताहर

वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मोबाईलवर आल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या पाश्र्वभूमीवर वैद्यनाथ मंदिरात बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बापुराव कुरूमकर यांनी दिली. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांची संख्याही मोठी असते. दोन दिवसांपूर्वीच शहरातील एका व्यक्तीच्या मोबाईलवर वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी मिळाली. या व्यक्तीने आलेली धमकी पोलिसांना सांगितली. त्यावरून दूरध्वनी कोठून आणि कोणी केला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रवादीतर्फे उद्या औरंगाबादेत ओबीसीचा मोर्चा
औरंगाबाद, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी म्हणून नको, न्या. बापट आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करा, न्या. सराफ आयोग रद्द करा, राज्यातील सर्व बलुतेदार, मागसवर्गीय आर्थिक महामंडळासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी वाढवून द्या आणि थकीत कर्ज माफ करा, आंध्र प्रदेशप्रमाणे विधानसभेत ओबीसींसाठी राखीव मतदारसंघ ठेवा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी दिली. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, शहराध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष कमाल फारूकी, माजी आमदार भाऊ थोरात, प्रा. के. पी. झारगड, अ‍ॅड. त्र्यंबक शिरसाठ, सुभाष झांबड आदी सहभागी होणार आहेत.

निवडणुकीसाठी युवकांनी सज्ज व्हावे - महेश तपासे
औरंगाबाद, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत आवश्यक आहे. युवक संघटनेतील कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करून उभी करा आणि पक्षाला घवघवीत यश प्राप्त करून द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश तपासे यांनी केले. मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.