Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एका दामल्यांची गोष्ट..
चंद्रशेखर कुलकर्णी
सॅन होजे, १६ फेब्रुवारी

 

रंगभूमीच्या क्षेत्रातील अनेकानेक विक्रम, नावापुढे तब्बल नऊ हजार नाटय़प्रयोगांची नोंद अशा घसघशीत करिअरचे गाठोडे लीलया वागविणाऱ्या एका दामल्यांची गोष्ट ऐकताना पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील रसिक हरवून गेले होते. मनमुराद हसता हसता क्षणभर गंभीर झाले. कारण एका दामल्यांच्या या गोष्टीने निवृत्तीची चाहूल दिली. प्रशांत महासागराच्या कुशीतील ‘बे एरिया’त भरलेल्या या साहित्य संमेलनात अभिनेता प्रशांत दामले याने निवृत्तीचा प्लॅन रसिकांपुढे जाहीर करून टाकला.
आणखी पाच वर्षांनी रंगभूमीवरील करिअरला पूर्णविराम देण्याची भाषा करतानाच प्रशांतने सोडलेल्या त्यापुढील संकल्पाला भरगच्च सभागृहाने मन:पूर्वक दाद दिली. ‘नाटके उदंड झाहली’, असा भाव मनी ठेवून आणखी पाच वर्षांनी या करिअरवर पडदा टाकण्याचा विचार त्याने बोलून दाखविला. अर्थात त्यानंतर शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेऊन गाण्याच्या बैठकीसाठी रसिक श्रोत्यांपुढे येईन या त्याने दिलेल्या अभिवचनाला हाऊसफुल्ल गर्दीने मन:पूत दाद दिली. आजवर गाण्याचे, संगीताचे कणभरही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या प्रशांतला आपल्या फाऊंडेशनच्या कामाच्या विस्ताराबरोबरच शास्त्रीय संगीताच्या रीतसर शिक्षणाचे सूर खुणावू लागले आहेत. प्रख्यात निवेदक- मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पांमध्ये आपले मन मोकळे करताना प्रशांतने आपल्या कारकिर्दीच्या आरोह-अवरोहाचे नोटेशनच रसिकांपुढे खुले केले. परस्परांना चिमटे काढीत सुरांच्या साथसंगतीत बुडालेल्या या मुलाखतीतील निखळ विनोदाला आयुष्याबाबत केलेल्या चिंतनपर योजनेची किनार होती. पोटा-पाण्यासाठी विद्यार्थीदशेत घेतलेले टायपिंगचे शिक्षण, त्यात कमावलेला प्रति मिनीट १२० शब्दांचा वेग, बॅडमिंटन, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाला ‘बेस्ट’मधील नोकरीच्या व्यवहाराची दिलेली जोड, एनसीपीएच्या लायब्ररीत जाऊन दिवस-दिवस ऐकलेला संगीताचा खजिना, उस्ताद अमीर खाँसाहेब, पं. ओंकारनाथ ठाकूरांपासून मेहदी हसन- रफीपर्यंत अनेकांची ऐकलेली गाणी- चिजा, त्यांचा कानावर झालेला संस्कार या साऱ्यांचा खजिना प्रशांतने या मुलाखतीदरम्यान, भरभरून लुटला. भट्टी जमलेल्या अभिनेत्रीची रंगभूमीवरील साथ सुटण्याने अस्वस्थता निर्माण होते, याचा प्रांजळ स्वीकार करणाऱ्या प्रशांतने नाटक-सिनेमातील कारकिर्द, शालेय जीवनात आलेले गाण्याच्या स्पर्धेचे अनुभव दिलखुलासपणे सांगितले. छंदाचेच व्यवसायात रूपांतर होण्याचे भाग्य लाभल्याबद्दलचे समाधान व्यक्त करतानाच विनोदी नट हा शिक्का कधी पुसावासा वाटत नाही, असे स्पष्ट केले. हिंदी चित्रपटसृष्टीत आजच्या घडीला गेलो तर वाटय़ाला काय पद्धतीच्या भूमिका येतील, याची जाणीव असल्याने त्यात स्वारस्य नसल्याचे त्याने सांगून टाकले. विनोद न कळणाऱ्या निर्मात्यांमुळे चित्रपटातील कामे कमी केली, हेही त्याने या मुलाखतीत स्पष्ट केले. ‘पहिलं नमन’, ‘विठूचा गजर’पासून मेहदी हसनच्या ‘रंजिश ही सही’पर्यंत नाना सुरीले रंग उधळता उधळताच ‘सांगा कसं जगायचं’पर्यंत त्याने पेश केलेल्या गाण्यांना तर उपस्थितांनी भरभरून दाद दिलीच, शिवाय सुधीर गाडगीळ यांच्या समवेत प्रशांतने रंगवलेल्या प्रेमळ शाब्दिक चकमकींवर अमेरिकेतील मराठीजनांनी हशा आणि टाळ्यांचा पाऊस पाडला. ‘एका लग्नाची गोष्ट’ सांगणाऱ्या प्रशांतने शास्त्रीय संगीताची सोयरीक जाहीर केल्यावर त्याच्या या नव्या प्रकरणवजा प्रयोगाला त्याच्या चाहत्यांनी उदंड शुभेच्छा दिल्या.