Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

..तारे जमीं पर
चंद्रशेखर कुलकर्णी
सॅन होजे, १६ फेब्रुवारी

 

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘ऑस्कर’च्या महिन्यात मनोरंजनाच्या दुनियेतील तीन तेजस्वी तारे अमेरिकेतील सॅन होजेच्या भूमीवर अवतरले. केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी हे तीन मराठी तारे अमेरिकी जमींपर आले आणि त्यांच्या ‘हसा चकटफू’च्या अफलातून आविष्कारामुळे मध्यरात्रीनंतर प्रेक्षागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक अनिवासी मराठी भारतीयांच्या चेहऱ्यावर होते, ते मिलियन डॉलर स्माइल!
अमेरिकेत स्थायिक झालेला मराठी माणूस सलग किती वेळ पोट भरून पोटभर हसू शकतो, याची सत्वपरीक्षाच तीन आघाडीच्या कलावंतांनी इथल्या मध्यरात्रीपर्यंत संमेलनाच्या सभागृहात घेतली. गगनभेदी हास्यकल्लोळ, टाळ्या, शिष्य़ा असा भन्नाट फड केदार शिंदेने भरत जाधव, अंकुश चौधरी आणि प्रणीत कुलकर्णी या दोस्तांसमवेत जमवून आणला.
‘हसा चकटफू’ची रंगत क्षणाक्षणाला वाढत गेली आणि विनोद महात्म्याचा एक नवा अध्याय अमेरिकेच्या भूमीत लिहिला गेला. अभिरुची आणि रंजनाचा दर्जा यावर गंभीर चर्चा करणाऱ्या संमेलनातच स्टॅण्ड-अप कॉमेडीचा अफलातून प्रयोग साकारला.
केवळ हौसेपायी गिरणगावातील गणेशोत्सवाच्या मंडपात फक्त ५० रुपये आणि नारळाच्या मोबदल्यात मनोरंजनाचा खेळ काही वर्षांपूर्वी मांडणारा केदार, भरत आणि अंकुशचा कंपू आता रसिकांच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माइल फुलविण्यात किती माहीर झाला आहे, याची प्रचिती संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी खचाखच गर्दी करणाऱ्या अमेरिकावासी मराठीजनांना आली. आपल्या ‘स्टार’
व्हॅल्यूचा कसलाही बडेजाव न ठेवता या त्रिकुटाने अभिनयाच्या सर्व छटांचे दर्शन घडविले. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच्या सर्व आयुधांचा त्यांनी मोठय़ा खुबीने वापर केला. पोट धरधरून हसणे म्हणजे काय, याचा हा ‘चकटफू’ अनुभव अक्षरश: भन्नाट होता.
सभ्य स्त्री-पुरुषांच्या एखाद्या स्मितरेषेपलीकडे न जाणाऱ्या शिष्टाचाराचे या प्रयोगाने अक्षरश: विसर्जन करून टाकले. मुलाखत, किस्से, चुटके या वेगवेगळ्या प्रकारांना समर्थ अभिनय आणि प्रभावी सादरीकरणाची जोड देत साकारलेल्या या आविष्काराने जवळपास दोन तास मंदीला खळाळून हसण्याच्या तेजीच्या जवळपासही फिरकू दिले नाही.
शाहीर साबळेंच्या लोकसंगीताची धारदार सुरावट, दादा कोंडकेंच्या बतावणीतील मिस्कीलपणा, पीजेंना दिलेली खमंग फोडणी असा हा अष्टपैलू आविष्कार अमेरिकेतील मराठी मंडळींना इतका सही वाटला, की कार्यक्रम संपल्यानंतर चेहऱ्यावरचे हसू मालवण्याआधीच या मंडळींना पुन्हा कधी बोलवायचे याचे मनसुबे आखायला सुरुवात झाली.
अमेरिकी व्हिसापासून इथल्या मातीत नाइलाजाने जगणाऱ्या अगतिकतेपर्यंत नानाविध पैलूंवर राजकीय- सामाजिक भाष्य करणाऱ्या या आविष्काराने हजारभर मराठी माणसांची निखळ करमणूक केली. संमेलनासाठी महाराष्ट्रातून सॅन होजेत दाखल झालेल्या सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही मनोरंजनाची ‘विच्छा’ या मंडळींनी पुरी केली.
‘सही रे सही’, ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ यांसारख्या अनेक कलाविष्कारांचा नैमित्तिक आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाने या ताऱ्यांच्या खासगी जीवनाची चित्तरकथाही नीट उलगडून दाखविली. चाळीतल्या आयुष्यापासून ‘स्टार’ होण्यापर्यंतच्या ढोबळ धांडोळ्यातील टोले आणि चिमटे घडीघडी दादा कोंडक्यांच्या बतावणीची याद जागवत राहिले.
‘गिरणगाव मिलेनियर’चा हा आइवष्कार इतका भन्नाट होता, की कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी व्यासपीठावर गेलेल्या सुधीर गाडगीळ यांनी तर या त्रयीला वाकून नमस्कार केला. पडदा पडला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता आणि शेकडो चेहऱ्यांवरचे हसू मालवत नव्हते.