Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्रणवदांचा ‘हात जगन्नाथ’
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

चौदाव्या लोकसभेतील २००९-१० सालचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मनमोहन सिंग सरकारने आर्थिक आघाडीवर बजावलेल्या चौफेर कर्तबगारीचा आज हंगामी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आलेख मांडला. अंतरिम अर्थसंकल्पात प्रणवदांनी आकडय़ांची ‘हातचलाखी’ टाळली, पण आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सिद्ध होताना काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हाता’वरून शाब्दिक कसरत करण्याची राजकीय चलाखी दाखविली. आगामी लोकसभा निवडणुकांची वेळ येईल तेव्हा कोणत्या ‘हाता’मुळे ही चौफेर प्रगती शक्य झाली याची ओळख जनतेला निश्चितपणे पटेल. हा ‘हात’च देशाला शांतता आणि भरभराटीच्या मार्गावर नेऊन ठेवू शकतो, याचीही जाणीव जनतेला होईल, असे सांगत मुखर्जी यांनी

 

अर्थव्यवस्थेचे सारे श्रेय काँग्रेसच्या खात्यात जमा केले. तब्बल २५ वर्षांनंतर प्रणव मुखर्जी यांना अंतरिम का होईना अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. आर्थिक मंदीमुळे मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग टिकवून ठेवण्यासाठी तसेच समाजातील कमकुवत घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या संरक्षण खर्चात २७ हजार १०३ कोटी रुपयांनी वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली.

बाजार कोसळला
मुंबई, १६ फेब्रुवारी/व्यापार प्रतिनिधी

आर्थिक मंदीच्या झळा कमी करण्यासाठी उद्योगक्षेत्रासाठी आणखी एखादे उभारी देणारे ‘पॅकेज’ येईल अशी अपेक्षा असताना, संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून पुरता अपेक्षाभंग झाल्याने मुंबई शेअर बाजाराने आज मोठय़ा घसरणीची प्रतिक्रिया नोंदविली. अर्थसंकल्पाने केलेल्या निराशेमुळे ‘सेन्सेक्स’ कालच्या तुलनेत ३२९.२९ अंशांची तूट नोंदवून बंद झाला.