Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘ये अंदरकी बात है’!
मुंबई, १६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

काल्विन क्लीन, व्हर्साचि अशा आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या अंडरगार्मेटकरिता मॉडेल ठरू शकेल किंवा अशा अंतर्वस्त्रांच्या लाँचला आपल्या खुरटय़ा दाढीवरून हात फिरवत झकाकत्या फ्लॅशना सामोरा जाईल असा ‘माचो मॅन’ जॉन अब्राहम पैलवानांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नावाने म्हणजे ‘जयंत’ ब्रँडखाली उत्पादित करण्यात आलेल्या अंडरगारमेंट्सच्या वितरणाला आज हजर होता. जयंत पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या नावे अंतर्वस्त्र बाजारात आणून मतदारांच्या तन-मनाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला ही ‘अंदरकी बात’ लपून राहणे अशक्य आहे. लोकनेते राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाच्यावतीने उत्पादित करण्यात आलेल्या ‘जयंत’ ब्रँडच्या जॉयस् मेन्स अंडरगारमेंट्सचे वितरण १६ फेब्रुवारी म्हणजे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. जयंत पाटील हे अगोदर अर्थमंत्री होते. अलीकडेच झालेल्या फेरबदलांत ‘सुळावरील पोळी’ असलेल्या गृह खात्याची जबाबदारी जयंतरावांकडे आली. इस्लामपूरमधील वाळवा तालुक्यातील साखर कारखान्यापासून पंचायत समितीपर्यंत सर्वत्र ‘जयंत ब्रँड’च चालतो. तांबडय़ा मातीला पाठ लागणे म्हणजे नामुश्की. जयंतरावांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांनी कित्येकांना राजकीय आखाडय़ात अस्मान दाखवले. तरीही निवडणुकीच्या तोंडावर ‘जयंत ब्रँड’ अंडरगारमेंट्स बाजारात का आणले त्याचे कोडे अनेकांना उलगडत नाही. निवडणुकीला मतदानाला जाताना ‘जयंत ब्रँड’चा ड्रेसकोड तर सक्तीचा असणार नाही नां? अशी शंका काहीजण घेत आहेत. जॉनला राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी ‘जयंत टी शर्ट’ घालायला सांगितला, अशी कबुली खुद्द जॉनने कार्यक्रमात दिली. आता पाटील मला त्यांच्या ब्रँडची अंडरवेअर घालायला लावतात की काय म्हणून मी घाबरून पटकन टी शर्ट घातला, असेही तो म्हणाला. आंतरराष्ट्रीय ब्रँडला मागे टाकणारा हा ‘जयंत ब्रँड’ आहे, अशी कबुली जॉनने दिली. यावेळी जॉन अब्राहमचा फेटा गुंडाळून आणि हातात चांदीची तळपती तलवार सोपवून जाहीर सत्कार करण्यात आला. ‘मी मराठी मुलगा आहे. याचा मला गर्व आहे..’ असे मराठीत तो उद्गारला. जॉन निव्र्यसनी आणि निगर्वी असल्याने त्याला बोलावल्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले तर राजकारणी लोकांना आपण भितो. त्यांच्यापासून दूर पळतो पण गृहमंत्री जयंत पाटील हे साधेसुधे परंतु असाधारण व्यक्ती असल्याने त्यांचे निमंत्रण स्वीकारल्याचे जॉन म्हणाला. गृहमंत्र्यांचे असाधारण महत्व हीसुद्धा ‘अंदर की बात’ थोडीच आहे..