Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

म्हाडा अभियंत्यांच्या अर्धागिनी बनल्या बिल्डर!
निशांत सरवणकर
मुंबई, १६ फेब्रुवारी

 

भ्रष्टाचाराचे कुरण मानल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये नोकरी करता करता मिळालेल्या मलिद्याच्या जोरावर बिल्डर होण्याचे स्वप्न अर्धागिनींच्या माध्यमातून तिघा अभियंत्यांनी पूर्ण करून घेतले आहे. मलिदा असलेल्या ठिकाणीच पोस्टिंग घ्यायची आणि नोकरीवर असतानाही बिल्डर म्हणून मिरविण्याचा उद्योग करताना या तीन अभियंत्यांनी लोकांचीही फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी तक्रार होऊनही कारवाई होऊ शकलेली नाही.
सध्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पात असलेले केतन पडते, मुंबई मंडळाच्या वांद्रे डिव्हिजनचे रमेश अकुलवार आणि झोपडपष्ी सुधार मंडळातील प्रसाद धात्रक अशी या तीन अभियंत्यांची नावे असून त्यांनी आपल्या पत्नी अनुक्रमे स्वाती, आरती आणि योगिता यांच्या नावे करारनामा तयार करून म्हाडाच्या अभियंत्यांमध्ये कशी ‘एकी’ असते, ते दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या तिघांनी पत्नींच्या नावे सिद्धाई होम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर अशी कंपनी स्थापन केली आहे. रहिवाशांशी केलेल्या करारनाम्यात भागीदार असलेल्या त्यांच्या पत्नींनी सह्य़ा केल्या आहेत. याबाबतचा करारनामाच ‘लोकसत्ता’कडे आहे. नोकरीत असताना अन्य व्यवसाय करता येत नसल्यामुळे या तिन्ही अभियंत्यांनी पत्नींच्या नावे कंपनी स्थापन केली असून करारनामा करताना कुठेही त्यांची नावे न देता फसवणूक केल्याची भावनाही काही रहिवाशांची झाली आहे. या कंपनीचे पीए असलेले सिद्धेश कानडे यांना वास्तुरचनाकाराला नियुक्तीचे पत्र द्यायला लावून या तिन्ही अभियंत्यांनी म्हाडामध्ये आपले बिंग फुटू नये याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
दहिसर-चुनाभष्ी येथील एमएचबी कॉलनीतील ३२ ते ३४ क्रमांकाच्या दहिसर स्नेहसागर सोसायटीच्या वतीने वास्तुतज्ज्ञ सुहास बोराळे यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी मुख्य अधिकारी एच. के. जावळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात त्यांनी ६० रहिवाशांना २३० चौरस फुटाची सदनिका देण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे. वास्तविक एलआयजीवासीयांना शासनानेच ४५ चौरस मीटरची म्हणजे ४८५ चौरस फुटाची मर्यादा घालून दिलेली असताना इतके कमी क्षेत्रफळ त्यांनी करारनाम्यात दाखविले आहे. लाच घेतल्याप्रकरणी निलंबित असलेले कार्यकारी अभियंता खोतकर यांच्यासमवेत पडते व अकुलवार हे पूर्वी वांद्रे डिव्हिजनमध्ये होते. तेथून पडते यांनी शिवशाही प्रकल्पात तर अकुलवार यांची लँड विभागात बदली झाली. तेथे ते अजिबात रमले नाहीत. सहा महिन्यांच्या नियुक्तीतील बराचशा कालावधीत रजा उपभोगून अखेरीस त्यांनी पुन्हा वांद्रे विभागात बदली करून घेतली तर धात्रक हे झोपडी सुधार मंडळात अनेक वर्षे आहेत. म्हाडा अभियंते असल्यामुळे त्यांना पुनर्विकासाचे प्रस्ताव लगेच मिळत होते. त्याचा फायदा त्यांनी उठविल्याचे स्पष्ट झाले आहे.